थोडे जगणे तयांसाठी...

Rahul-Jhanjhurne
Rahul-Jhanjhurne

ज्यांच्याकडे सगळ्याचाच अभाव आहे, त्यांच्यासाठी थोडा प्रेमभाव ठेवला आणि समाजाला हाक दिली. शेकडो हात पुढे आले.

मागच्या वर्षी राजगडाच्या पायथ्याला आम्ही पाच शाळा दत्तक घेतल्या होत्या. तेव्हा मनात आले, जर हडपसर मेडिकल असोसिएशनसारखी संघटना यात उतरली, तर आपण अख्खा तालुका दत्तक घेऊ शकतो.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांनी सहकार्याचे आश्वासन दिले. हडपसरमधील जवळपास सर्वच डॉक्‍टरांनी त्यांचे अन्‌ घरातल्यांचे वाढदिवस साजरे न करता असोसिएशनकडे सुमारे साडेतीन लाख रुपये जमा केले. हडपसरमधील सोसायट्यांमध्ये पत्रके लावली, जुन्या सायकल्स, कपडे किंवा पादत्राणे द्यायची असल्यास त्यांनी आम्हास फक्त फोन करावा. झेड प्लस गडसंवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन जुने कपडे आणले.

शिवले, धुतले आणि इस्त्री करून ठेवले. दोन महिन्यांत सुमारे दहा हजार कपडे नव्यासारखे बॉक्‍स पॅक करून ठेवले होते. चर्मकारांची कार्यशाळा घेऊन पाचशे जुनी पादत्राणे नव्यासारखी केली. अठ्ठावीस जुन्या अडगळीत पडलेल्या सायकली जमा करून त्यांची चाके आणि इतर भाग बदलून परत वापरायोग्य केल्या. तसेच, पंधरा नवीन सायकल विकत घेतल्या.

उन्हातान्हात रस्त्यावर बसून चपला शिवणाऱ्या एका चर्मकाराने बिलातले साडेसहा हजार रुपये परत आणून दिले. त्याला त्या पैशांची जास्त गरज होती, तरीही. आम्हाला वेल्ह्यातील कार्यालयही मोफत मिळाले. बाइक स्टोअरवाल्यांनी सायकली मोफत दुरुस्त करून दिल्या. 

लोकांमधल्या चांगुलपणाचा ठायी ठायी प्रत्यय आला. रुग्णालयाच्या सगळ्या खोल्या सामानाने भरल्यानंतर शेवटचे दहा दिवस साहित्य स्वीकारणे थांबवले. सगळे साहित्य दोन मालमोटारींतून घेऊन वेल्ह्यात पोचलो. नऊशे कातकरी हे सामान घेण्यासाठी जमले होते. अंगणवाडी सेविकांमार्फत विनागडबड वाटण्यासाठी डॉ. सचिन आबणेंचे नियोजनकौशल्य कामाला आले. चार स्टॉल उभारून कोणीही कातकरी विन्मुख जाणार नाही याची काळजी घेतली. सगळे कातकरी भल्या सकाळी दरीखोऱ्यांतून वेल्ह्यात आले होते आणि मुक्कामी परत जायला संध्याकाळ होणार होती. असोसिएशनने त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली होती. जेथे अजून वीज पोचली नाही, अशा दहा धनगर वस्त्यांवर सोलार दिवे बसवून तिथे कायमस्वरूपी उजेड करून त्यांचे जीवन प्रकाशमान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com