झाडांचे गाव

प्रदीप जोशी
सोमवार, 9 जुलै 2018

झाडे लावा, मुली जगवा-शिकवा, हे सूत्र पिपालात्रीची ख्याती डेन्मार्कपर्यंत घेऊन गेलं.

राजस्थानमधील पिपालात्री गावच्या सरपंचांच्या लक्षात आले, की त्यांच्या गावात मुली म्हणजे एक ओझे समजण्यात येते. गरिबीमुळे त्यांच्या शिक्षण आणि लग्नाचा खर्च करणे कठीण आहे. स्त्रीभ्रूणहत्या, गर्भपात आदींच्या द्वारे मुलींचा जन्म होऊ देत नाही. ही परिस्थिती पाहून सरपंचांना फार वाईट वाटत होते. त्यांनी सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ‘किरण निधी योजना’ सुरू केली. 

या योजनेनुसार गावात मुलगी जन्माला आली की तिच्या पालकांकडून दहा हजार रुपये घेतले जातात. काही दानशूरांच्या मदतीने मुलीच्या नावे एकवीस हजार रुपये पंधरा वर्षांच्या मुदतीची ठेव बॅंकेत ठेवली जाते. मुलगी मोठी झाल्यावर, मुलीच्या उच्च शिक्षणाकरिता किंवा लग्नाकरिता सुमारे एक लाखाची रक्कम उपलब्ध होते. 

मुलगी जन्मल्यावर पालक गावात लहान-मोठी १११ झाडे लावतात, त्यांना काळजीपूर्वक वाढवितात. पूर्ण वाढ झाल्यावर ती झाडे गावाच्या मालकीची होतात. झाडे मोठी झाल्यावर त्यांची किंमत प्रत्येकी एक लाख धरली तरी एकूण रक्कम सुमारे एक कोटीच्या आसपास होते. शिवाय झाडांची मुळे जमिनीत खोलवर गेल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. गावाची वर्षभराची पाण्याची समस्या मिटली. झाडांपासून मिळणारा अमूल्य प्राणवायू वेगळाच. आजपर्यंत सुमारे तीस लाखांवर झाडे लावण्यात आली आहेत. यांत कोरफड आहे. त्यापासून जाम, जेली बनविण्यात येतात. त्यामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.  

युनियन बॅंक ऑफ इंडियाने पाच वर्षे तीनशे मुलींच्या शिक्षणाकरिता साठ लाख रुपयांची मदत केली. दरवर्षी बारा लाख रुपये बॅंकेने मुलींचा गणवेश, पुस्तके, बूट, स्कूलबॅग आदीसाठी खर्च केले. कुटुंबांत कोणीही गर्भपात करणार नाही, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही, बालविवाह करणार नाही, मिळालेली मदत मुलीच्या उच्च शिक्षणाकरिता, विवाहासाठी खर्च करण्यात येईल, या अटीना मुलीच्या पालकांकडून स्टॅंप पेपरवर संमती घेतली जाते. हे गाव ‘झाडांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध पावले आहे. डेन्मार्कच्या शालेय पुस्तकांत या गावाबद्दल एक धडा अभ्यासाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth article Pradeep Joshi