वाशीचे रिक्षावाले

सुनंदा जप्तीवाले
मंगळवार, 14 मे 2019

रात्री उशिरा एकटीच एक्‍स्प्रेस वेवरच्या त्या थांब्यावर उतरले; पण तेथील रिक्षावाले सहकार्य करणारे होते.

रात्री उशिरा एकटीच एक्‍स्प्रेस वेवरच्या त्या थांब्यावर उतरले; पण तेथील रिक्षावाले सहकार्य करणारे होते.

लोणावळ्यातील एक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आटोपून वाशीला निघाले. रात्री दहा वाजता ‘एक्‍स्प्रेस वे’जवळच्या बस स्थानकावर पुढे जाणारी बस मिळाली. वाशीला बस थांबणार असल्याची खात्री करून घेतली. लोणावळ्यात वीस मिनिटांची विश्रांती घेऊन बस निघाली. बस प्रवाशांनी भरलेली होती.

रात्री साडेअकराची वेळ. मी एकटी वाशीला उतरले. न्यायला येणारे कोणी नव्हते. त्यामुळे रिक्षावरच पूर्णतः अवलंबून होते. पुण्याची असल्यामुळे मनात अनेक शंका कुशंका येत होत्या. रिक्षावाले यायला तयार होतील का? आले तर अडून बसणार. तोंडाला येईल ती रक्कम मागणार. रात्री दहानंतर दीडपट चार्ज असतो म्हणणार. शिवाय तुम्ही गरजू आहात. गरजवंताला अक्कल नसते या भावनेने व्यवहार होणार. पाय धरावेच लागणार. ही मनाची तयारी ठेवूनच समोरच्या रिक्षावाल्याला विचारले, ‘कोपरखैरणे?’ तो म्हणाला, ‘पुढे जा’. वाटले, झाली सुरवात. पण त्याच्या सांगण्यात सौजन्य होते, उद्धटपणा नव्हता. 

पुढे सिग्नलजवळ गेले. तिथल्या एका रिक्षाचालकाला विचारले. कोपरखैरणे म्हटल्यावर त्याने मला तिथेच थांबवले. स्वतःची रिक्षा सोडून वाशी स्टेशनकडून येणाऱ्या रिक्षांना विचारत राहिला. दोन मिनिटांत कोपरखैरणेला जाणारा रिक्षावाला आला. मी रिक्षात बसले. कोणतीही घासाघीस न करता त्यांने आधी मीटर टाकले. म्हणजे हा आपल्याला नेणार, तेही मीटरप्रमाणे नेणार याची खात्री झाली. त्याने मला थेट बिल्डिंगच्या दाराशीच नेऊन सोडले. आता तो दीडपट चार्ज घेणार म्हणून मी मीटरवर ५६ रुपये झालेले दिसूनही शंभरची नोट दिली. त्याने तत्परतेने मला चाळीस रुपये परत दिले.

मी चाटच झाले. एवढ्या रात्री या सर्वच रिक्षावाल्यांनी केवढी माणुसकी दाखवली! परतीच्या प्रवासादिवशी मुलगा सोबत होता. मधल्या रस्त्याने चढून मुख्य रस्त्यावर आलो. लांबच्या रिक्षा स्टॅंडकडे पाहून त्याने हाताने रिक्षा बोलवली. नंबरवरचा रिक्षावाला आला. आम्ही बसताना त्यांनी मीटर टाकला. एकही प्रश्न न विचारता वाशी सिग्नलला सोडले. म्हणजे निर्धास्तपणे त्यांच्यावर अवलंबून राहावे! धन्य वाटले मला. वाशीच्या या रिक्षावाल्यांना मी मनापासून सलाम केला!

Web Title: Muktpeeth Article Sunanda Japtiwale

टॅग्स