बांधावरच्या भाज्या

बसवंत विठाबाई बाबाराव
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

रोजगारासाठी लोक गाव सोडत आहेत. गावाबरोबर सुटतो त्यांचा आहार. खाण्याचा कस, चव आणि बहुविध वनस्पती. या रानभाज्या शहरात कुठे मिळणार? या सगळ्या बांधावरच्या भाज्यांच्या बलिदानावर आज शहरे उभी राहत आहेत.

रोजगारासाठी लोक गाव सोडत आहेत. गावाबरोबर सुटतो त्यांचा आहार. खाण्याचा कस, चव आणि बहुविध वनस्पती. या रानभाज्या शहरात कुठे मिळणार? या सगळ्या बांधावरच्या भाज्यांच्या बलिदानावर आज शहरे उभी राहत आहेत.

आमच्या शेताशेजारी मलन्नाचे शेत होते. त्याच्या व वडिलांच्या गप्पा व्हायच्या. वरण-आमटीमधील डाळींच्या वापरावरून एकदा चर्चा निघाली. त्यांना डाळी खूपच कमी लागतात, असे तो सांगत होता. वडिलांनी विचारले, ‘‘ते कसे?’’ मलन्ना सांगू लागला, पावसाळ्यात आपसूक उगवलेल्या कित्येक वनस्पती या भाजी म्हणून खाल्ल्या जातात. तांदूळसा, पाथरी, छोटी घोळ, मोठी घोळ, आघाडा, कुरडू, तरोटा, सुरण, केना या सगळ्या वनस्पतींची आलटून पालटून भाजी केली तरी आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी नवीन भाजी खायला मिळते. यातल्या काही भाज्या खूपच उपलब्ध असल्यामुळे त्या वाळवूनदेखील ठेवल्या जातात. या वाळवलेल्या भाज्या पुढे उन्हाळ्यात खाल्ल्या जातात.

गावात भाज्यांचा कंटाळा आला असे कधी होतच नाही. शेतात खुरपताना अनेक गोष्टी ज्या तण म्हणून बाजूला फेकल्या जातात, त्याची भाजी केली जाते. बांधावर कर्टुल्याची वेल सहज उगवून येते. या वेलीला सलग सहा महिने कर्टुल्या लागत राहतात. कर्टुल्याची भाजी केली जाते. त्यामुळे आज कोणती भाजी आणायची, ही डोकेदुखी संपायची. एखाद्याला डोकेदुखी असेल तर त्याला कर्टुल्याच्या पानाचा रस व मिरी एकत्रित करून डोक्‍याला चोळले तर डोकेदुखीही कमी होते. बांधावर जर दोन हादग्याची झाडे असतील तर त्याच्या फुलाची भाजी व भजी करून वेगळाच आनंद लुटता येतो. पहिल्या पावसानंतर सुरण उगवून आला नाही असे होतच नाही. सुरणाची कोवळी पाने आणि कंद भाजी म्हणून रुचकर आहेच. मूळव्याध मुळासकट घालवण्यासाठी ही भाजी खूपच उपयुक्त असते. 

सातवीनंतर मित्राने शाळा सोडली आणि मी शाळेसाठी गाव. पुढे मी शाळेत जात राहिलो आणि मित्र शिकत राहिला. आज गावी गेल्यावर मित्राला भेटून असा प्रश्न पडतो, की सातवी नंतर शाळा त्याने सोडली होती का मी? कारण चार भिंतीची शाळा सोडली असली तरी त्याने शिकणे कधी थांबवलेच नव्हते. गाव आणि शिवार यालाच त्याने शाळा केली होती. त्याच्या सोबत सहज शिवारात फेरफटका मारत असताना दिसेल त्या वनस्पतीचे महत्त्व तो सांगत असतो. काही भाजी म्हणून खाता येतील अशा; काही औषधी गुणधर्म असणारी. काही जनावरांसाठी उत्तम चारा, तर काही पक्ष्यांसाठी मेजवानी. काही औजारे बनविण्यास उपयोगी तर काही घर परिसर शोभिवंत करणारी. शेतातून घरी जाताना असे झुडूप शोधत शोधत जाणे हा गावकऱ्यांचा पावसाळ्यातील एक छंदच असतो. पोट गच्च होणे किंवा पोट साफ न होणे हे आजार शहरातच मोठ्या प्रमाणात दिसतात. कुरडू किंवा शंकरोबाच्या कोवळ्या पानाची भाजी अधूनमधून खात राहिले तर पोट साफ न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही भाजी कुठेही सहज उगवून येते. याची फुले मराठवाड्यात बदक्कमा या सणासाठी वापरतात. चारा म्हणून जनावरांनादेखील ही वनस्पती दिली जाते.

भोकराचे झाड आपल्या परिसरात असणे म्हणजे लहान मुले व जंगलातील माकड, खारूताई, पक्षी यांची मेजवानीच. भोकरे पिकतात तेव्हा झाडावर पक्ष्यांची शाळा भरते. खारूताई उत्साहात उड्या मारत असते. लहान मुले झाडाखाली घुटमळत भोकरे खात असतात. अर्धवट पिकलेल्या व कच्च्या भोकराचे लोणचे केले जाते. भोकराच्या कोवळ्या पानाच्या वड्यांना खूपच चव असते. भोकर फळामुळे खोकला, सांधेदुखी, घशातील जळजळ, लघवीतील जळजळ कमी होते. जेव्हा दवाखान्यांनी तालुक्‍याची सीमा ओलांडली नव्हती तेव्हा गावकुसातील कैक वनस्पती या प्राथमिक उपचार केंद्र म्हणून लोकांना कामी येत होत्या. आजही गावातील लोक या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. जुलाब थांबण्यासाठी लाजाळूच्या मुळी दह्यामधे वाटून प्यायला दिले की एक-दोन दिवसांत कमी होते. शेतात कापणीची कामे करताना हमखास बोट कापले जाते. कुठेही शेतात, बांधावर उगवलेल्या जखमजोडी किंवा घावटीच्या पाल्याचा रस लावला की लगेच रक्त थांबते. बिबा तर प्राथमिक आरोग्य केंद्रच समजला जातो. खोकला लागला तर बिब्याला सुईने दोन-चार टोचे मारून उकळत्या दुधात टाकून प्यायचे की खोकला गायब. निर्गुडीचा पाला, धोत्र्याचे फळ, बेशर्मीची पाने या अतिशय निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या वनस्पतीदेखील खूप औषधी आहेत.

हिंगोली भागात ‘पवन्या गवताचे तूप खाल्लो’ असे कुणी सांगते. सुरवातीला वाटले की, पवन्या हे वनस्पती तूप असेल. नंतर कळले की, पवन्या गवत खाल्लेल्या गुरांच्या दुधापासून जे तूप बनवले जाते त्याला ‘पवन्याचे तूप’ म्हणतात. या तुपाला वेगळी चव असते. हे इतर तुपापेक्षा पौष्टिक आहे, असे स्थानिकांचे निरीक्षण आहे. यासाठी कयाधू नदीच्या थडीवरील हे गवत जपण्याचे काम स्थानिक शेतकरी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article baswant vithabai babarao