जिगसाॅ नव्हे, जीवनानुभव!

Sushama-Joshi
Sushama-Joshi

आपले आयुष्य जिगसॉ पझलनेच भरलेले असते. एक एक तुकडा जुळवत आपण जगत असतो, नाही का!

अमेरिकेतल्या वास्तव्यात विरंगुळा म्हणून सुनेने एके दिवशी एक हजार तुकड्यांचा एक जिगसॉ पझलचा संच आणून दिला. बॉक्सच्या कव्हरवर एका नयनरम्य देखाव्याचे चित्र होते. याच देखाव्याचे जाणीवपूर्वक आणि हुशारीने केलेले हजार भाग त्या संचामध्ये होते. ते सर्व तुकडे योग्य जागी जोडून चित्रातल्यासारखा देखावा तयार करायचा होता. प्रत्येक तुकडा त्या मोठ्या चित्राचा अविभाज्य भाग, तरीही इतर ९९९ तुकड्यांपासून वेगळा! एकही तुकडा अतिरिक्त नाही. प्रत्येक तुकड्याला चार-पाच कोपरे. पण तरीही प्रत्येकाचा आकार वेगळा, रंगसंगती वेगळी. त्यामुळे प्रत्येक तुकडा त्याच्या विवक्षित जागीच बसणार. इतर कुठेही नाही. योग्य तुकडा सापडला की किती आनंद व्हायचा! याउलट, एखादा हातात आलेला तुकडा हमखास एखाद्या ठिकाणी बसेल असे वाटून लावायला जावे तर तो तिथे बसायचाच नाही. आणि का बसावा? तो तिथला नसायचाच! निरीक्षणशक्ती आणि चिकाटी यांची परीक्षा घेत घेत हजार तुकड्यांचे ते चित्र तयार झाले. सर्व कडा, कोपरे आणि अधलेमधले सर्व तुकडे असे काही नीट बसले की त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जणू पुसले गेले.

सामाजिक जीवनातही अशी अनेक कोडी आपण सोडवत असतो, नाही का? ‘‘हे असे का झाले?’’, ‘‘हे असे का दिसतेय?’’, ‘‘ह्याचा अर्थ काय?’’, ‘‘हा/ही अशी का वागली/बोलली?’’ अशा अनेक प्रश्नांच्या रुपात आपल्यासमोर उभी ठाकतात. आपले वैयक्तिक आयुष्यसुद्धा अनुभवांच्या अनेक तुकड्यांचे एक जिगसाॅ पझलच असते की! आपण त्यातला एकेक तुकडा जणू दररोज जगत असतो. आपले यश, अपयश यांचे कोडे सोडवायला तेच तुकडे उपयोगी पडत असतात. कोडे सोडवल्यानंतर आनंद होणे, हायसे वाटणे, गैरसमज दूर होणे आणि त्यातून मिळणारी मनःशांती यांची मजा जो अनुभव घेतो त्यालाच कळते. जिगसाॅचे ते चित्र विस्कटायला एखादे मिनीटही लागले नसते. हाच नियम समाजाची घडी विस्कटायला किंवा वैयक्तिक आयुष्यात नैराश्य यायलादेखील लागू पडतो! जिगसाॅ पझलने मला पुन्हा जाणीव करून दिली होती, स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com