सेवामग्न आई

नीला विजय कदम
बुधवार, 1 मार्च 2017

हो, आय विटनेसच. मीच पाहिलंय धाकट्या आईंना जिवांचे आर्त समजून घेताना आणि त्यावर उताराही देताना. साधनाताईंनंतर डॉ. भारती समर्थपणे आनंदवनाचे आईपण निभावत आहेत.

हो, आय विटनेसच. मीच पाहिलंय धाकट्या आईंना जिवांचे आर्त समजून घेताना आणि त्यावर उताराही देताना. साधनाताईंनंतर डॉ. भारती समर्थपणे आनंदवनाचे आईपण निभावत आहेत.

बाबा आमटे आणि साधनाताई यांनी कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिर यांच्या जीवनात चैतन्याचे, आनंदाचे बहारदार मळे फुलविले. आज त्यांच्यामागेही त्यांचे कार्य आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ येथे सुरू आहे. आनंदवन हे बाबांच्या तपस्येनुसार अधिकाधिक विकसित आणि कल्याणकारी व्हावे म्हणून डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे आपले आयुष्य वेचीत आहेत. साधनाताई या मोठ्या आई म्हणून आनंदवनात वावरत होत्या. त्यांच्या मागे डॉ. भारती धाकट्या आई बनल्या. आनंदवनात वास्तव्यास असणाऱ्या सुमारे चार-पाच हजार उपेक्षितांची "आई'! "आई' या शब्दाचा खराखुरा अर्थ ज्यांच्या कृतीतून प्रतीत व्हावा, अशी ही माउली !

ज्यांना समाजाने नाकारले त्यांच्या जीवनात जगण्याची ओढ निर्माण करणारे, सर्जनशीलतेला वाव देणारे विविध प्रकल्प डॉ. विकास यांनी उभारले. असाच एक प्रकल्प वाद्यवृंदाचा. आनंदवनातील अनिकेतांची संगीताची आवड हेरून त्यांच्यात असणाऱ्या स्फुल्लिंगातून "स्वरानंदवन' या वाद्यवृंदाची संगीतशलाका धगधगीत ठेवली. या वेडावून टाकणाऱ्या सुरेल वाद्यवृंदाला अमेरिकेतूनही आमंत्रण आले आहे. आपल्या सव्वाशे कलाकारांना उत्तम तयारीनिशी घेऊन जायचे ही डॉ. विकास यांची जिद्द आहे. या कलावंतांना ओंकारसाधना आणि त्यातून सुगम संगीतातील बारकावे समजावून सांगण्यासाठी माझे पती विजय कदम यांनी आनंदवनाला पाच दिवसांचा वर्कशॉप घेतला. या वेळी डॉ. भारती यांना जवळून अनुभवण्याचा योग आला.

आनंदवनला जाताना प्रवासात विजय यांना सर्दी-घसा खवखवण्याचा त्रास सुरू झाला. गाण्याच्या संदर्भात वर्कशॉप असल्याने आवाज बिघडून चालणार नव्हते. हे दुखणे परतवून लावण्यासाठी मी डॉ. भारतींच्या क्‍लिनिकमध्ये धाव घेतली. आनंदवनाची स्वतःची आरोग्यसेवा आहे. बाबांनी तर आनंदवनासाठी स्वतःवरच अनेक प्रयोग करून पाहिले होते. मी भारतीताईंच्या क्‍लिनिकमध्ये पोचले. त्यांनी आदरपूर्वक मला बसायला सांगितले. त्या एकामागून एक रुग्ण तपासत होत्या. अगदी सात-आठ महिन्यांच्या लेकरापासून ते व्हीलचेअरवर आलेल्या सत्तरीतल्या माणसापर्यंत! साऱ्यांची ती "आई' होती. त्या ममत्त्वाने, शांतपणे प्रत्येकाशी बोलत होत्या. प्रत्येकाला औषधाबरोबर समाधान, विश्‍वास देत होत्या. रुग्णाने कृतज्ञतापूर्वक केलेला नमस्कार लहान मुलाच्या समंजसपणाने डोलावलेली मान ही मोठी "फी' जमा करत होत्या. अशातच एक सुमारे पंचविशीतला, दोन्ही पायांनी अधू असलेला तरुण आला. रुग्णांसाठी असलेल्या कमी उंचीच्या रुंद स्टूलवर बसला. "काय होतंय?' असे भारतीताईंनी विचारताक्षणी तो उद्‌गारला, ""मला लग्न करायचंय !''

मी चमकले. पण ताईंना हा अनुभव नवीन नसावा. त्यांनी शांतपणे विचारले, ""मुलगी कोण आहे? तिची तयारी आहे का?'' तो उत्साहात उत्तरला, ""हो आई. तिची तयारी आहे. तिचं नाव अमुकतमुक. मूकबधिर आहे.''
भारतीताई म्हणाल्या, ""उद्या तिला घेऊन ये. मी तिच्याशी बोलते. तिची तयारी असेल तर दोघांची तपासणी करू. लग्नासाठीचा फॉर्मही ऑफिसमधून घेऊन ये.'' मान डोलवीत तो आनंदाने निघून गेला.
ताईंनी सांगितले, ""बऱ्या झालेल्या रुग्णांच्या, उपेक्षितांच्या इथे वसाहती आहेत. लग्नायोग्य वय झाले, की आम्ही त्यांना अनुरूप जोडीदार शोधून विवाह करून देतो. लग्न करण्यापूर्वी दोघांची आवश्‍यक ती वैद्यकीय तपासणी केली जाते. मग फॉर्म भरून विवाह होतो.'' आदर्शभूत ठरावी, अशी ही विवाहपद्धती होती. त्यानंतर एका सोळा-सतरा वर्षांच्या मुलीने खाणाखुणांच्या भाषेत भारतीताईंकडे "लोकर हवी' अशी मागणी केली. त्यांनीही तिला "भांडारातून लोकर मिळावी' अशा आशयाचे "प्रिस्क्रिप्शन' दिले.

काळीसावळी, पण तरतरीत असणारी एक सहावीतील शाळेच्या गणवेशातील विद्यार्थिनी आईसमवेत आली. तिच्या डाव्या डोळ्यावर मोसंबीएवढी गाठ होती. भारतीताई तिचे रिपोर्टस बघत होत्या. कुठला तरी राहिलेला रिपोर्ट आणायला तिची आई निघून गेली. जाताना तिने मुलीकडे किंवा मुलीने आईकडे पाहिले नाही. कारण सुरक्षित आनंदवनात- भारतीताईंच्या सान्निध्यात त्याची गरजच नव्हती. बरोबर कोणाला न्यायचे, कधी जायचे हे त्यांनी तिला समजावून सांगितले. तिनेही ते निर्भयपणे समजून घेतले. रुग्णाला निर्भयता देणारे त्या मातेचे रूप विस्मित करणारे होते. त्या तासाभरात मला भारतीताईंच्या रुपात आनंदवनाचे शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य जपणाऱ्या जगन्मातेचे दर्शन घडले.

समईच्या ज्योतीप्रमाणे स्निग्ध-शीतल चेहरा असणाऱ्या, ओंकारसाधनेत एकरूप होणाऱ्या, सर्वांवर मायेची पाखर घालणाऱ्या, डॉ. विकास यांच्याबरोबर श्रद्धेने सेवाकार्यात रममाण होणाऱ्या भारतीताईंचे व्यक्तिमत्त्व वंदनीय आहे. समाजात अशी माणसे आहेत म्हणूनच माणुसकीचा झरा चिरंतन आनंदाने सळसळत वाहतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neela kadam write article in muktapeeth