नाही चिरा, नाही पणती

नाही चिरा, नाही पणती

रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली.

एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे ऐकून होतो. एकदम लक्षात आले, की कुरबावीतल्या वामन आबाची लेक रेहकुरीत आहे. चला, दोरवा लागला.

फटफटीवर आबाला बसवले आणि संध्याकाळच्या वेळेला रेहकुरीत पोचलो. अचानक आलेल्या आम्हाला पाहून त्या सगळ्यांनाच आनंद झाला. त्यात लेखक मारुतराव वाघमोडे होते. मारुतरावांनी गावकरी मंडळी रात्री जमा केली. माझ्या लेखनाचा पाया ग्रामीण शेतकरी जीवन हाच असल्याने मला इतर लेखकाप्रमाणे रेहकुरीतील काळविटावर नुसते लिहायचे नव्हते, तर त्यांचा तेथल्या स्थानिक लोकांवर काय परिणाम झाला आहे, त्यांचा या प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांच्या काय सूचना, तक्रारी आहेत याचा मागोवाही घ्यायचा होता. सरकार या हरणासाठी एवढे धडपडते; पण आमची दखल घेत नाही. काळवीट पिकांचे नुकसान करतात. बरे, त्यांना दुकलून लावताना चुकून मेले तर सदोष वधाचा गुन्हा. बऱ्यापैकी पाणी असलेली विहीर अभयारण्यात गेलेली. गावाजवळच्या तळ्यात पाणी नसल्याने पाण्याचा प्रश्‍न बिकट. लोकांनी पीकपद्धतीत बदल केला. धणे हरण खात नाहीत म्हणून धणे लावले. त्याला बाजारपेठ मिळेना. मिळाली तर भाव नाही. लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. त्यात हरणाबरोबर ग्रामस्थांचे म्हणणेही तितक्‍याच प्रकर्षाने मांडले होते. बिबट्या पर्यावरणातला दुवा आहे.

तो जगला पाहिजे, हे शहरात सुरक्षित बसून लिहायला ठीक आहे. जुन्नर, कुकडी, भीमाशंकर डोंगरमाथ्याशी जी धरणांची साखळी आपण निर्माण केली. जलाशय निर्माण झाले. त्यामुळे बिबट्यांचा डोंगरमाथ्यावरून कळसूबाईपासून एकवीरा देवीपर्यंत मुक्तसंचार बंद झाला. ते पायथ्याकडे सरकले. उसाचे आयते संरक्षक क्षेत्र त्यांना गवसले. पण शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबाळांसह जीव मुठीत घेऊन कसे वावरावे लागते, हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. 

नंतर सहकाऱ्यांबरोबर रेहकुरी काळवीट अभयारण्याकडे निघालो. जीप करून आम्ही सिद्धटेक, राशीन करत रेहकुरीला पोचलो. जीप रेहकुरी गावाकडे घ्यायला सांगितली. अभयारण्य मागे टाकून जीप गावात पोचली.

पाहुण्यांच्या दारात जीप उभी राहिल्यावर सगळे बाहेर आले. वामनआबाची लेक बीना रानात गेली नव्हती. अजून सासू-सुना घरातच होत्या. घोंगड्या टाकल्या. स्त्री सहकारी आत जाऊन बसल्या. तिला माहेरची माणसे आल्याचा आनंद झाला. चहापाणी होईस्तोवर वाघमोडे व त्यांचे लाल मुंडासे बांधलेले वडील आले. नमस्कार चमत्कार झाल्यावर लाल मुंडासेवाल्याशी गप्पा मारताना आमची सुशिक्षित मंडळी चाट पडली. त्यांचे वाचन चांगले होते. आचार्य अत्रे, व्यंकटेश माडगूळकरांचे साहित्य त्यांनी वाचले होते. बीना आणि तिच्या सासूचा जेवूनच जा म्हणून आग्रह सुरू झाला. आम्हाला वेळ नव्हता. आम्ही सबबी सांगितल्या. त्यावर तिची सासू म्हणाली, ‘‘पाव्हणं तुमी एक पुन्यांदा याल पर ही माणसं कशाला आमच्याकडं पुन्यांदा येत्यालीऽ. सैपाक हुअील जेवा हरणं बघा मंग जा.’’ पण आमचा नकार ठाम होता. चहा झाला, गप्पा झाल्या. आम्ही सगळे जीपमध्ये बसून रेहकुरी अभयारण्याच्या गेटकडे जायला निघालो. एखादा किलोमीटर जीप पुढे गेली असेल अन्‌ पाठीमागे बसलेले सहकारी ओरडले, ‘थांबवाऽ एक बाई हाका मारतेय, तिला यायचेय काय रस्त्यापर्यंत.’ गावापासून मुख्य रस्ता बराच लांब होता. कर्जतला जाणारी एखादी म्हातारी हाका मारत असेल, असे आम्हाला वाटले. म्हातारी धापा टाकत जीपजवळ आली तर ती बीनाची सासू होती. आम्ही जेवत नाही म्हटल्यावर कवानुक रानात गेली होती. ओटाभर पेरू तोडून येईस्तोवर जीप जाताना दिसली म्हणून ती पळत होती. सगळे पेरू आमच्याकडे सोपवत म्हणाली, ‘‘जेवला न्हाई, निदान पेरू तरी खाचाल म्हणून आणलं की वोऽ’’ आमचे शहरी सहकारी गहिवरले. समाधानी चेहरा करून म्हातारी ‘जावा आता नितराशीन’ म्हणाली आणि वळाली. कसलीच अपेक्षा नव्हती. आपल्या सुनेच्या माहेरच्या माणसांच्या पोटात पेरू जावेत यासाठी ती हरणाच्या काळजाने धपापत आली होती. 

पुढे कळले, की म्हातारीला कॅन्सर झाला. वाईट वाटले. पण माळावरची ही बाभळीच्या खोडासारखी टणक म्हातारी त्यातून पार पडली. चांगली झाली. निसर्गाशी, हरणांशी, प्रपंचाशी त्या माळरानात झगडत राहिली. आता आता फोन आला मारुतरावचा, म्हातारी गेली, त्यांचे वडीलही गेले. दीर-भावजय दोघेही माळरानावर फुलले आणि माळरानावरच कोमेजून गेले. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या बीनाच्या सासूने अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. काळीज भरून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com