दहीहंडी, दूरदर्शन आणि मी

डॉ. कांचनगंगा गंधे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कसलीच पूर्वकल्पना नसताना अचानक निरोप मिळाला, उद्याच ‘लाइव्ह’ कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम? काय स्वरूप आहे? कॅमेऱ्यासमोर प्रश्‍नच सुरू झाले. उत्तरे देत गेले. कार्यक्रमाचे शीर्षक दुसऱ्या दिवशी समजले.

कसलीच पूर्वकल्पना नसताना अचानक निरोप मिळाला, उद्याच ‘लाइव्ह’ कार्यक्रम आहे. कोणता कार्यक्रम? काय स्वरूप आहे? कॅमेऱ्यासमोर प्रश्‍नच सुरू झाले. उत्तरे देत गेले. कार्यक्रमाचे शीर्षक दुसऱ्या दिवशी समजले.

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळची साडेपाचची वेळ. मी लक्ष्मी रस्त्यावर. वरळीहून दूरदर्शनकडून फोन. मला नीट ऐकू येत नव्हते. अर्ध्या तासाने फोन करतो, पलीकडचा म्हणाला. घरी आले. फोन खणखणला. ‘मी ‘दूरदर्शन’मधून बोलतोय. उद्या दुपारी एक वाजता तुमचा ‘लाइव्ह प्रोग्रॅम’ आहे. योगेश्वर गंधेंनी कार्यक्रम ठरवलाय. एक नंबर देतो, त्यावर फोन करा, त्या बाई तुम्हाला सर्व सांगतील.’ ‘अहो, माझ्याकडे पत्र नाही, मला उद्या येता येणार नाही, अडचणी आहेत.’ ‘नाही, तुम्हाला यावंच लागेल, ‘दूरदर्शन’वर तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात सुरू आहे.’ फोन बंद. मी हवालदिल. अनुराधा मराठे, योगेश्वरला फोन लावत होते. अनुराधा म्हणाली, ‘रात्री अकरानंतर फोन करा.’ योगेश्‍वर साताऱ्यात होता. उद्या गाडी घेऊन येतो म्हणाला. घरी ८८ वर्षांच्या सासूबाई अंथरुणाला खिळलेल्या. सांभाळणारी बाई घरी गेलेली. उद्याची तयारी सुरू केली. सुदैवाने एका साडीला इस्त्री होती. रात्री अकरानंतर अनुराधाचा फोन. ‘उद्याच्या कार्यक्रमात वनस्पतीविषयक प्रश्‍नांना उत्तरे द्यायची आहेत. उद्या साडेअकरापर्यंत केंद्रात या, सविस्तर बोलू.’ फोन बंद. जगातल्या सर्व वनस्पती माझ्याभोवती फेर धरून, वाकुल्या दाखवत नाचत असल्यासारखे वाटायला लागले!

लवकर उठून आवरले. मंगळसूत्र, बांगड्या घालणार एवढ्यात सासूबाई उठल्या. त्यांचा चहा, इतर गोष्टी करण्यात अर्धा तास गेला. पुतणीला फोन केला. तिला साडेनऊशिवाय यायला जमणार नव्हते. योगेशची घाई. साडी बॅगेत टाकली, छत्री घेतली. घराला कुलूप लावले. निघालो. वनस्पतिशास्त्र केवढे अफाट आहे, याची जाणीव झाली. रवींद्र आणि योगेश आरामात गप्पा मारत होते. लोणावळ्याजवळ लक्षात आले, मंगळसूत्र, बांगड्या घरीच विसरल्या. ‘दादरला काही दुकाने आहेत, तिथे घेऊ’, इति योगेश. दादर आले.

सगळी दुकाने बंद. एकच दुकान उघडे होते. पाच मिनिटांत मंगळसूत्र, बांगड्यांची (अर्थातच खोट्या) खरेदी झाली. बांगड्यांचा सगळ्यात छोटा ‘वीड’ कोपरापर्यंत जात होता. मंगळसूत्राचा ‘फास’ मला- रवींद्रला लावता येईना. शेवटी दुकानदारालाच फास लावायला सांगितला. तो चकाचौंध! अशी त्याची पहिलीच वेळ असावी. तिथून निघालो. तेव्हा कळले, आज दहीहंडी. मुंबईत लहान मंडळे सकाळीच दहीहंडी साजरी करतात. प्रत्येक रस्ता माणसांनी, वाहनांनी फुलून गेला होता. वाहतूक वळवण्यात येत होती.

