नैवेद्याची थाळी

नरेंद्र धायगुडे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

एखादा विचार मनात येऊन गेलेला असतो, पण एखाद्या प्रसंगाने त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगतो.

एखादा विचार मनात येऊन गेलेला असतो, पण एखाद्या प्रसंगाने त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने उमगतो.

मी व माझी पत्नी, ससून रुग्णालयाच्या आवारातील "श्रीवत्स' या संस्थेत देणगी देण्यासाठी नुकतेच गेलो होतो. दुपारी साधारण सव्वाबाराची वेळ. सहा महिन्यांपासून सहा वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांचे संगोपन या संस्थेत केले जाते. आई-वडिलांच्या मायेला पोरकी झालेली ती मुले तेथे वाढत असतात. कशी वाढत असतील, कसे वाढवले जात असेल, अशा शंका मनात घेऊन जातो आपण, पण तेथे गेल्यावर लगेच शंका विरून जातात. मुख्य म्हणजे तेथील स्वच्छता व टापटीप मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची. मुलांचा सांभाळ अतिशय आत्मीयतेने केला जातो. तेथील व्यवस्थापक पाहुण्यांशी आदराने बोलतात. त्या दिवशी "अतिथी देवो भव' या भावनेने व्यवस्थापक बाईंनी आम्हाला तेथेच जेवायचा आग्रह केला. ""मुलांना आम्ही जे जेवण देतो ते तुम्ही जेवावे,'' ही त्यांची विनवणी अव्हेरणे आम्हाला शक्‍य झाले नाही. पाठोपाठ एक थाळी आणून समोर ठेवलीच. त्यांचा आग्रह आम्हाला मोडवेना.
छोटीशी थाळी. त्यात एक पोळी. नैवेद्याच्या वाटीच्या आकाराच्या तीन छोट्या वाट्या. एकीत भाजी, दुसरीत कोशिंबीर, तिसरीत वरण, भाताची इवलीशी मूद, सोनपापडीची छोटी वडी. तेथील लहान मुलांना दिला जाणारा हा चौरस आहार. मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. एवढीशी थाळी, पण पूर्ण भरलेली. त्या थाळीत मी व पत्नी दोघे जेवलो आणि तृप्त झालो. घरी जाऊन पुन्हा जेवावे, तर भूक नव्हती. हे समाधान आज काही वेगळेच शिकवून गेले. "खरेच, मला किती कमी जेवण पुरू शकते! मी जे अतिरिक्त खातो त्यात तीन-चार लहान मुले नक्कीच जेऊ शकतील', हे शब्द व शब्दार्थ मला याआधीही माहीत होते, पण आज त्यांची वेगळी जाणीव झाली. अर्थ खऱ्या अर्थाने आतपर्यंत उतरला. नैवेद्याच्या थाळीत तृप्तता साठवलेली असते, हा साक्षात्कार झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra dhaigude write article in muktapeeth