गेट द लॅडर, प्लीज!

संतोष शिंदे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

स्वामींचा पाय फांदीवरून सटकला. वरच्या फांदीचा आधार घेत ते लोंबकळत होते. आम्हाला काहीतरी सांगत होते; पण आम्हाला कळत नव्हते. आम्ही गोंधळलो होतो. तेवढ्यात स्वामी फांदीवरून जमिनीवर आदळले.
- संतोष शिंदे
 

दोन प्रयत्नांनंतर दहावीची परीक्षा कशीबशी पास झालो होतो. दहावीपर्यंत पायात स्लीपर, आदल्या वर्षीचीच खाकी पॅन्ट अन्‌ पांढऱ्या शर्टाने बऱ्यापैकी साथ दिली होती. पण, आता कॉलेजला जायचे म्हणजे बऱ्यापैकी चप्पल, चांगले कपडे आले. आता काय करायचे? आई-दादाला पैसे मागणे जमणारे नव्हते. दोघांचेही कष्ट पाहात होतो. कसेबसे घर चालले होते, त्यात या खर्चाची भर नको. दादा येरवड्याला सुतारकाम करायचे, तर आई आणि मावशी दोघीही कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमात साफसफाई करायच्या. दोघीही अशिक्षित; पण आश्रमात केवळ ऐकून ऐकून त्या इंग्लिश बोलायला शिकल्या होत्या. 

आईने मला तिच्या ओळखीने आश्रमातच काम मिळवून दिले. दुपारी दोन ते रात्री अकरा असे डिश वॉशिंग विभागात. तिथे काम करताना वाटायचे, की आपण एका वेगळ्याच दुनियेत आहोत. अवतिभोवती परदेशी माणसांचा वावर. आश्रमातला भव्य बुद्ध हॉल, भलेमोठे ग्रंथालय आणि निलोपा-तिलोपा ही पिरॅमिडसारख्या आकाराची ध्यानगृहे ही माझी श्रद्धास्थाने होती. तिथे असणारी ओशोंची समाधी. समाधीभोवती एक छानसे तळे आणि त्यामध्ये फिरणारे दोन राजहंस. पहिल्यांदाच राजहंस इतक्‍या जवळून पाहात होतो. माझ्या घराभोवती फक्त फॅंड्रीच सतत दिसायचे, म्हणून या राजहंसांचे दिसणे माझ्यासाठी मोठे अप्रूप होते. 

काम करताना भाषेची मोठी अडचण होती. तिथे सगळेच इंग्लिश बोलायचे. मी महापालिकेच्या मराठी शाळेतून शिकलो होतो. त्यामुळे इंग्लिश बोलताना वर्तमानकाळ, भविष्यकाळ, भूतकाळ यांचा मेळ जमवता आला नव्हता; पण त्यामुळे आता मला माझ्या कामाचा भविष्यकाळ दिसत होता. इंग्लिश बोलण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो. कुणी काहीही विचारले की माझे उत्तर ठरलेले, ‘येस सर.’ कारण, काही बोलायला जावे, तर उगाच घोटाळा नको व्हायला. असेच एकदा माझ्या अमेरिकन सुपरव्हायझरने विचारले, की ‘व्हेअर वॉज यू यस्टरडे?’ उत्तर द्यायला पाहिजेच होते. म्हणालो, ‘‘हेर ओन्ली.’’ त्या सदगृहस्थांनी ते समजून घेतले आणि ‘ओके’ म्हणून निघून गेले. असो. तुकाराम महाराजांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग’ तसे होते. 

एकदा ऑस्ट्रेलियन स्वामी वाजिद यांच्याबरोबर काम करण्यासाठी आम्हा चौघांना पाठवले होते. एका जुन्या झाडाच्या काही फांद्या तोडण्याचे काम करायचे होते. वाजिद स्वामी अतिशय प्रेमळ. वय साठ-पासष्ठ; पण कामाचा उरक बघत राहावा असा. ते कधी झाडावर चढले हे कळलेच नाही. आम्ही त्यांना मदत करत होतो. इकडून रश्‍शी टाका, ही फांदी ओढा, ती फांदी तिकडे टाका, असे चालले होते. खाणाखुणांवरून आम्हाला समजत होते तेवढे करत होतो. काम बराच वेळ चालले होते. पावसाचे दिवस असल्यामुळे निसरडेपणा होता. काम संपण्याच्या बेतात होते. ही एक शेवटची फांदी तोडली की संपले. तेवढ्यात वाजिद स्वामींचा पाय सटकला. त्यांनी दुसऱ्या फांदीचा आधार घेतला. जोरात ओरडले, ‘गेट द लॅडर, प्लीज...’ आम्हाला काय करावे कळेना.

‘ल्याडर’ म्हणजे काय ? ते पुन्हा ओरडले, ‘गेट द लॅडर’. त्यांचे तोंड पलीकडच्या बाजूला होते. त्यामुळे हावभावावरूनही अंदाज बांधता येईना, त्यांना नेमके काय हवे? आम्ही पुरते गोंधळलो. आम्ही चौघेही एकमेकांकडे नुसते पाहात राहिलो. या क्षणाला आमचा जगातला सर्वांत मोठा दुश्‍मन कोण असेल, तर तो हा ल्याडर... डोके गरगरत होते. तेवढ्यात स्वामीजींच्या हातातली फांदीही सुटली आणि ते जमिनीवर आदळले. ल्याडर येण्याआधीच स्वामीजी खाली आले होते. पाटी फुटली, शाळा सुटली, असे काही तरी डोक्‍यात सुरू झाले. तेवढ्यात स्वामीजी कसे तरी उठले. आम्ही पोरे कावरीबावरी झालो होतो. स्वामीजींनी आम्हाला काही अंतरावर जिथे शिडी पडली होती तिथे नेले आणि हातवारे करून, हावभाव करून समजावले, की बाबांनो, धिस इज द लॅडर! हीच आणायला मी तुम्हाला ओरडून सांगत होतो. 
मन खजील झाले होते. वाजिद स्वामींच्या डाव्या पायाला मोठी जखम झाली होती; पण त्यांनी न रागावता उलट प्रेमाने प्रत्येकाला शंभर- शंभर रुपये देऊ केले व ‘टेक डिक्‍शनरी... ओके?’ असे म्हणत लंगडत लंगडत निघून गेले. वाजिद स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

मनात एक खूणगाठ बांधली, की आता या ‘ल्याडर’विरुद्धचे युद्ध जिंकल्याशिवाय थांबायचे नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article santosh shinde

टॅग्स