खोटे बोलल्याची शिक्षा

Jayashri-Kolhe
Jayashri-Kolhe

आयुष्यात कधीतरी मोह होतो. लहानपणी तर मोह टाळणे कठीणच होते. मोहापायी खोटे बोलले जाते. त्यामुळे न बोलता मिळालेली शिक्षा भयंकर असते. आयुष्यभर बोचत राहणारी.

आम्ही भावंडे नऊ. पाच भाऊ, चार बहिणी. पूर्वी कुटुंबे मोठी असत. ‘हम दो, हमारे दो’ ही पद्धती नंतर आली. आता तर कुटुंब त्रिकोणीच झाले आहे. त्यामुळे त्या मोठ्या कुटुंबाची कल्पना करणे अवघडच. राहून राहून आजही असे वाटते, लहानपण दे गा देवा, त्या जुन्या आठवणी. मला आठवते, त्यावेळेला मी बारा-तेरा वर्षांची असेन.

मला अमिताभ बच्चनजी खूप आवडायचे. अजूनही आवडतात. त्यावेळेला तशी आमची परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यातच दुष्काळ पडलेला. इचलकरंजी माझे गाव. मागावर सूत विणायचे काम करायचे माझे वडील आबा आणि तीन भाऊ. दादा, अण्णा, अप्पा. पण तेही काम बंद पडले. मग पोटाची चणचण भासू लागली. माझी मोठी बहीण (अक्का) धुणी- भांड्याची कामे करून घरी जेवण मिळेल ते आम्हाला सर्वांना वाढायची. मग थोड्या दिवसांनी हातमाग चालू झाले. आज दोघांना, तर उद्या दोघांना सूत विणायचे काम मिळायचे. त्या वेळेला रेशन कार्डवर ‘मिलो जोंधळा’ मिळायचा. माझी आई तो लाल जोंधळा आणायची आणि आठवडाभर पुरवायची. दररोज अकरा भाकऱ्या करायची. आम्हा लहानांना लहान भाकरी बनवायची. आम्ही नऊ भावंडं आणि आई व आबा अशा एकूण अकरा भाकऱ्या करायची. पण माझी आई आम्हा सर्वांना जेवायला देऊन राहिले तर जेवायची, नाहीतर पाणी पिऊन उपाशी झोपायची. जसे मला समजायला लागले तसे मी मोठ्या भावांना सांगितले, की आई आपल्याला प्रत्येकी एक भाकरी बनविते. कारण ते पीठ तिला आठवडाभर पुरवायचे असते. तुम्ही दोघांनी परत भाकरी मागितली, की आपली भाकरी तुम्हा दोघांना अर्धी अर्धी देते व स्वतः मात्र उपाशी झोपते. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. त्या वेळी भूक असूनसुद्धा बाजार आणायला पैसे नसायचे. शुक्रवारी पगाराचा दिवस. फक्त शुक्रवारी आम्हाला भात खायला मिळायचा. आठवड्यातून एकदा भात खायला मिळायचा म्हणून आम्ही शुक्रवार येण्याची वाट पाहायचो. त्यातच मला अमिताभजींचे चित्रपट पाहायचे वेड होते. माझ्या चार क्रमांकाच्या भावालाही चित्रपट पाहायचे खूप वेड होते, त्यामुळेच माझ्याकडून गैर घडले.

भावाला चित्रपट पाहायचा होता. तो मला म्हणाला, की तुला बच्चनजी आवडतात ना? त्यांचा ‘शोले’ हा चित्रपट टॉकीजला लागला आहे. मी म्हणाले, ‘‘आपल्याकडे पैसे कुठे आहेत?’’ शोले चित्रपट बघायचाच असे त्याला वाटत होते. त्याने मला एक युक्ती सांगितली. मी व माझी ताई एकाच वर्गात होतो. भाऊ म्हणाला, ‘‘माझ्याकडे पन्नास पैसे आहेत. तेव्हा तू दादाकडून तुम्हा दोघींना शाळेत प्रत्येकी एक रुपया भरायला सांगितलाय म्हणून सांग. म्हणजे आपल्या तिघांचे अडीच रुपये होतील. तिकिटाचे प्रत्येकी पंच्याहत्तर पैसे असल्याने आपण ‘शोले’ पाहून येऊ.’’ 

पण घरी खोटे बोलायचे धाडस होत नव्हते आणि अमिताभजींचा चित्रपट तर पाहायचाच होता. मग घरी खोटे बोलून दादाकडून दोन रुपये घेतले. शुक्रवारी आम्ही तिघे चित्रपट पाहायला गेलो. दप्तर घेऊन घरातून बाहेर पडलो. सकाळी दहाचा ‘शो’ पाहिला. खूप आनंदाने आम्ही एक वाजता घरी आलो.

येते वेळी मी ताईला म्हणाले, ‘‘आज शुक्रवार आहे. आज भात खायला मिळणार.’’ दप्तर ठेवले. खोटे बोलल्यामुळे काळजाचे पाणी पाणी झाले होते. हात- पाय धुऊन जेवायला बसलो. आईने आम्हाला भाकरी आणि कांदा खायला दिला. खाऊन झाल्यावर मी आईला विचारले, ‘‘आई विसरलीस का? आज शुक्रवार आहे. भात अजून का वाढत नाहीस?’’ तर आई म्हणाली, ‘‘नाही बाळांनो, मी विसरले नाही. तांदूळ आणायचे दोन रुपये होते, ते दादाने तुम्हा दोघींना शाळेत भरायला दिलेत ना, त्यामुळे या शुक्रवारी आपल्याला भात करता येणार नाही.’’ 

आईचे हे शब्द ऐकून माझी बोबडीच वळली. आम्ही तिघे एकमेकांच्या तोंडाकडे पाहात होतो. आम्ही खोटे बोललो होतो, त्यामुळे घरातील कोणालाच आज भात मिळणार नव्हता. हे आपल्यामुळे घडले. अमिताभजींचा चित्रपट पाहण्याचा झालेला आनंद आता निर्भेळ उरला नव्हता. तेव्हा मनाशी ठरवले, की आजपासून खोटे बोलायचे नाही. कधीच नाही. तेव्हापासून खोटे बोलले नाही, तरीही आज कधी दूरचित्रवाणीवर ‘शोले’ दिसला, तर खोटे बोलल्याची त्यावेळची बोच आत कुठेतरी बोचतेच पुन्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com