स्पर्श सर्वस्पर्शी

प्रमिला गरुड
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

जन्मल्यापासून अखेरपर्यंत माणसाला, प्राण्यांना हवा असतो स्पर्श. मायेचा, प्रेमाचा, विश्‍वासाचा, श्रद्धेचा स्पर्श. झाडांना गोंजारा, ती बहरून येतील. प्रत्येकजण स्पर्शाचा भुकेला असतो. 

जन्मल्यापासून अखेरपर्यंत माणसाला, प्राण्यांना हवा असतो स्पर्श. मायेचा, प्रेमाचा, विश्‍वासाचा, श्रद्धेचा स्पर्श. झाडांना गोंजारा, ती बहरून येतील. प्रत्येकजण स्पर्शाचा भुकेला असतो. 

एका सायंकाळी मी अशीच बसले होते. माझी नात माझ्या कुशीत बसली होती. बोबडे बोबडे बोलत होती. त्या बालजीवाला आपली आजी म्हणजे एक जिवाभावाची, हक्काची वाटत होती, आणि मी? मला काय वाटत होते? तो माझा स्पर्श वात्सल्याचा, मायेचा अननुभूत अशा स्वर्गीय आनंदाचा... या स्पर्शात तो बालजीव माझ्यावर किती अवलंबून आहे व माझ्या सांगाती तो किती निर्भय आहे, हे मला जाणवत होते. या बालजीवाला मी हवी आहे. काहीही मनाविरुद्ध झाले, की आरडाओरड करत येणार ती थेट माझ्याकडे. मग तिचा तो स्पर्श मला सुखावून जातो. अपरिमित असा वात्सल्याचा झरा माझ्या हृदयातून वाहू लागतो. 

स्पर्शास्पर्शातील फरक तीन महिन्यांचे बालकपण ओळखते. रात्रंदिवस सेवा करणारी त्याची आई जेव्हा त्याला जवळ घेते, दूध पाजते, किती खूष होते, किती समाधानी दिसते!! त्याची आई हेच सत्य असते. हे दृश्‍य केवळ स्वर्गीय असते. सृजन करणारी माता येथे सर्वश्रेष्ठ ठरते. हा निर्मितीचा आनंद म्हणूनच अवर्णनीय आहे. ही सारी किमया एक स्पर्श करते.

हीच मुले मग मोठी होतात. त्यांचे जग हळूहळू वेगळे होऊ लागते. त्यांच्या छोट्याशा विश्‍वात मग त्यांची मित्रमंडळी येऊ लागतात. येथे त्यांना मैत्रीच्या स्पर्शाची ओळख होते. हातात हात घेऊन ही मुले खेळतात, भांडतात, चिमटे घेतात, मारामारी करतात. पण, पुन्हा त्यांच्यात समझोता होतो. तो मैत्रीचा स्पर्शही त्यांना त्या वयात समजतो. खांद्यावर हात ठेवून गप्पा मारताना या मैत्रीच्या संवेदना त्यांना स्पर्शातून जाणवतात. पुढे अभ्यास सुरू होतो. कधी कधी टीचरचा मारही मिळतो, तर कधी शाबासकीही मिळते. हा प्रोत्साहन देणारा गुरूचा स्पर्श; यातपण खूप ताकद असते. मारकुटे मास्तर जसे लक्षात राहतात, तसेच प्रेमळ गुरुजीही लक्षात राहतात, ते त्यांच्या मायेच्या स्पर्शातूनच. म्हणूनच आयुष्यात यशाचे शिखर गाठल्यावर आठवण येते ती गुरुजींचीच.

नवयौवनात पदार्पण केल्यानंतर तर आयुष्यातील सदाबहार वसंतऋतूच सुरू झालेला असतो. नवीन पालवी, सुंदर रंग, फुले, मग सगळे जगच रंगीबेरंगी झालेले असते. अशा वेळी एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडलेली ही मुग्धा, तिला वाटणारे त्याचे आकर्षण, त्याच्या स्पर्शाची ओढ याचे वर्णन केवळ कवी कुलगुरू कालिदासच करू जाणे. मग येथे प्रत्येक तरुण हा दुष्यंत व तरुणी शकुंतलाच! हा तारुण्याचा एक स्पर्श अंगावर रोमांच उभे करणारा, रक्तप्रवाह वाढविणारा, गालावर गुलाबी लाली आणणारा अन्‌ या स्पर्शापुढे सारे जग तुच्छ मानणारा. हा स्पर्श- केवढी जादू असते या स्पर्शात. 

नवविवाहितांना तर या जादूई स्पर्शाने स्वर्गाची दारे उघडून दिली आहेत. पतीचा स्पर्श व त्यांचे दोघांचे मिलन, त्यातून होणारी नवनिर्मिती ही परमेश्‍वराचीच लीला आहे. इतके वर्ष सांभाळलेल्या सर्वस्वाचे दान ही तरुणी आपल्या पतीला करते, ते त्याच्या रोमांचित स्पर्शानेच. स्त्री ही जात्याच चतुर असते. सारे स्पर्श ती जाणते. त्यात विकारी, विचारी, मायेचा, आश्‍वासनाचा, मैत्रीचा या सर्व स्पर्शांचा समावेश आहे. त्या प्रत्येक स्पर्शाप्रमाणे तिच्या प्रतिक्रियाही असतात आणि त्या नैसर्गिक असतात. त्याचा तिला अभ्यास करावा लागत नाही, त्या उपजत असतात. 
अंध माणसाचे सारे जग स्पर्शावर चालते. स्पर्शातून तो बोलतो, स्पर्शाने तो चालतो, स्पर्शाने तो खातो, स्पर्शाने तो वाचतो. कधीतरी रस्ता ओलांडून देताना आपण त्याचा हात धरतो. त्याच्या हाताच्या स्पर्शातून कृतज्ञतेची संवेदना तो आपल्याला देतो. त्याचे सगळेच स्पर्श बोलके असतात. डोळे सोडून त्याच्या साऱ्या इंद्रियांना दिसत असते. असा हा त्याचा स्पर्श सर्वस्पर्शी असतो. 

पिकली पाने झालेली पतिपत्नी एखाद्या झाडाखाली, बागेमध्ये बाकावर बसतात, जुन्या आठवणी काढतात. काहीवेळा तर बोलायचीपण गरज नसते. हातात हात घेऊन मग ती तासन्‌तास बसतात. त्यांचा एकमेकांशी स्पर्श हेच त्यांच्या संवादाचे माध्यम बनते. सारं सारं काही या स्पर्शातून पाझरत राहतं. बोलायची तर जरुरीच नसते. 

आणखी एक स्पर्श सांगते, घरातील वृद्ध माणसे अशा या स्पर्शासाठी हपापलेली असतात. नातवंडांनी यावे, आपल्या अंगाखांद्यावर उड्या माराव्यात; सुनेने यावे, लेकीसारखा पाठीवरून हात फिरवावा; मुलाने यावे, हात धरून फिरायला घेऊन जावे. मायेच्या या एका स्पर्शात केवढी तरी ताकद असते. या एका स्पर्शाची किंमत जाणण्यासाठी अंतःकरणात सहृदयता हवी, दुसऱ्याला जाणून घेण्याची क्षमता हवी. यासाठी दिवसाच्या चोवीस तासांतील पाच मिनिटेपण पुरी असतात. ही पाच मिनिटे आपण काढायलाच पाहिजेत. या दिव्य स्पर्शाला पैसे मोजावे लागत नाहीत. मग त्या स्पर्शांत कंजुषी का?

Web Title: muktpeeth article pramila garud