माहेरपण विहिणीचे

Nilima-Radkar
Nilima-Radkar

एखाद्या बाईनं दुसऱ्या बाईचं मन जपणं हेच विशेष आहे, ते निरागसपणे व्हायला पाहिजे.

सुभद्रा बरीच वर्षं आमच्यासह ३-४ घरी काम करते. एरवी कामाला फारशी सुटी न घेणारी ती दरवर्षी दिवाळीत हटकून १५ दिवस आणि पूर्ण मे महिना सुटी घेतेच. गावाला जाऊन आल्यावर मी तिला म्हटलं, ‘‘अगं, बायका माहेरी जाऊन आल्यावर वजन वाढतं आणि तू बारीक कशी होतेस?’’ 

त्यावर ती म्हणाली, ‘‘लग्नानंतर मीसुद्धा माहेरी जाऊन आराम करायचे. आमची ना शेती ना वाडी, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी केली तर चूल पेटणार. सासरी थोडीफार शेती आहे; पण राबावं लागतच. माझी आई तरीही हौसेनं माझं माहेरपण करायची. आता आई थकली आहे. सासू त्याच गावात राहते, तीही थकली आहे. म्हणून मी मे महिन्यात पंधरा दिवस आईकडे आणि १५ दिवस सासूकडे जाते. माझ्या बहिणीला आणि नणंदेलाही बोलावून घेते. त्यांना कोणतं काम करून देत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना, की मी सगळी दमणूक विसरते. दिवाळीत मात्र आम्ही एकमेकींना मदत करतो.’’ तिच्या बोलण्याने मी आश्‍चर्यचकित झाले. ती इतका सुंदर विचार करत असेल याची मला कल्पनाच नव्हती. नकळतच मी तिला म्हणाले, ‘‘ग्रेट गं सुभद्रा! केवढं मोठं मनं आहे तुझं; पण तुला हे कसं सुचलं गं?’’ 

सुभद्रा हसून म्हणाली, ‘‘धा वर्षांपूर्वी सासू पाठदुखीनं आजारी झाली. तिला पूर्ण आराम द्यायचा होता. पोरांच्या परीक्षा तोंडावर आल्या म्हणून आम्हाला कळवलं नाही. तवा माझी आई सासूकडे राहायली गेली. सासूला बरं वाटेपर्यंत तिनं घर सांभाळलं. नंतर माझी सासू आईकडे गेली आणि तिला म्हणाली, बाये, तुजी लई मदत झाली गं. माज्या लेकाचं लगीन सादेपणानं केलं म्हणून मी तुला काहीबाही बोलले; पण ते विसरून तू आली.’’ आई म्हणाली, ‘‘जाऊ द्या हो. आमच्याकडं पैसा नसंल; पण प्रेम आणि माणुसकी आहे ना. कष्टानं कुणासाठी करण्यातपण सुख असतंया.’’ 

तवा सासू आईला म्हणाली, ‘‘अगं, तू बहिणीच्या मायेनं माजी सेवा केलीस. आपलं नात विहिणीचं नाही तर बहिणीचं हाये. बहिणीच्या हक्कानं तू आता माजाकडं माहेरपणाला यायचं. धा वर्षं त्या नेमानी एकमेकींचं माहेरपण करतात. त्यावरूनच मला बी अस सुचलं.’’ 

सुभद्राचं हे बोलणं ऐकून मी अवाक् झाले. आई, बहीण, भावजय, सासू, जाऊ, नणंद आणि चक्क विहिणीचंही माहेरपण करण्याची कल्पनाच किती विशेष आहे. कोणताही आव न आणता, प्रदर्शन न करता सहजपणे त्या हे करत होत्या. परिस्थितीमुळे शाळेचा वाराही न लागलेल्या त्या साऱ्याजणी मला अधिक सुशिक्षित आणि सुसंस्कृत वाटतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com