सायकलवरून गाठले नेपाळ

सायकलवरून गाठले नेपाळ

तरुणपणातले झपाटलेपण काही वेगळेच असते. वीस-एकवीस वर्षांचे चार तरुण सायकलवरून नेपाळला निघाले. अनेक अडचणींवर मात करीत पन्नास दिवसांचा प्रवास करून आले. तीस वर्षे उलटल्यानंतरही त्यांच्यासाठी हा अनुभव ताजा आहे.

साधारण तीस वर्षांपूर्वी पुण्यात दुचाकींचा वापर वाढावयास लागला तरी, "सायकलींचे शहर' ही पुण्याची ओळख पूर्णपणे पुसली गेली नव्हती. घरटी एक-दोन सायकली त्या वेळी नक्कीच पहायला मिळत आणि त्याचबरोबर सायकल वाहनतळ, सायकलची दुरुस्तीची आणि सायकली भाड्याने देणारी दुकाने चौकाचौकांत दिसत. त्याकाळी पर्वतीमधील लक्ष्मीनगरच्या पूरग्रस्त वसाहतीतील पाच-सहा तरुण काहीतरी आगळे-वेगळे धाडस म्हणून थेट भारताबाहेर सायकलने दौरा करण्यासाठी झपाटून गेले आणि नेपाळला निघाले. आजच (30 जून) आमच्या या सायकलदौऱ्याला तीस वर्षे पूर्ण होत आहेत.

आमचा सायकलिंग क्षेत्रातील तुटपुंजा अनुभव, अपुरे आर्थिक पाठबळ, आयुष्यातील महत्त्वाची शेवटची शैक्षणिक वर्षे, घरातील लोकांचा विरोध आणि अशा अनेक अडचणींवर मात करून हा दौरा केला होता. त्यातही हा प्रवास दोन्ही बाजूने सायकलनेच करणार असल्यामुळे सायकलप्रवासाचा कालावधी मोठा होता. सुरवातीला अनेकांनी उत्साह दाखवला. मात्र शेवटी विनायक खडके, प्रताप कदम आणि किरण शिंदे यांच्यासह मी असे चारच जण या साहसी दौऱ्यासाठी जाण्यास तयार झालो. या प्रवासासाठी येण्याजाण्याच्या योग्य मार्गनिश्‍चितीचे अवघड काम केले. संपूर्ण भारताच्या रस्त्याच्या नकाशावर दोन गावांमधील अंतरे दौऱ्याच्या आणि पट्टीच्या सहाय्याने मोजली. रोज साधारण 100 ते 125 किलोमीटर सायकल चालविण्याच्या क्षमतेचा विचार करून मार्गनिश्‍चिती झाली आणि आश्‍चर्य म्हणजे हे सर्व अंदाज तंतोतंत अचूक ठरल्याची प्रचितीही नंतर आली.

यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दौऱ्यासाठी लागणारे पैसे. घरातून विशेष मदत मिळणार नव्हती. लोकवर्गणीचाच आधार होता. आमच्या वसाहतीतील सुरेशशेठ देसाई, विठ्ठल कोंढरे यांच्याबरोबरच सह्याद्री सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची व इतर मित्रमंडळींची खूपच मदत झाली. जवळपास पन्नास दिवसांच्या दौऱ्याचा आम्हाला त्याकाळी सर्व मिळून खर्च आला होता सुमारे साडेसात हजार रुपये आणि आमच्या नेपाळमधील खरेदीसह संपूर्ण दौऱ्याचा खर्च झाला होता तेरा हजार सातशे रुपये. या प्रवासासाठी पुणे पोलिस आयुक्तांचे व लायन्स क्‍लबचे पत्र आमच्यासाठी फारच उपयोगी ठरली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बऱ्याचशा कार्यालयांमधून आमच्या राहण्याबरोबरच जेवणाची व्यवस्था झाली होती. आम्ही 12 मे 1987 या दिवशी निघालो. आमच्या सायकली अत्यंत साध्या म्हणजेच विनागिअरच्या होत्या. त्याकाळी वापरले जाणारे प्रवासी धनादेश, थोडीफार आवश्‍यक रोकड, सायकलींची प्राथमिक दुरुस्ती आणि इतर आवश्‍यक गोष्टींच्या जमवाजमवी करून भक्कम मनोधैर्याने आम्ही निघालो.

अहमदनगर, औरंगाबाद, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशी मजल-दरमजल करीत आम्ही पंधरा दिवसांनी नेपाळ सीमेवर पोचलो. नेपाळमधील डोंगराळ परिसराचा विचार करता सीमेपासून काठमांडूपर्यंतचा प्रवास बसने करण्याचे ठरवले होते. नेपाळमध्ये एकंदर सहा दिवस पर्यटनाचा आनंद घेतला. नेपाळमधील आमचे मुक्काम काठमांडू, भक्तपूर आणि पोखरा येथे झाले. तसेच नेपाळमध्ये काही ठिकाणी सायकलने प्रवास करण्याचा आनंदही घेतला. परतीचा प्रवास उत्तर प्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यांतून करीत महाराष्ट्रामध्ये पंचवीस दिवसांनी प्रवेश केला. त्यानंतर मुंबईतील तीन दिवसांच्या मुक्कामानंतर आम्ही 30 जूनला पुण्यामध्ये परत आलो. त्या वेळी आमच्या मागे धावत येत आमचे सहर्ष स्वागत करणाऱ्या शेकडो मुलांचा थवा अजूनही नजरेसमोर आहे.

या दौऱ्यात एखाद्या वाईट अनुभवाचा अपवाद वगळता मिळालेल्या चांगल्या अनुभवाची शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकी आहे. जवळपास साडेचार हजार किलोमीटरचा सायकलप्रवास, त्यात अनुभवायास मिळालेले तेथील जीवन आणि आदरातिथ्य बरेच काही शिकवणारे होते. ऐतिहासिक व धार्मिक शहरे, प्रेक्षणीय स्थळे पाहिलीच, पण याबरोबरच आमच्या आवडीनुसार आणि सवडीनुसार घेतलेला आनंद आता कितीही पैसे मोडले तरीही मिळणार नाही. ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्तरातील लोक आमची आस्थेने चौकशी करीत. आमची जेवणाखाण्याची व्यवस्था करीत, बक्षिसीही देत आणि प्रवास काळजीपूर्वक करण्याचा मायेचा सल्लाही देत. वीस-एकवीस वयाची मुले सायकलवरून महाराष्ट्रातून आपल्या प्रदेशामध्ये सर्वधर्मसमभाव व व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन आली आहेत याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे. या प्रवासात देशातील चार राज्यांबरोबर नेपाळमधील जनजीवनाचे बारकाईने निरीक्षणही करायला मिळाले.

मे-जूनमधला उत्तरेतील उन्हाळा परीक्षा पाहणारा असतो. शक्‍यतो दुपारी बारा ते चार वाजेपर्यंतचा सायकल प्रवास आम्ही टाळत असू. दिवसभर सायकल चालविल्यानंतर मिळणारे कोणतेही अन्न पूर्णब्रह्म असल्याची खात्री आणि थकून गेल्यानंतर रात्री सहज लागणारी झोप दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाची ऊर्जाच ठरत असे. या सर्व प्रवासात निसर्गाने आमची पुरेपूर परीक्षा पाहिली, त्यामध्ये राजस्थानमधील वाळूचे वादळ आम्ही कधीच विसरू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com