तोचि आम्हा एक

सुहास मुंगळे
शुक्रवार, 12 जुलै 2019

डॉक्‍टरांचे आणि विठ्ठलवाडी परिसरातील साऱ्या वस्तीचे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. कित्येकदा त्यांना फी मिळाली नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधीही मावळले नाही

डॉक्‍टरांचे आणि विठ्ठलवाडी परिसरातील साऱ्या वस्तीचे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. कित्येकदा त्यांना फी मिळाली नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधीही मावळले नाही.

सिंहगड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होते. विठ्ठलवाडीत पदपथावरच मजुरांच्या झोपड्या होत्या. पहाटेच्या वेळी कोणीतरी डॉक्‍टरांना हाका मारत आले. त्या झोपडीत एक स्त्री प्रसूत झाली होती. तिची नाळ तशीच राहिली होती. डॉक्‍टर धावतच गेले. त्या स्त्रीची त्यांनी नीट सुटका केली.

आपल्याकडची काही औषधे दिली. त्यांच्या लक्षात आले, त्या स्त्रीला चहाची गरज आहे. घरून चहा-बिस्किटे पाठवली गेली. दुपारचे तरी जेवण तिला मिळावे म्हणून डॉक्‍टरांनी त्या मजुराच्या हातावर काही पैसे ठेवले आणि घरी आले. त्यांच्याबरोबर असलेल्या मित्राने विचारले, ‘‘डॉक्‍टर तुम्ही धावत आला. घरून चहा-बिस्किटे पाठवली, वर पैसेही दिले. तुमच्या फीचे काय?’’

डॉक्‍टर नेहमीप्रमाणे हसले. म्हणाले, ‘‘त्या माउलीचे आशीर्वाद मिळाले की!’’
डॉक्‍टर पुण्याकडे निघाले होते. १९७७-७८च्या दरम्यान या रस्त्यावर फारशी रहदारी नसायची. विठ्ठलवाडीच्या कमानीपाशी कोणी एक जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न करीत होता. कोणीही थांबत नव्हते. तेवढ्यात डॉक्‍टर तेथे पोचले. थांबले. विचारले, तर त्यांना समजले, की मंदिरात पंचवीस-तीस जणांना उलट्या होत आहेत. डॉक्‍टर तेथे गेले. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि रुग्णवाहिका बोलावली. काही मित्रांनाही बोलावून घेतले आणि त्रास होणाऱ्या सर्वांना ससून रुग्णालयात हलवले. 

एकदा वडगावमधून एक जण रात्री त्यांच्या घरी पोचला. एका महिलेला त्रास होत होता. डॉक्‍टरांनी तोवर स्कूटर घेतली होती. त्या स्त्रीवर तातडीने उपचार होणे गरजेचे होते. घरी उपचार होणार नव्हते. त्यांनी तिला आपल्या स्कूटरवर बसवले आणि जवळच्या रुग्णालयाकडे तिला घेऊन गेले. डॉ. हिरेन निरगुडकर व विठ्ठलवाडी-हिंगणे खुर्द, वडगाव, धायरी या परिसरांतील त्यांचे रुग्ण यांच्यामध्ये कौटुंबिक नातेच तयार झाले आहे. हा परिसर खेड्याचा होता, काही सुधारणा नव्हत्या, त्या काळात डॉक्‍टर निरगुडकर हे सायकलने या परिसरात फिरून रुग्णांवर उपचार करीत होते. कोणी जे देईल ती त्यांची फी असे. पैशांच्या रूपात फार कमी घरातून फी मिळे. भाज्या, तांदूळ, ज्वारी-बाजरी हीच असे त्यांची फी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Suhas Mungale