एव्हाना साडेअकरा वाजून गेले होते. योगेशने एका बोळातून गाडी नेली. वरळीत पोचलो. ‘दूरदर्शन’ अजूनही दूरच होते. वाहतूक जागच्या जागीच. पाऊस सुरू झाला. ‘गाडीतून उतरा आणि सरळ चालत जा, डाव्या हाताला ‘दूरदर्शन’ लागेल’, इति योगेश. गाडीतून उतरले. छत्री गाडीतच राहिली. बॅग घेऊन केंद्रावर पोचले. सव्वाबारा झाले होते. माझ्याकडे ना पत्र, ना कुणी ओळखीचे. कुणीच आत सोडेना.

‘एक वाजता लाइव्ह कार्यक्रम आहे’, इति मी. एका झाडूवालीला दया आली. ती चौथ्या मजल्यावर घेऊन गेली. एका खोलीत साडी नेसायला गेले. डोके पावसाने चिप्प झालेले! अवतारात अजूनच भर. खोलीतून बाहेर आले. समोर अनुराधा पूर्ण मेकअप करून तयार होती. ‘तुम्हीच का?’ ‘हो, लवकर आमच्याच इथल्या मेकअप मॅनकडून मेकअप करून घ्या.’ ‘मी मेकअप करणार नाही.’ ती आश्‍चर्यचकित! ‘नक्की काय कार्यक्रम आहे?’ असे विचारेपर्यंत कुठल्यातरी अंधाऱ्या खोलीत ती घेऊन गेली. साडेबारा वाजले होते. एक टेबल, दोन खुर्च्या, वर एक ट्यूबलाइट आणि एक पिवळा बल्ब. मी खुर्चीत स्थानापन्न. ‘इकडे बघा,’ अंधारातून आवाज आला. ‘नक्की कुठे’, इति मी. ‘तुमच्यासमोर मॉनिटर ऑन होईल. आवाजाची टेस्ट करायचीय. अनुराधा, तुम्ही त्यांना प्रश्‍न विचारा, त्या उत्तर देतील,’ शेवटी एकदा आवाजांची लेव्हल जुळली. दोघींना खुर्चीत एकेक उशी दिली गेली. आम्ही उंच झालो. माझ्या घशाला कोरड पडली; पण तिथे पाणी नव्हतेच. ‘कार्यक्रमाची रूपरेषा तरी सांग,’ माझी अनुराधाकडे भुणभुण सुरूच होती. तिचे मात्र, मी लिहिलेली पुस्तके आणि रवींद्रने काढलेली जलरंगातली चित्रे किती उंचीवर धरली तर ‘दूरदर्शन’च्या पडद्यावर दिसतील याचे मोजमाप चालले होते.

‘गंधे मॅडम, तुम्ही पदर पसरून बसा,’ अंधारातून आवाज. मी कालपासून पदर पसरला होता. ‘मॅडम, आपल्या कार्यक्रमाअगोदरचे म्युझिक वाजतेय, ताठ बसा’, इति अनुराधा. आता माझेच म्युझिक वाजायचे राहिले होते. कार्यक्रम सुरू झाला. कृत्रिम नमस्कार, ओळख करून दिली गेली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वनस्पतींबद्दलचे प्रश्‍न विचारले जात होते. खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवून उत्तरं देत होते. महाविद्यालयात ‘व्याख्याती’ असल्यामुळे एक तास कधी संपला कळलेच नाही. कार्यक्रम संपला! हुश्‍श! 
दुसऱ्या दिवशी तोच कार्यक्रम ‘दूरदर्शन’वर पुन्हा लागला तेव्हा कळले, की कार्यक्रमाचे शीर्षक होते - ‘पावसाळी रानभाज्या’. तोपर्यंत त्या कार्यक्रमाने माझ्या दहीहंडीतले दही संपवले होते! 

Web Title: muktpeeth article dr. kanchanganga gandhe