पाण्याचा वेढा

मालती दाते
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

रात्री झोप लागत नाही हा एरव्ही त्रासाचा, पण त्या रात्री जागी असल्यानेच पाण्याने वेढल्याचे कळले. अन्यथा काय ओढवले असते, देव जाणे! 
- मालती दाते

रात्री झोप लागत नाही हा एरव्ही त्रासाचा, पण त्या रात्री जागी असल्यानेच पाण्याने वेढल्याचे कळले. अन्यथा काय ओढवले असते, देव जाणे! 

संध्याकाळी मस्तपैकी मी फिरून आले. थोड्याच वेळात गडगडाट सुरू झाला आणि पावसाने थैमान सुरू केले. आला तो गर्जतच. धबाधबा कोसळू लागला. थोड्याच वेळात दिवे गेले आणि सगळीकडे काळाकुट्ट अंधार.

सहकारनगरमधील पुणे विद्यार्थिगृहाच्या ‘शतायु भवन’मध्ये सर्वजण आपापल्या खोलीत झोपून गेले. मला झोप येत नसल्याने जागीच होते. खोलीचे दार बंद करून त्याला केवळ स्टूल लावून ठेवले. थोड्या वेळातच स्टूल हालले. तरीपण त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा पडूनच राहिले. तर पुन्हा अर्ध्या-एक तासात स्टूल जोरात ढकलले गेले. कोण आले एवढ्या काळोखात, म्हणत पाहिले तर दार उघडलेले. कॉटवरून उठले, पाय खाली सोडले तर पाय पाण्यात! म्हणजे खोलीत पाणी आले तर. बाहेर पडले. पाहते, तर संपूर्ण चौक पाण्याने भरलेला. पाणी गुडघ्यापर्यंत आलेले. जोरजोरात ओरडत राहिले, ‘‘पटवर्धन मॅडम, उठा, पाणी आले.’’ सर्व लोकांना ओरडून सांगत होते, ‘उठा पाणी आले.’ दहा मिनिटे ओरडत होते. मग तिसऱ्या मजल्यावरील दोन-तीन मुली बाहेर आल्या, त्यांनी विजेरीने प्रकाश टाकला. त्यांना ओरडून सांगितले, ‘‘अगं, खाली या. पाण्याने वेढले आहे.’’ शेजारील खोलीतील गिरजे, गोखले, तसेच झोपलेल्या इतरांना ओरडून उठवत होते. तोवर भालेराव बाहेर आले.

त्यांना पाणी दिसले, गंभीरता ध्यानी आली. त्यांनी पटवर्धन मॅडमना उठविले. बाहेरचा गलका आता वाढला होता. त्यासरशी हळूहळू एकेक जण उठून बाहेर आले. मग वरच्या मजल्यावरील मुली खाली आल्या आणि त्यांनी एकेकाला धरून वरच्या मजल्यावर नेले. आत्तापर्यंत पाणी वाढतच होते.

हळूहळू गळ्यापर्यंत पाणी चढले.  तळमजला पाण्याखाली जात होता. जर मला कळले नसते, तर तळमजल्यावरच्या लोकांच्या लक्षात आले नसते. कॉटवर झोपलेले केव्हाच गुदमरून गेले असते. मला झोप लागत नाही हा एरवी माझा त्रासविषय, पण या वेळी तोच फायद्याचा ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article malati Date

टॅग्स