बहिणीची वेडी माया

निर्मला खिलारे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

भावासाठी राखी पाठवायचे म्हटले की बहिणीला बाकी काही सुचत नाही. रस्त्यावरची गर्दी, वाहतुकीची शिस्त काही लक्षात येत नाही. हातून नकळत वेडेपणा घडतो. नंतर त्याचीही खूप गंमत वाटते.

भावासाठी राखी पाठवायचे म्हटले की बहिणीला बाकी काही सुचत नाही. रस्त्यावरची गर्दी, वाहतुकीची शिस्त काही लक्षात येत नाही. हातून नकळत वेडेपणा घडतो. नंतर त्याचीही खूप गंमत वाटते.

आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगावमध्ये माझे बालपण गेले. नोकरीनिमित्त पुण्यात आले आणि पुण्याचीच झाले. अनेकदा माझे वडील कामानिमित्त गावावरून पुण्यात यायचे. मला भेटल्याशिवाय परत जात नसत. महिन्यातून एकदा तरी मुक्काम व्हायचाच आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना गाडीत व्यवस्थित बसवून मग मी शाळेत जायची. त्या दिवशीही असेच झाले. शिवाजीनगरच्या गाडीत व्यवस्थित बसवले. गाडी निघाली, तशी मीही माझ्या दुचाकीवरून निघाले. गाडीला मागे टाकून थोडी पुढे आले अन्‌ मला राख्या लावलेले स्टॉल दिसले. चार दिवसांवर रक्षाबंधन आले होते.
मनात चलबिचल झाली. दोन भाऊ मुंबईला आणि सर्वांत मोठा भाऊ गावाला. टपालाने राखी पाठवावी तर उशिरा पोचणार. मनात आले, अनायसे वडील आलेच होते, तर त्यांच्याजवळच राखी द्यायला हवी होती. किमान मोठ्या भावाला तरी वेळेवर राखी पोचली असती.

मोठा भाऊ म्हणजे आमच्या सर्वांचाच अप्पा गावाकडे शेती करतो. कुटुंबात सगळ्यात मोठा. सातवीपर्यंत शिक्षण झालेले. खरे तर अतिशय हुशार, पण अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागले. अप्पा सातवीत होता, त्या वेळी आमच्याकडे शेतात, बैलांचा मांडव असायचा, गाड्यांचे चार बैल, शेतीसाठी दोन बैल, गाया, शेळ्या असा मोठा बारदाना असायचा. नंद्या नावाचा फारच देखणा आणि उमदा बैल होता. त्याला सगळेच घाबरायचे. एकेदिवशी दुपारच्या वेळी बैलांना पाणी पाजायचे म्हणून आई बादली घेऊन गेली. आईने नंद्यासमोर बादली ठेवली. पण नंद्या जोरात हालला अन्‌ आई दाव्यात पाय अडकून पडली. फारसे लागले नव्हते. पण गाव छोटे असल्यामुळे ही बातमी अप्पाला शाळेत समजली. अप्पा दप्तर घेऊन पळतच घरी आला. दप्तर जवळ जवळ फेकूनच दिले. तसाच मांडवाकडे धावत गेला. मांडवावरचा चाबूक काढला आणि दोन-तीन फडके नंद्याला मारलेच. आई समजावत होती, ""अरे, संभाजी, मला फार काही लागले नाही, कशाला त्या मुक्‍या जनावरावर राग काढतोस.'' अप्पा म्हणाला, ""उद्यापासून बैलांचे सगळे मी बघेन. तू मांडवाकडे येऊ नकोस, तुला काही झाले तर... त्यापेक्षा मी शाळेत जात नाही. आता हीच माझी शाळा.''

खरे तर अप्पाचा नंद्यावर खूप जीव. साऱ्याच जनावरांवर त्याचे प्रेम होते. पण त्या साऱ्यांपेक्षाही आई. अप्पाची शाळा बंद झाली ती कायमचीच.
तर, अशा या अप्पाला दादांसोबत राखी पाठवायचीच, असे एका क्षणात मनाने पक्के केले. पण दादा गाडीत. मी माझ्या दुचाकीचा वेग वाढवला. वडिलांची गाडी आणि माझी दुचाकी जवळ जवळ चार थांब्यांपर्यंत बरोबर राहणार होती. मी गाडीच्या पुढेच होते. एका स्टॉलजवळ गाडी थांबवली. सुंदर राख्यांनी स्टॉल सजलेला होता. आकर्षक राख्यांनी मन मोहून गेले. पण राख्या निवडून घेण्याची ती वेळ नव्हती. पटकन सुंदर गोंड्यांच्या सहा राख्या घेतल्या. दर रक्षाबंधनला आई देवाला, तुळशीला, उंबराच्या झाडाला ते गोंडे वाहत असायची. दुकानदाराने ते गोंडे कागदाच्या पुडीत बांधून दिले. ती साध्या कागदाची पुडी मी सनकोटाच्या खिशात ठेवली. घाईघाईने पैसे काढून दिले. दुचाकी चालू केली. तोपर्यंत ती गाडी माझ्यापुढे गेली होती. मी पुन्हा माझ्या दुचाकीचा वेग वाढवला.

राख्यांची पुडी दादांना द्यायची कशी? गाडी तर माझ्यासाठी थांबणार नव्हती. पण राख्या काहीही करून द्यायच्याच, एवढी जबरदस्त इच्छा मनात होती. मी गाडीच्या उजव्या बाजूने दुचाकी चालवत होते. कारण ड्रायव्हर सीटमागे तिसऱ्या सीटवर खिडकीजवळ दादा बसले होते. गाडीत गर्दी होती. काय करावे सुचत नव्हते. माझी शाळा यायला एकच थांबा राहिला होता. मग गाडी पुढे जाणार होती. मी दुचाकी कुठेतरी उभी करून गाडीत जाऊन त्या राख्या देण्याइतका वेळही नव्हता. पण अगदी शाळेच्या जवळच्या सिग्नलला गाडी थांबली. मी गाडीच्या उजव्या बाजूने दुचाकी चालवत त्या खिडकीजवळ आले. खिशातून पुडी काढली. दादांना हाका मारल्या. पण त्याना ऐकू आले नव्हते. त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या एकाला मी म्हटले, "" फेटेवाल्या आजोबांना ही पुडी द्या, प्लीज.'' एकाने माझ्या हातातून ती पुडी घेतली. दादांकडे दिली. मला पाहून दादांना बरे वाटले, मग मीही ओरडूनच सांगितले, ""त्या पुडीत राख्या दिल्या आहेत. अप्पाला बांधायला सांगा''

सिग्नल सुटला. गाडी निघाली. पुढे भेट झाल्यानंतर अप्पाने सांगितले, की "तू पाठविलेली राखी मी बांधली होती.'
दहा वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. पण अजून दर राखी पौर्णिमेला ती धडपड आठवते. किती वेडेपणाने वागले होते मी त्या खूप रहदारीच्या रस्त्यावर. वेड्या बहिणीची वेडी माया, दुसरे काय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirmala khilare write article in muktapeeth