काईझेन, आपण आणि पण..

Madhusudan-Thatte
Madhusudan-Thatte

एकदा मी पत्नीला स्वयंपाकघरात थोडा बदल सुचवत होतो; पण अंगाशी आलं ते माझ्याच..
  ‘‘तुम्ही तुमचे इंजिनिअरिंगचे सल्ले या उंबरठ्याबाहेर ठेवा. इथे लुडबुड करू नका!’’ असे कडक शब्द कानी आले. माझा अनुभव आहे की, ‘बदल’ म्हटले की नेहमीच विरोध किंवा थोडी तरी रुष्टता असतेच. घरात असो वा कारखान्यात. कोणालाच आपल्या ‘नियमित’ कामात बदल नको असतो. त्यांना ती त्यांच्या कामातील ढवळाढवळ वाटते. आमच्या कारखान्यात जपानी तज्ज्ञांनी जेव्हा ‘काईझेन’ ही कल्पना मांडली, तेव्हा विरोध म्हणावे असे नाही घडले; पण भुवया वर गेल्याच काही जणांच्या...

.. तर जपानी इंजिनिअर कामाला लागले. नमुना म्हणून एक लहान मशिन शॉपचा कोपरा घेतला. चालू काम बंद न करता शिफ्टच्या वेळात लेआउटमध्ये जे जे करता येईल, ते त्यांनी केले. एक एक सूचना आल्या:

- कच्चा माल ज्या मशिनसाठी असतो, तो अगदी मशिनजवळ ठेवावा...‘ये-जा’ करण्यात वेळ जातो.

- हे जड फोर्जिंग कामगारांनी दर खेपेस उचलून मशिनवर घालण्यापेक्षा त्या साठवणीच्या जागेपासून मशिनपर्यंत एक उतार करा आणि येऊ दे घरंगळत एक एक फोर्जिंग मशिनपाशी.

- हे दोन कामगार दोन मशिनसाठी काम करताहेत. मशिनिंग होत असताना दोघांनाही तेवढी मिनिटे काम नसते. नुसते उभे असतात. त्यापेक्षा एक कामगार दोन्हीही मशिन आळीपाळीने सांभाळू शकतो. शेजारी शेजारी मशिन ठेवा. इथे मोकळा वेळ मिळाला की त्या मशिनवर आणि तिथे मिळाला की या मशिनवर. 

आम्ही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते; पण एका अटीवर. चालू काम थांबवायचे नाही. मग तुम्ही रात्रभर या आणि करा काय ते. आम्ही सगळे अन्य साहाय्य नक्की करू. जपान्यांनी पंधरा दिवसांत एक एक करत सगळे विभाग असे बदलून टाकले. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल; पण कामगार कमी लागून उत्पादन वाढलेले दिसले. कारण, थोडा थोडा वेळ वाचत होता. शिवाय कामगारांच्या शक्तीचा जड फोर्जिंग उचलण्यात अपव्यय होत नव्हता. 
कामगार म्हणू लागले, ‘हे आधी आपल्याला का नाही सुचले...?’ आणि त्यांना नवी दृष्टी आली.

खरं तर हे स्वाभाविकपणे सुचायला हवे होते, इतके सोपे बदल झाले होते. यामागे अगदी सोपे तत्त्व आहे. ‘प्रत्येक काम अधिकाधिक चांगले, कमी शक्ती लागावी, असे आणि कमी वेळात करता येतेच...हा ‘येतेच’मधला ‘च’ जपान्यांनी आमच्या मनावर चांगलाच बिंबवला. प्रत्येक काम वेळ-पैसा-शक्ती या मूलभूत गोष्टी कमी कमी वापरून करता येते, हे आम्ही, कामगारांनी अनुभवले. 

काईझेन तत्त्व आवडलेले पाहून जपान्यांनी कामगारांमध्ये आणखी एक जपानी तत्त्व हळूच सोडले... स्मॉल ग्रुप ॲक्‍टिव्हिटी. कामगारांनी एकत्र यायचे. विभागातला एखादा प्रश्न हेरायचा. त्याला ऐरणीवर घ्यायचे. प्रश्न सोडवण्यासाठी ज्याला जे सुचेल ते त्याने लिहायचे. मग त्यावर चर्चा. त्यातून एखादी सूचना उचलायची, त्यात आता सर्वांनी विचार करून सुधारणा करता येते का, ते पाहायचे आणि अखेरीला वरिष्ठांच्या पुढे तो बदल मांडायचा. खूप खूप आवडली ही कल्पना कामगारांना. त्यांना महत्त्व मिळाल्याचाही आनंद होताच.

हे पटवून द्यायला जपान्यांनी कामगारांना एक प्रात्यक्षिक करून दाखवले.
त्यांनी एक टॉवेल पाण्यात भिजवून आणला. एका किरकोळ अंगकाठीच्या कामगाराला तो पिळायला सांगितला. जमला तेवढा त्याने तो पिळला. मग जरा धट्ट्याकट्ट्या कामगाराला सांगितला. त्याने जरा आणखी पाणी काढले त्यातले. आता त्या गलेलठ्ठ जपान्याने तो टॉवेल पिळायला घेतला... आणखी पाणी काढले त्यातून.

सारे कामगार हसायला लागले. त्यांना हे खूप पटलेले दिसले. खरंच जर विचार केला तर अगदी छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींपासून ते समोर येणाऱ्या प्रत्येक कामात, कामाच्या पद्धतीत आपण चांगला बदल करू शकतो. एखादा चाणाक्ष शिंपी बघा, एकाच कापडात सदरा तर बेतेलच; पण बघेल, त्याच कापडातून जरा वेगळे बेतायचे ठरवून एखाद दुसरा रुमाल काढता येईल का.... प्लायवूड वापरणारा चाणाक्ष सुतार एका ठराविक आकाराच्या प्लायवूडमध्ये आणखी काय काय निघेल, याचा विचार करत असतो.
त्यांना पटले तर बायकोला का नाही पटणार, म्हणून मी खरा स्वयंपाकघरात ‘बदल’ करायला गेलो..
पण..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com