आनंदवारी

प्रदीप जोशी
सोमवार, 8 जुलै 2019

एक दिवस पालखीबरोबर चालायचे. वारकरी होऊन वारकऱ्यांत मिसळायचे. वय विसरायला होते. ती आनंदऊर्जा पुढे कितीएक दिवस पुरते.

एक दिवस पालखीबरोबर चालायचे. वारकरी होऊन वारकऱ्यांत मिसळायचे. वय विसरायला होते. ती आनंदऊर्जा पुढे कितीएक दिवस पुरते.

‘माउलीसेवा’ हा सेवाभावी कार्यकर्त्यांचा एक समूह. वारी सुरू झाल्यावर साधारणतः पहिल्या शनिवारी किंवा रविवारी या गटाकडून एक दिवसाची आनंदवारी घडवली जाते. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या आनंदवारीत साडेचारशे जण सहभागी झाले होते. त्यांपैकी साधारण शंभर जण नवीन म्हणजे पहिल्यांदाच आले होते. गेल्या रविवारी सासवड ते जेजुरी अशी अठरा किलोमीटर पालखीबरोबर वाटचाल केली. पहाटेच पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून बसगाड्या निघाल्या. पालखी सासवडहून निघताना आम्ही पोहोचलो. वारीच्या मार्गाची आणि जेजुरीत वारीनंतर कुठे एकत्र जमायचे, याची माहिती प्रत्येकाला देण्यात आली होती. अल्पोपाहार, दुपारच्या भोजनाचा डबा आणि बिसलेरी पाण्याची बाटली गाडीतच देण्यात आली. जे पूर्णवेळ चालू शकणार नाहीत अशांसाठी एका वेगळ्या बसमध्ये व्यवस्था होती.  

पालखीबरोबर सगळ्यांना एकत्र चालणे केवळ अशक्‍य होते. प्रत्येकाने सोयीचा गट बनविला. साऱ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या, खंडेरायाच्या जेजुरीनगरीत माउलींच्या पालखीने संध्याकाळी प्रवेश केला. भंडाऱ्याची मुक्त उधळण केली गेली. सारा परिसर सोन्यासारखा पिवळाधमक झाला. टाळ-मृदंगांच्या तालावर विठुनामाचा गजर आणि येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गाड्या पुण्याकडे निघाल्या. डोळे मिटले तरी सतत वारकऱ्यांचे न थकणारे पाय दिसत होते. पुण्यात पोहोचल्यावर सगळ्यांना गरमागरम खिचडीचा डबा देण्यात आला. या वर्षी वृक्षपालकत्व योजना राबविण्यात आली. या वेळी सगळ्यांना एक झाड दत्तक देण्यात आले. आम्ही सर्व त्याचे पालक झालो. एका झाडाचे पालकत्व एका व्यक्तीकडे असेल. झाडाच्या वाढीची माहिती दरमहा द्यायची. एखादे झाड जगले नाही, तर तेथे दुसरे झाड लावण्यात येईल. म्हणजे यंदा साडेचारशे झाडे जगवली जातील. या आनंदवारीचा कोणताही खर्च मागितला जात नाही. एक पेटी फिरविण्यात येते. त्यात स्वेच्छेने पैसे टाकायचे. ही जमा झालेली सर्व रक्कम सार्वजनिक कार्याकरिता खर्च केली जाते. दिवसभर वारी अनुभवून घरी गेलो; पण मनात हरिनामाचा गजर सुरूच होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Pradeep Joshi