दिवस हुरड्याचे!

निर्मला सु. देशपांडे
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

बऱ्याच दिवसांच्या साठलेल्या आणि मनमुराद मारलेल्या गप्पा साऱ्यांमुळे सुखावलेलं, ताणविरहित, सैलावलेलं मोकळं आनंदी मन, ताजा भाजीपाला, धुराचा सुगंध या साऱ्यांमुळे रानातल्या पार्ट्या अधिक बहारदार होतात आणि घरी जाताना मंडळी पुढच्या वर्षीच्या पार्टीचा वायदा करतात. म्हणजे हे वनभोजन आदिमानवाच्या आजच्या वंशजाला किती आवडतं हेच सिद्ध होतं नाही का?

बऱ्याच दिवसांच्या साठलेल्या आणि मनमुराद मारलेल्या गप्पा साऱ्यांमुळे सुखावलेलं, ताणविरहित, सैलावलेलं मोकळं आनंदी मन, ताजा भाजीपाला, धुराचा सुगंध या साऱ्यांमुळे रानातल्या पार्ट्या अधिक बहारदार होतात आणि घरी जाताना मंडळी पुढच्या वर्षीच्या पार्टीचा वायदा करतात. म्हणजे हे वनभोजन आदिमानवाच्या आजच्या वंशजाला किती आवडतं हेच सिद्ध होतं नाही का?

परवा लक्ष्मी रोडवर हिरवागार हुरडा विकायला ठेवला होता. मुलांच्या हट्टाने थोडा विकत घेतला. घरी आल्यावर गरम करायला गेले, तर सगळा तव्याला चिकटून जळू लागला. तेव्हा लक्षात आलं, की तो हुरडा नव्हताच, तर साखरेच्या हिरव्या पाकात बुडवलेली ती ज्वारी होती.

हुरड्याची ही गंमत पाहिल्यावर मनात आलं, कधी सुरू झाली असेल बरं ही हुरडा भाजून खाण्याची पद्धत आणि वाटलं बहुधा आदिमानवापासूनच असावी. हजारो वर्षांपूर्वी जंगलवासी आदिमानव शिकार करून प्राण्यांचं कच्चंच मांस खात होता. पण जंगलात झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून निर्माण होणारा अग्नी त्यानं पाहिला आणि अशा तऱ्हेने पुढे त्याला अग्नीचा शोध लागला. मग त्यानं जेव्हा मांस अग्नीत भाजून खाल्लं असेल, तेव्हा त्याच्या लक्षात आलं असेल, की अन्न कच्चं खाण्यापेक्षा भाजून खाल्लं तर अधिक चवदार लागतं. तेव्हा तो झाडाच्या पानांत गुंडाळून मांस भाजत असे.

आता तो मातीची भांडी बनवू लागला. त्यात अन्न शिजवू लागला. मग ती मातीची भांडी व्यवस्थित बसण्यासाठी प्रथम खड्डा करून त्याची चूल बनली. चुलीत अग्नी पेटवला की त्यावर पदार्थ मस्त शिजतो हे कळले. त्याचबरोबर खड्ड्यात विस्तव पेटवून त्यातच कंद भाजता येतो, हेही लक्षात आलं. आपण अजूनही हा आदिमानव मनात राखला आहे. रानात जाऊन खळगा खणून त्यात हुरडा, हुळा, रताळी, वांगी, कांदे वगैरे भाजून खाणं हे त्यातलंच एक.
हुरडा खाण्यासाठी खास गुळभेंडी ही ज्वारीची जात शेताच्या एखाद्या तुकड्यात लावली जाते. दिवाळीनंतर हळूहळू शेतात ज्वारी चांगली वाढते. गोड, दुधाळ दाण्यानं कणसं गच्च भरतात. वाऱ्यावर डोलू लागतात. पाखरांचे थवेच्या थवे आमंत्रण मिळाल्यासारखे रानात भिरभिरू लागतात. झाडांवर त्यांची घरटी सजतात. भल्या पहाटेपासून त्यांच्या मंजूळ किलबिलाटाने अवघं रान गाऊ लागतं. त्यांच्यापासून ज्वारीच्या कणसातल्या दाण्यांचं रक्षण करण्याकरिता शेतकऱ्याची धांदल उडते. त्यासाठी ज्वारीच्या शेतात लाकडांचा माळा किंवा माचा घातला जातो. त्यावर उभे राहून वाखाने विणलेल्या गोफणीने खडे मारून वारी खाणारी पाखरं उडवली जातात म्हणजे राखण सुरू होते आणि त्याचबरोबर सुरू होतात हुरड्याचे दिवस.

