उच्च शिक्षणाला पर्याय नाही

Higher_Education
Higher_Education

मी मुख्य नागपुर शहरापासून दहा एक किलोमीटर दूर राहतो आणि हे अंतर तसं बघितलं तर फार नाही आहे. अगदी माझ्या बालपणापासून दळणवळणाची साधने पण मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आधी एसटीचा लाल डब्बा, नंतर स्टार बस व सोबतीला ऑटोरिक्षा यांची बरीच रेलचेल सुरुवातीपासूनच असायची. अंतराबद्दल बोलायच झालं तर नागपूरमधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय माझ्या घरापासून अगदी आठशे मीटर अंतरावर आहे, वैद्यकीय महाविद्यालय पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालय हे आठ किलोमीटर अंतरावर आहे. ही सगळी अंतरे सांगण्यामागचे कारण असे की ही वेगवेगळी अंतरे आपल्याला फार वाटत नाही आणि इतक्‍या कमी अंतरामुळे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये खूप काही फरक पडणार नाही असा बहुतेकदा आपला समज असतो.

दहावीचा निकाल हाती येईपर्यंत डॉक्‍टर व्हायच असेल तर अकरावी ला प्रवेश घ्यायचा आणि अभियांत्रिकीकडे जायच असेल तर तंत्रविद्यानिकेतन (Polytechnic) ला प्रवेश घ्यायचा यापलीकडे काहीच माहित नव्हत. अभियांत्रिकीला राज्यस्तरीय महाविद्यालये वेगळे, राष्ट्रस्तरीय वेगळे नंतर आयआयटी (IIT) वेगळे आणि त्यासाठी दिल्या जाणाऱ्या परीक्षा पण वेगवेगळ्या हा प्रकार कधी कानावर पडलाच नव्हता. याच धर्तीवर इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांबद्दल आम्ही अडाणीच होतो. त्यामुळे माझ्या वर्गातील आणि आमच्या सोबत असणारी इतर शाळेतील विद्यार्थी वर दिलेल्या दोन पर्यायांपैकी एकाकडे वळले. अवघ्या वीस-तीस मिनिटांच्या अंतरावर सर्व प्रकारची महाविद्यालये असून सुद्धा असा प्रकार घडत असेल तर इतरत्र ग्रामीण आणि दुर्मिळ भागात काय अवस्था असेल याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो.

माहितीच्या अभावी बऱ्याच लोकांना समोर दिसत असलेल्या दोनच क्षेत्रात जावे लागते. स्वतःला काय करायचं हा तर दूरचा प्रश्न होऊन बसतो. त्यामुळे फार लोकं समोर जाऊन उच्च शिक्षण घेत नाहीत. घेतले तरी ते पालकांच्या दबावात घेतले जाते आणि कौशल्य मात्र अवगत करता येत नाही.
जीवनाची खरी कसोटी ही या टप्प्यापासून सुरू होते. आपण उच्च शिक्षित नसल्याने साहजिकच आपल्याला महत्त्वपूर्ण आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाही. आपले मित्रमंडळी उच्च शिक्षित नसल्याने शिफारस पण आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपण होतो त्याच सामाजिक वर्गात आयुष्यभर जगत राहतो. शिक्षण आपल्या राहाणीमानाचा दर्जा उंचावत नाही आणि एकंदर समाजातील आपले स्थान आहे तसेच राहते. दोन-तीन दशकांआधी चित्र अगदी याच्या उलट होतं. उच्च शिक्षण घेतलेलं असेल तर हमखास छान नोकरी मिळायचीच आणि सहजरित्या सामाजिक व आर्थिक शिडी चढता येत असे. तेच इतर व्यवसाय क्षेत्रात पण होत असे. कष्ट केले आणि व्ययसायाशी प्रामाणिक असलो की बहुतेकदा यश हाती लागायचचं.

"न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रकाशित केलेल्या "क्‍लास मॅटर्स' या पुस्तकात उच्च शिक्षणामुळे होणाऱ्या वर्गवारीचे उदाहरणासहित दाखले देण्यात आले आहेत. उच्च शिक्षित घरातील मुलांचा कल उच्च शिक्षणाकडे नेहमीच जास्त असतो. उच्च शिक्षणामुळे मोठ्या खात्यातील नोकऱ्या हमखास ठरलेल्या असतात, नोकरी नाहीच मिळाली तरी आधीच उच्च शिक्षित घरातून असल्याने आणि नंतर अशाच वर्तुळात असल्याने शिफारस मिळणे अगदी सोपं होतं. त्यामुळे एखादी कमी शिक्षित व्यक्ती एखादे काम करायची कुवत जरी ठेवत असेल तरी त्याची वर्णी लागत नाही. अशाप्रकारे सर्व महत्त्वाची आणि मोठी कामे ही एका विशिष्ट वर्गाकडे एकवटली जातात आणि इतर लोकांना सामाजिक गतीशीलतेसाठी (Social Mobility) फार वाव राहत नाही.

वर्तमान काळात बहुतेक सर्वच महत्त्वाची संसाधने ही काही लोकांकडे एकवटली जात असताना आपण बघत आहो. याची बरीच ताजी उदाहरणे तुम्हाला दूरध्वनी, संरक्षण, रेल्वे आणि इतर ठिकाणी दिसून येतात. या सर्व प्रकारामुळे सामाजिक गतीशीलता ही दिवसेंदिवस खूप कठीण होत चालली आहे. पूर्वीप्रमाणे आता सामाजिक गतीशीलतेचे विविध मार्ग उरलेले नाहीत. त्यामुळे आपण असलेल्या सामाजिक स्तरातून स्वतःला प्रामाणिकपणे बढती मिळवून द्यायची असेल तर उच्च शिक्षण घेणे याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com