आनंदी जीवनाचे गुपित

राधा ओक
मंगळवार, 25 जून 2019

यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची आपण स्वतः! म्हणून आयुष्याचे यश आपण समाधानात शोधायचे.
- राधा ओक

कुणातही कधीही सहजपणे न सापडणारी गोष्ट म्हणजे समाधान. आपण सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या मोहात असतो. सतत अपेक्षांचे ओझे घेऊन वावरतो, पण कधीच समाधानी नसतो. अगदी आयुष्यात सगळे मिळवले तरी अजून पाहिजे ही हाव कधीच का संपत नाही? इतके असमाधानी का असतो आपण? शिक्षण, नोकरी, लग्न आपल्या अपेक्षा वाढतच असतात. नोकरीत कितीही चांगला पगार मिळाला तरी, अजून थोडा जास्त हवा, असे म्हणत आपण स्वतःची फरपट करतो. लग्नाच्या वेळी मुला-मुलींच्या अपेक्षा इतक्‍या असतात की विचारता सोय नाही.

असमाधानाने आपण सतत काही तरी मिळवायच्या मागे धावत असतो. 
आपण आहोत तसे छान आहोत, आपल्याकडे आहे तेवढे पुरेसे आहे, ही भावना मनात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण समाधानी असू. आयुष्यात जसे समोर येईल तसे आनंदाने जगता आले पाहिजे. अंगात ताकद असेतो निव्वळ धावाधाव करायची. सगळे काही मिळवण्याचा अट्टहास करायचा आणि जेव्हा सगळी कर्तव्य पूर्ण होतात तेव्हा म्हातारपणी शारीरिक वेदनांमुळे इच्छा असूनही त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे काय नाही यापेक्षा, काय आहे याचा आधी विचार केला पाहिजे.

शेजारघराशी, इतरांशी तुलना करायची नाही. जे आहे, जसे आहे ते आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाचे आहे आणि मग ते कसेही असले तरी माझे आहे, ही भावना मनात येते ना तेव्हा आपण स्वतःच कोणाशीही तुलना करत नाही. म्हणूनच आलेला दिवस आनंदात घालवायला शिकले पाहिजे. रोज रात्री आज मला काय मिळाले नाही, यापेक्षा आजच्या दिवसभरात मी काय कमावले याचे समाधान मिळवले पाहिजे. आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे जगण्याचा आनंद आणि समाधान कशात आहे हे ओळखता आले पाहिजे. आयुष्याचे यश समाधानात शोधून तसे आयुष्य जगायला शिकले पाहिजे; कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची आपण स्वतः!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Radha Oak