धावत्याला शक्ती येई...

Hemant-Vavale
Hemant-Vavale

वयाची चाळिशी गाठलीही नव्हती आणि उतरणीच्या घाटात असल्यासारखे वाटू लागले. धावू लागलो आणि पुन्हा बळ मिळाले.  

जगात अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, मनुष्याच्या शरीराची रचना ज्या पद्धतीने उत्क्रांत होत गेली आहे, जो काही आकार, लांबी-रुंदी आपणास मिळाली आहे त्या सर्वांचा विचार करता मनुष्याने लांब पल्ल्याचे अंतर धावावे, हे बरे. आपल्या कंबरेचा आकार, पायाची लांबी, आपली शॉकॲब्सॉर्बिंगची क्षमता, मणक्याची रचना, आपली घाम बाहेर टाकणारी त्वचा ही सारी लक्षणे आपल्याला एकच गोष्ट सांगतात, ती म्हणजे आपण बनलो आहोत ते धावण्यासाठीच. मी किती वेगाने पळतो ते दुय्यम.

मी धावतो आहे हे महत्त्वाचे. धावण्याने मला गाढ झोपेचा अनुभव मिळतो. निसर्गाने ज्या कारणासाठी आपल्या शरीराची रचना जशी केली आहे तशी वापरली जावी म्हणून धावावे, असे मला समजले. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारली, दिवसभराच्या कामामध्ये अचूकता येण्यामध्ये मदत झाली, मन सर्वकाळ प्रसन्न राहू लागले, देहबोली आकर्षक बनली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाची ताकद वाढल्यामुळे मी सतत कर्म करण्यास तत्पर राहू लागलो.

मी एक जानेवारी २०१९ रोजी धावण्याचा संकल्प केला. वर्षाच्या शेवटपर्यंत आठवड्यातून किमान पाच दिवस तरी धावलो. आपण जेव्हा एखादा संकल्प करतो, तो पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो व ठरलेल्या कालावधीमध्येच हा संकल्प पूर्ण करतो तेव्हा स्वतःवर मिळविलेल्या या विजयाचा आनंद वेगळाच असतो. गतवर्षी माझे वजन ९२ किलो होते. म्हणजे प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त होते. त्याचे खूप सारे दुष्परिणाम मी अनुभवले. आपले उतारवय सुरू झाले आहे की काय असे वाटण्यास सुरुवात झाली होती, तेदेखील वयाच्या ३९ व्या वर्षीच. पण जेव्हापासून धावणे सुरू केले तेव्हापासून मी एका वेगळ्या स्वातंत्र्याचा, तजेल्याचा, उत्साहाचा अनुभव घेऊ लागलो. गतवर्षात मी पंधराशे किलोमीटर अंतर धावण्याचा टप्पा गाठला आणि मी एक धावक बनलो. लक्षात घ्या, ‘धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे...’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com