पुस्तक आणि मॅरेथॉन

विजय तरवडे
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

मित्राला हवे असणारे एक दुर्मीळ पुस्तक मिळवण्यासाठी एका पुस्तकप्रेमीने केलेली धावपळ आपल्यालाही आनंद देते.

पुस्तकप्रेमी भेटला की मला ‘माझिया जातीचे कोणी’ भेटल्याचा आनंद होतो. पंकज भोसले हा पुस्तकप्रेमी मित्र मुंबईहून खास दुर्मीळ पुस्तकांसाठी येत असतो. त्याला काही तासांसाठी बघायला हवे असलेले एक दुर्मीळ पुस्तक पुण्यातल्या वाचनालयातून मिळवून द्यायचे मी कबूल केले, त्याची ही चित्तरकथा.  

सव्वीस जानेवारीला पंकज येणार होता. मी वाचनालयाच्या एका सदस्याला विनंती केली. त्याने स्वतःच्या कार्डावर पुस्तक द्यायचे कबूल केले. त्याला दोन दिवस अगोदर भेटलो. त्याने वाचनालयात दूरध्वनी करून पुस्तकाची चौकशी केली. कोणा वाचकाने ते पुस्तक नेलेले. पंकज तर केवळ ‘त्या’ पुस्तकासाठी पुण्याला येणार होता. प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्या असल्याने त्याला खूप प्रयत्नांती रेल्वेचे तिकीट मिळाले होते. पुस्तक नेणाऱ्या वाचकाचा पत्ता घेऊन त्याला गाठून पुस्तकासाठी विनंती करावी म्हणून पंचवीस जानेवारीला दुपारी वाचनालयात गेलो. वाचनालय दुपारी तीन ते पाच बंद होते. सायंकाळी पुन्हा गेलो. तेथील अधिकाऱ्यांना पुस्तक नेणाऱ्या वाचकांचा पत्ता मागितला. ते म्हणाले, ‘‘ते पुस्तक कोणी चुकून नेऊ नये म्हणून बाजूला ठेवले आहे. सदस्य महोदयांचे कार्ड आणा आणि पुस्तक न्या.’’ पण नेमका सदस्यांचा फोन लागेना. मग मीच घाईघाईने सदस्यत्वाचा अर्ज भरला. प्रवेश शुल्क, अनामत रक्कम, वर्गणीची रक्कम खिशात होती. पण, छायाचित्र, आधार कार्ड... वाचनालय बंद व्हायला एक तास होता. मी त्यांना पैसे दिले. पुस्तक बाजूला ठेवायला सांगितले आणि बाहेर आलो.

वाचनालयाकडून घराकडे जाणारा सगळा रस्ता एकेरी असल्याने रिक्षा करणे शक्‍य नव्हते. संकोच सोडून मी चक्क पळत सुटलो. सिग्नलपाशी दम खात दीड किलोमीटर धावून घरात शिरलो. छायाचित्र, आधार कार्ड घेतले. पेलाभर पाणी गटागटा प्यालो आणि बाहेर पडून रिक्षा केली. धापा टाकीत वाचनालयात पोचलो तेव्हा पावणेआठ वाजले होते. 

पुस्तक छातीशी धरून बाहेर पडलो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरून घाम आणि आनंद निथळत होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Vijay Tarwade