सरले रे!

Sujata-Lele
Sujata-Lele

तीनशे पासष्ट दिवसांनंतर वर्ष सरतेच. दुसरे सुरू होते. पण, आधीचे वर्ष अनेक अनुभव देऊन गेलेले असते. या अनुभवांचे शहाणपण घेऊन पुढे जायचे असते.

उद्या वर्ष सरेल. एक सरते अन् त्याचवेळी दुसरे येते. प्रत्येक वर्ष सरताना त्या त्या वर्षाचे असे एकेक अनुभव देऊन गेलेले असते. खरे तर नवीन वर्ष सुरू होते आणि संपते हे आपल्यासाठी असते. खरे तर सृष्टीमध्ये वर्षानुवर्षे घडामोडी होत असतात. एखादे वर्ष भूगर्भात हालचाली होऊन भूकंपाने हादरते, तर कधी त्सुनामीने. हे वर्ष वादळांचे होते. दुष्काळ-ओला दुष्काळ दाखवत सृष्टी वर्षानुवर्षे आपल्याला तिच्या तालावर नाचवते आहे, असो. आपल्यातील बरेच जण वर्षाचा शेवट वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळे संकल्प मनाशी बांधून साजरे केले जाते. हे वर्ष सरताना ''वर्षा'' ऋतुला विसरून चालणारच नाही. (हे वर्ष सरताना महाराष्ट्रातील राजकारणातसुद्धा ''वर्षा''ने पिच्छा सोडला नाही. एकंदरीत या वर्षात ‘वर्षा’ हा शब्द कोणीच विसरणार नाही.) तर पाऊस थांबणार की नाही? ही भीती सर्वांनाच होती, रात्री पडत असलेला पाऊस तर भीतीदायक वाटायचा आणि खरेच काही ठिकाणी ती भीती खरी ठरली! पण अशी परिस्थिती उद्भवायला मानवी चुकाही कारणीभूत ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्यातसुद्धा ढगाळ हवा पडते आहे. 

हे वर्ष सरले की...येणारे वर्ष २०२० आनंद आणि भरभराटीचे येऊ देत...अशाच शुभेच्छा आपण देणार. या वेळी एकच प्रार्थना करू शकतो की, आपत्ती येणारच असतील तर नवीन येणारे वर्ष हे २०२० असल्यामुळे संकटांची ''कसोटी'' नको, ५०-५० षटकेही नको... तर संकटे २०-२० इतकी कमीत कमी येऊ देत..! आली की संपू देत. २०२० या येणाऱ्या वर्षाच्या शेवटी २०-२०चा ‘वर्ल्ड कप’ आहे. हा योग उत्तम जुळून आला आहे. त्यामुळे आपल्या भारतीय क्रिकेट संघाला या वर्ल्ड कपच्या शुभेच्छा २०२० च्या सुरवातीपासूनच देऊ या...आणि सरत्या वर्षाला हसतमुखाने निरोप देऊ या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com