शुद्ध कचरा

शुद्ध कचरा

शहरात ओल्या कचऱ्याचे ढीग साचतात आणि आसपासच्या शेतांना खताची अपेक्षा असते. शुद्ध कचऱ्याची गाडी शेतापर्यंत पाठवण्याचे काम प्रशासनाने संवेदनशीलतेने केले पाहिजे. 
 

उन्हाळ्याच्या दिवसांत पुण्यात येताना भैरोबा नाल्याला वळले, की सगळ्या कॅंप भागात झाडांच्या तळाशी पसरलेली पाने, क्वचित सफाई कामगारांनी झाडून गोळा करून ठेवलेले ढीग मला खुणावत राहतात. एखाद्या सोसायटीत, कृषी महाविद्यालयात पानांचा खच पडलेला दिसला, की मला हाव सुटते. मोठ्या वृक्षांची मूळ मातीच्या खोलवरच्या थरातली अन्नद्रव्ये खेचून वर आणतात. ती पानांत साठवतात. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी झाडे पाने ढाळतात. या आच्छादनामुळे तापमानही थोडे सुसह्य होते. पाऊस आला, की हा जैवभार हळूहळू कुजून मातीचा भाग होतो. झाडांनी जमिनीतून उचललेले तिला पुन्हा मिळते, अशा रीतीने निसर्गाचे एक चक्र पूर्ण होते. झाडाचे पोषण अविरत सुरू राहते; पानांचा सडा पाहिला, की सेंद्रिय शेती करताना समजलेल्या गोष्टी आठवत राहतात.

आज आपल्या शेतजमिनी सेंद्रिय कर्बाच्या बाबतीत दारिद्य्ररेषेखाली आहेत, म्हणायला हरकत नाही. वरून घातलेली खते रासायनिक असो, की जैविक, जमिनीत पुरेसा सेंद्रिय कर्ब असल्याशिवाय त्यांचा परिणामकारक उपयोग होत नाही. त्यासाठी पाचट न जाळणे, हिरवळीची पिके घेणे, बांधावर विविध प्रकारची झाडे लावून त्यांच्या फांद्या वेळोवेळी कापून अंथरणे, हे उद्योग चालू असतातच. एकदा पुण्यापासून वाहत आलेली जलपर्णी आमच्या नदीकाठच्या तुकड्यात स्थिरावली, पाणी कमी झाल्यावर ती तिथेच सुकली. ती उचलून शेतात टाकण्याचा ‘अमजुरेषु व्यापार’ मी केला. अर्थात मजुरी परवडत नसल्याने दोन ट्रेलर झाल्यावर तो थांबवला. पण मार्चच्या कडक उन्हात चार दिवसांत जलपर्णी पूर्ण सुकली. काकरीने मातीत मिसळली. त्या रानातले सेंद्रिय भेंडीचे पीक बेफाम म्हणावे असे आले होते.

तर, पुण्यातला हा पालापाचोळा आपल्या शेतात नेता येईल का? कसे जमावे हे? या विचारात असताना, ‘स्वच्छ शहरा’साठी पुणे महापालिकेबरोबर काम करणाऱ्या माधवीने सांगितले, की वेगळा केलेला कुजण्याजोगा कचरा शेतकऱ्याला हवा असेल तर शहरापासून ठराविक अंतरापर्यंत मोफत पोच करण्याची महापालिकेची योजना आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो.

सुदैवाने आमची शेती ‘ठराविक अंतरा’त बसत होती. त्यांनी गाडी पाठवण्याचे कबूल केले. सगळा कचरा कुजण्यासारखाच असावा, बाकी काही नको, असे त्यांना निक्षून बजावले होते. त्यांनीही या गोष्टीची जोरदार हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र गाडी खाली झाली तेव्हा प्लॅस्टिक, काचा, थर्माकोल वगैरे सर्व काही भरपूर होते. कळल्यावर साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली. तरीही पुढचा ट्रकही तसाच आला. तेव्हा घरच्यांची बोलणी खाऊन हा ‘कचरेषु व्यापार’ बंद करून टाकला.

या उन्हाळ्यात पुन्हा झाडांखालच्या पानोळ्याकडे आशाळभूतपणे पाहणे झालेच. त्यात पुन्हा माधवीचा फोन आला. तिच्या एका ओळखीच्यांच्या सोसायटीत मोठमोठ्या झाडांच्या पानगळीमुळे खूप कचरा झालाय. ही पाने सर्रास तिथेच जाळली जातात. ‘बॉटनी’च्या अभ्यासक असलेल्या अचलाताईंना हे पसंत नव्हते. त्यांना तो कुठेतरी शेतात पाठवायचा होता. त्यांनी माधवीला, तिने मला विचारले. मागच्या अनुभवावरून मी कचऱ्यातल्या भेसळीबद्दल विचारले. फक्त बागेतला पालापाचोळाच होता.

मला गाडीची व्यवस्था करणे जमले नव्हते. म्हणून तो विषय तसाच राहिला. पण अचलाताईंनी खटपट करून एक टेम्पो ठरवला आणि पाला भरून स्वखर्चाने माझ्याकडे पाठवला. आमच्या मुक्त गोठ्यात हा टेम्पो खाली झाला. कचरा अगदी ‘शुद्ध’ होता. गाईंनी यावर खूप नाचून घेतले. आता त्यांचे शेणमूत्र आणि तुडवणे यातून छानसे खत आम्हाला मिळेल.

बागेतल्या काडीकचऱ्याप्रमाणेच शहरात दररोज (सणासुदीला आणखी मोठ्या प्रमाणात) निर्माण होणारे निर्माल्य, नारळाचे अवशेष, नदीत माजणारी जलपर्णी, हे ‘शुद्ध कचऱ्या’चे स्रोत आहेत. ही ‘डोकेदुखी’ नाही, आपल्या शेतीच्या समृद्धीची गुरुकिल्ली आहे. ‘तण खाई धन’, अशी जुनी समजूत होती. सेंद्रिय शेतीत, तणांनी जमिनीतून उचललेले तिलाच परत करून ‘तण देई धन’ हे नवे तथ्य निर्माण झाले. निसर्गात ‘कचरा’ नाही.

कचरा ही खास माणसाची निर्मिती. निसर्गातली प्रत्येक गोष्ट विघटनशील आहे. पुढच्या पोषणाची सामग्री आहे. लवकर विघटन होऊ न शकणाऱ्या वस्तूंनी आपले जीवन व्यापून टाकले आहे. या गोष्टी बाजूला करून, कुजू शकणाऱ्या वस्तू शेतात जाण्याची व्यवस्था केली, तर ‘स्वच्छ शहर आणि सुपीक जमिनी’ हे दुहेरी उद्दिष्ट साध्य होऊ शकते. मात्र हे शांतपणे, सातत्याने आणि प्रत्येकाने करायचे काम आहे. आधी कमीत कमी कचरा निर्माण करण्याचे आणि त्याची काटेकोर विभागणी करण्याचे नागरिकांनी मनावर घेतले तर पुढचे काम सोपे होते. ‘सुक्‍याबरोबर ओले जळते’ ही म्हण ठीक आहे, पण ओल्याबरोबर सुके नाही ना कुजत! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com