एखाद्या मोठ्या झाडाखाली ऐसपैस जोरात हा सोहळा सुरू होतो. गुळभेंडीची कोवळी दुधाळ कणसं काढून आणली जातात. मग आगटी म्हणजे हुरडा भाजण्यासाठी आवश्‍यकतेप्रमाणे लहान - मोठा एक खळगा खणला जातो. ती आगटी रानशेठ्या, चगळ घालून पेटवायची. ती चांगली रसरसून पेटली, की तिच्यात दाण्याने भरलेली कणसं खुपसायची. दांड्याला धरून, हलवून सगळीकडून चांगली भाजायची. मग राख झटकून ती हाताच्या तळव्यात धरून चोळायची. छान हुरडा खाली पडतो. फुंकून कूस झटकून गरमागरम हुरडा तोंडात टाकायचा. अहा! काय मस्त गुळमट चव. वा! ही आगटी एकदा सुरवातीला खणली की सबंध हंगामभर राख काढून ती वापरली जाते. मग अधूनमधून मित्रमंडळी, नातेवाईक मंडळींसह मळ्यात हुरडा पार्टी रंगते. एरवी असतंच असं नाही. पण या वेळी मात्र ओलं किंवा सुकं खोबरं, भाजके शेंगदाणे, गूळ, लसणाची खमंग चटणी, कवडी दही अशा सगळ्या चवदार पदार्थांनी हुरड्यासोबत खायला हजेरी लावलेली असते. याचवेळी हरभरा, बोरे यांचीही चलती असते. हा सगळा अस्सल रानमेवा खाऊन तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने ही हुरडा पार्टी संपन्न होते.

आपल्याकडल्या हुरडा पार्टीप्रमाणेच कोकणात थंडीत शेतात मोगा पार्टी किंवा पोपटी करतात. यासाठी खड्ड्यात माठ ठेवून त्याच्यात खाली तळाला प्रथम मीठ आणि ओवा घालतात. या पार्टीसाठी येणारी सगळी मंडळी एखादा पदार्थ घेऊन येतात. त्यात पावट्याच्या शेंगा, मक्‍याची कणसं, भुईमुगाच्या शेंगा, रताळी असं कायबाय असतं. माठात याचे थरावर थर दिले जातात. मग ओव्याच्या वासाच्या पाल्याने माठाचे तोंड बंद केले जाते. वरून झाकण घालतात आणि त्याच्या बाजूने चगळचोथा, गवऱ्या, लाकडाच्या ढलप्या लावून ते पेटविले जाते. माठामध्ये भाज्यांचे थर कसे लावायचे, माठ शेकोटीत कित्ती वेळ ठेवायचा या साऱ्याचे नियोजन जाणकार मंडळी करतात. फक्त चवीला मीठ व पचनाला ओवा एवढंच असूनही भाज्यांमुळं चवीमुळे ही मोगा पार्टी भलतीच बहारदार होते.

देशावरची हुरडा पार्टी, कोकणातली मोगा आणि पोपटी पार्टी या प्रमाणेच खानदेशात भरीत पार्टी केली जाते. असेच रानातच एका विशिष्ट झाडाच्या फांद्या त्यासाठी अगोदरच वाळवून ठेवतात. मग रानात पार्टी असते त्या दिवशी त्याचं पेटवून तिथली प्रसिद्ध वांगी भाजून त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण ठेचा, भरपूर फोडणी, मोठी वगैरे घालून भरीत बनवतात. बरोबर असते कळव्याची भाकरी. गुजरातमध्ये उंधिओ भाजी अशीच शेतात खळगा खणून त्यात माठ ठेवून शिजवली जाते. तर परदेशातला बार्बेक्‍यु हे तरी काय त्याचंच भावंडं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala deshpande's muktapeeth article