माझा तरुण गुरू

विश्‍वास दात्ये
Monday, 18 November 2019

कोणतीही सत्ता अनित्य असते. नित्य असते ते समोरच्याशी आपले वर्तन. समोरच्याला अयोग्य वागणूक कधी देऊ नका.

कोणतीही सत्ता अनित्य असते. नित्य असते ते समोरच्याशी आपले वर्तन. समोरच्याला अयोग्य वागणूक कधी देऊ नका.

मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत कनिष्ठ व्यवस्थापक होतो, तेव्हाची ही गोष्ट. एके दिवशी सकाळी पाणी पिण्यासाठी आमच्या स्वागत कक्षातील वॉटरकुलरकडे गेलो असता समोरच एका खुर्चीत एक कोवळा तरुण बसलेला दिसला. पुन्हा काही वेळानंतर मी पाणी पिण्यासाठी गेलो तेव्हाही तो दिसला. सहज चौकशी केली, तर तो कंपनीच्या बोलावण्यानुसार सकाळी दहापासून वाट पाहात बसला होता. मी त्याला शुभेच्छा देऊन परतलो. दोनच्या सुमारास जेवण संपवून परत येताना मला तो तिथेच थोडा विमनस्क अवस्थेत दिसला. मी विचारले तर त्याच्या जेवणाची व्यवस्था कोणीच केलेली नव्हती. हा सर्व प्रकार मला विचित्र, पण माझ्या हाताबाहेरचा वाटला. साधारण अडीच वाजता आमच्या फॅक्टरीप्रमुखांनी सर्व अधिकाऱ्यांची एक तातडीची सभा बोलाविली.

सगळे जमल्यावर, साहेबांनी हातातील एक कागद गंभीरपणे वाचून दाखवायला सुरुवात केली – ‘‘नमस्कार, आज सकाळी आपल्या प्रथितयश कंपनीमध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन दिलेल्या वेळेवर मी मुलाखतीसाठी हजर झालो. कोणाकडूनही माझी विचारपूस झाली नाही.

उशिराबद्दल मीच विचारल्यावर ‘संबंधित व्यवस्थापक कामात आहेत, थोड्याच वेळात भेटतील’ असे सांगण्यात आले. सकाळी चहापानाची आणि नंतर जेवणाची वेळ संपली तरी मी वाट पहात बसलो होतो. दोन वाजता मला पुन्हा सांगण्यात आले की, संबंधित व्यवस्थापक अजून कामात आहेत. एवढे मात्र खरे आहे की, दोन वाजेपर्यंत मी आपल्या वॉटरकुलरचे पाणी तीन-चार वेळा प्यायलो. आता सव्वादोन वाजता मी हे पत्र आपल्याला देण्याची रिसेप्शनिस्टकडे विनंती करून, परत जात आहे. हे पत्र ती आपल्याला पोचवेल अशी अपेक्षा आहे. अत्यंत खेदाने, मी आपल्याला कळवू इच्छितो की जरी आपल्या कंपनीने मला निवडले तरीसुद्धा मी या कंपनीत काम करू इच्छित नाही.’’

साहेब म्हणाले, ‘‘या मुलाला आपल्या कंपनीत घ्यायला नक्कीच आवडले असते. इतक्या तरुण वयात इतके स्वच्छ मन, विचारांची प्रगल्भता आणि धाडस सहसा बघावयास मिळत नाही. किमान यातून काही धडा घेऊया.’’ सर्वांशी कसे वागावे, याबाबत त्या तरुण गुरूकडून आयुष्यभर पुरेल असा धडा शिकलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth article vishwas datye