रेल्वे रोको

रोहिणी भागवत
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जंगलातून रेल्वे जाताना रुळावर आलेल्या हत्तीला धक्का बसला आणि हत्तींनी रेल्वे रोको आंदोलन केले.

हरिद्वारहून डेहराडून एक्‍स्प्रेसने दिल्लीला जाणार होतो. दुपारी एक वाजता गाडी होती; पण गाडी उशिरा येणार होती. सुमारे तासभर स्थानकातील गंमत पाहण्यात गेला. नव्या सूचनेनुसार गाडी सात तास उशिरा येणार होती. कारण कळत नव्हते. फलाटावर भरपूर माकडे होती व ती संधी मिळताच प्रवाशांच्या खाद्यपदार्थांवर डल्ला मारीत होती. शेवटी आम्ही ‘हर की पौढी’ला जायचे ठरविले. 

येथील घाटावर मंदिरांत दर्शन घेतल्यानंतर गंगेच्या पाण्यात पाय टाकून आरामात गप्पा मारल्या. आमच्यासारखे इतर लोक असेच बसलेले होते. अधून मधून खाणे-पिणे चालू होते. संध्याकाळी गंगेची आरती पाहिली. पुजारी आरती म्हणत ओवाळीत होते. श्रद्धेने फुलांच्या द्रोणात कणकेच्या दिव्यामध्ये वात पेटवून ती गंगा मैयाला अर्पण करतात. असे असंख्य द्रोण पाण्यावर तरंगताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. सात वाजता स्थानकावर परत आलो. 

पुन्हा एकदा गाडीची चौकशी केली. त्या वेळी तेथील कर्मचाऱ्याने दिलेली माहिती फारच आश्‍चर्यकारक होती. डेहराडून ते हरिद्वार जेमतेम एका तासाचे अंतर आहे. वाटेत जंगलातून गाडी जात असताना रुळावर हत्ती आल्याने गाडीचा धक्का लागून तो मेला होता. ही बातमी जंगलातील हत्तींना कळताच ते सर्व मोठ्या कळपाने येऊन मेलेल्या हत्तीच्या भोवती रुळावर उभे होते. आपल्या मृत बांधवाला श्रद्धांजली देण्यासाठी आलेला हा हत्तींचा जमाव दूर करणे कठीण होते. एक प्रकारे या अपघातामुळे हत्तींनी ‘रेल्वे रोको’ छेडले होते, असे म्हणायला हरकत नाही. अशा परिस्थितीत गाडी पुढे नेणे शक्‍य नव्हते. शेवटी रेल्वे कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्या हत्तींना जंगलात हाकलले आणि गाडीसाठी मार्ग मोकळा झाला. वर्षातून दोन-तीन वेळा तरी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे कळले. आयुष्यात पहिल्यांदाच हत्तींच्या अशा आंदोलनाविषयी ऐकले. गाडी येताच सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला आणि आता गाडी केव्हा सुरू होतेय याची वाट पाहू लागलो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Rohini Bhagwat