वाचनसंस्कृतीस लिफ्ट

Datta-Tol
Datta-Tol

पुस्तकं वाचणं महत्त्वाचं. आपल्या अनुभवात अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची भर पडावी यासाठी पुस्तकं वाचायला हवीत. व्यक्त होण्याची कला शिकण्यासाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी वाचणं आवश्‍यक असतं. 

ऐका ग्रंथनारायणा, ही तुझी कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक सव्यसाची संपादक राहात होता. नाव अमरेंद्र गाडगीळ. अनेक दर्जेदार ग्रंथांचं संपादन, त्यातही कुमारांसाठीच्या पुस्तकांचं त्यांनी संपादन केलं. वाचन, चिंतन हा त्यांचा श्‍वास होता. ग्रंथप्रसार हा ध्यास होता.

वर्ष १९७४. ठिकठिकाणी ‘साहित्य जत्रा भरवा’ हा त्यांचा आदेश. बालसाहित्यात भगवत्‌गीता मानावीत अशा पुस्तकांची मी व सुधाकर प्रभू शाळांशाळातून ग्रंथजत्रा भरवू लागलो. ते आमच्यासाठी ग्रंथप्रसाराचं बाळकडूच होते. १९७६ मध्ये अमरेंद्रजींनी मराठी बालकुमार साहित्य परिषदेची स्थापना केली. संस्थेमार्फत एकेका घराण्याला पुरेल अशा दहा समित्यांची स्थापना केली. संमेलनापेक्षा हे कार्य मोलाचं आहे अशी त्यांची शिकवण. प्रत्येकी एक रुपया देणारी लाख मुले भेटवा, मी त्यांच्या आवडीचं ऐंशी पानी दर्जेदार पुस्तक मूळ पुस्तकातील सर्व चित्रे, रंगीत मुखपृष्ठ स्वरूपात पोचवतो, हे त्यांचं सांगणं आम्ही कार्यकर्ते कमी पडलो. प्रत्येक संमेलनात जेमतेम पाच हजार बालकांची नोंद करू शकलो. अमरेंद्रनी हार मानली नाही. फक्त पुस्तकाचा आकार लहान केला. त्यानंतर पंचवीस वर्षांनंतर मी पुस्तकाचा आकार तोच ठेवून पृष्ठसंख्या कमी करून पाच रुपयांत पुस्तक पुरवू लागलो. मुलांच्या हाती पुस्तकं देऊन त्याला वाचनाची गोडी लावली की त्याला आयुष्यभर वाचनाची सवय राहते. 
पुस्तकं ही गुरू असतात. 
पुस्तकं सखा असतात. 
पुस्तकं मनोरंजन करतात. 
पुस्तकं ज्ञान देतात. 
पुस्तकं हसवतात. 
पुस्तकं रडवतात.
पुस्तकं तुम्हाला बोलकी करतात.
पुस्तकं तुम्हाला मौन शिकवतात. 
हे सारं शाळेच्या वयातच कळत जातं. आता आम्ही पुढील टप्पा गाठायचं ठरवलं. म्हणजे ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रम राबवायचा. कोणत्याही एका शाळेस दोन ते तीन हजार रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून द्यावयाची. विद्यार्थ्यांनी ती पुस्तके वाचायची आणि नंतर त्या पुस्तकांच्या लेखकांना अथवा लेखकांच्या वारसदारांना निमंत्रित करायचे. म्हणजे गो. नी. दांडेकर यांच्या कन्या डॉ. वीणा देव किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या कन्या ज्ञानदा नाईक यांना बोलवायचे आणि त्यांच्याशी संवाद करायचा, अशी ती योजना. लेखक मुलांशी गप्पा करायला उत्सुक होते. नातू फौंडेशनचे आर्थिक साहाय्य त्यासाठी लाभले. आता माझं वास्तव्य सहकारनगरमधील तुळशीबागवाले कॉलनीत आहे. या भागात द. मा. मिरासदारांपासून डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत नामवंत साहित्यिक, तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णीपासून व्हायोलिन वाजवणारे प्रभाकर जोग यांच्यापर्यंत दिग्गज कलावंत आहेत. थोडक्‍यात, योगायोगाने हा परिसर लेखक कलावंतांची मांदियाळी असलेला आहे. त्यापूर्वी तीन वर्षे अगोदर मी ‘वाचाल तर वाचाल-नवी प्रतिज्ञा’ या ग्रंथखुणेचा (बुकमार्क) प्रसार सुरू केला. इथे राहायला आल्यापासून या बुकमार्क प्रसारातून वाचनसंस्कृतीचा प्रसार जोमाने सुरू केला. 
या कॉलनीच्या वरच्या टोकापासून मुख्य रस्त्यावर यायला अंदाजे अर्धा मैल लागतो. हे अंतर कापायला रिक्षा मिळणे अवघड. तेव्हा हा प्रवास मी दुचाकी अथवा चार चाकीची ‘लिफ्ट’ घेऊन करतो. अशा तऱ्हेने निघालो की माझी प्रश्‍नांची सरबत्ती सुरू होते. 
‘‘पुस्तक वाचता का?’’
‘‘सध्या काय वाचता?’’
‘‘नुकतंच कुठलं पुस्तक वाचलं?’’
लिफ्ट देणारी व्यक्ती पुस्तक वाचणारी असो किंवा नसो त्या इसमास ‘नवी प्रतिज्ञा-वाचाल तर वाचाल’ ही ग्रंथखूण किंवा एखादं पुस्तक भेट देतो. पुस्तक त्यांच्या घरातील बच्चे कंपनीसाठी असतं. लिफ्ट देणाऱ्याचा पाल्य इंग्रजी माध्यमातून शिकत असेल तर मी इंग्रजी पुस्तक देतो. ही ग्रंथखूण आजपर्यंत तीन लाख वाचकांनी वाचली आहे. ग्रंथखूण किंवा पुस्तक भेट देताना त्या व्यक्तीकडून ‘दररोज पुस्तकाची दोन-चार पानं वाचण्याचा प्रयत्न करीन, नंतर विश्रांतीला जाईन’, असा शब्द घेतो. लोक आनंदानं मान्य करतात व पुन्हा लिफ्ट देताना त्या अगोदर भेट दिलेल्या पुस्तकाची अथवा ग्रंथखुणेची आठवण सांगतात.या भागात ‘पुस्तक दिन’, ‘वाचक दिन’ असा दिनविशेष साधून वीणा देव, रवींद्र मंकणी अशा नामवंतांबरोबर ग्रंथदिंडी काढायची आहे. तीन तीन पिपाण्याचं वाद्य घेऊन स्वस्त पुस्तकाचं वाटप करायचं आहे. या योजनेला यश मिळेल ही खात्री. अशा या वाचनसंस्कृतीस लिफ्ट देणारी ग्रंथनारायणाची कहाणी सफळ संपूर्ण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com