मनी वसो संवेदना!

Sanjivani-Manegaonkar
Sanjivani-Manegaonkar

समाजसेवा म्हणजे काय? संवेदनशीलता आणि सामाजिक भान यातून घडलेली कृती म्हणजेच समाजसेवा, नाही का?

माझी बदली म्हातोबाच्या आळंदीला झाली. प्रत्येक वर्गातील सात-आठ मुले गृहपाठ वह्या तपासायला आणा म्हणून सांगितले, की शाळेतच यायची नाहीत. एका मुलाला खोदून-खोदून विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘बाई, आमचे आई-वडील शेतमजुरी करतात. दर आठवड्याला पगार मिळतो. त्यात घराचेच भागत नाही. वही पाच रुपयाला मिळते, ती कशी आणणार?’’ मी दुसऱ्याच दिवशी होलसेल दुकानातून दोन डझन वह्या घेऊन शाळेत नेल्या.

वर्गप्रमुखाकडे काही वह्या ठेवल्या. एक वही त्याला हिशेब लिहायला दिली. ज्याला हवी असेल त्याला दे म्हणाले. दर आठवड्याला मुले एक-दोन रुपये द्यायची. पाच रुपयाची वही साडेचारलाच मिळत होती. त्यामुळे पन्नास पैसे वाचतही होते. त्यानंतर नऊ वर्षांत कधीच मुलांनी गृहपाठ मागे ठेवला नाही की पैसेही बुडवले नाहीत. निवृत्तीनंतर अचानक माझ्या सहकारी शिक्षिका खरात यांचा मला फोन आला. ‘‘अहो ताई, तुमच्या वर्गात तो नीलेश होता ना! त्याची काल झोपडी जळाली. भाऊ-बहीण शाळेत आणि आई-वडील शेतात असल्याने बचावले. पण, सगळंच जळालं हो. अंगावरच्या कपड्यावर कुटुंब आहे.’’ मी लगेच संध्याकाळी एक विनंतीवजा पत्र तयार करून लोकांना मदतीचे आवाहन केले. दोनच दिवसांत एक पोते भरून कपडे आणि एक पोते भरून भांडी जमा झाली. माझी मैत्रीण माधुरी आवटे हिच्या गाडीतून ती पोती नीलेशच्या झोपडीपाशी गेलो. या भांड्यात बादली-कळशी नव्हती. ती प्रशांत काकडे व नचिकेत सूर्यवंशी हे माजी विद्यार्थी देऊन आले. 

नीलेशच्या झोपडीतील सारे काही जळून खाक झाले होते. ॲल्युमिनियमची भांडी वितळून गेली होती. शेजारच्या पोल्ट्री फार्मवाल्याने त्यांना कोंबड्यांच्या बाजूलाच राह्यला जागा दिली होती. शेतमालकाने दोन-तीन नवे पत्रे आणून दिले होते. नवीन झोपडी बांधणे चालू होते. अशाही परिस्थितीत नीलेशच्या आईने स्टिलच्या काळ्या झालेल्या तांब्यातून सरबत करून आम्हाला पाजले. आम्ही आणलेले सामान, भांडी, कपडे आणि थोडे धान्य त्यांनी गाडीतून उतरून घेतले. आम्हाला समाधान वाटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com