यंदा साजरी होणार आगळी वेगळी आषाढी

vithhal.
vithhal.

पुढच्याच आठवड्यात आषाढी एकादशी. विठ्ठलभक्तांचे मन कधीच पंढरीकडे धाव घेऊ लागलंय. त्यांच्या मनात आणि विचारात फक्त आणि फक्त विठुरायाच आहे सध्या. त्यांच्या लाडक्‍या विठुमाऊलीला भेटण्यासाठी तर सगळे अगदी आतुर झाले आहेत.

विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ! आणि वारकऱ्यांचा तर विठ्ठल म्हणजे श्वास ! विठ्ठल म्हणजे ध्यास ! वारकरी संप्रदायासाठी तर पंढरीची वारी म्हणजे पर्वणीच ! आषाढीची वारी चुकवेल तो वारकरी कसला हो ! लेकराला जशी माऊलीला भेटण्याची ओढ तशीच वारकऱ्यांनाही विठ्ठल भेटीची ओढ लागलीय आता . म्हणूनच तर पांडुरंगाला विठुमाऊली म्हटलेय ना ! वारकऱ्यांचे तृषार्त मन माऊलीला भेटल्याशिवाय शांत होत नाही. जेवढी भक्ताला देवाला भेटण्याची ओढ त्याहीपेक्षा जास्त देवाला भक्ताच्या भेटीची ओढ लागलीय. " विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला " हे गीत किती समर्पक आहे नाही !! पण.....

पण यावर्षी काही आक्रीतच घडलंय जणू ! इतक्‍या वर्षांची वारकऱ्यांची पायी वारीची परंपरा प्रथमच खंडीत झालीय. या कोरोनारुपी विषाणूने अवघ्या जगाला ग्रासले असताना आपली पंढरीची वारी तरी यातून कशी सुटणार हो ! तिही या विषाणूमुळे ग्रासली गेलीय. त्यामुळे वारकऱ्यांवर जणू आभाळच कोसळलेय ! संपूर्ण वर्ष विठ्ठल दर्शनाची आस असणारे वारकरी माऊलीचे दर्शन यावर्षी घडणार नाही म्हणून हवालदिल झाले आहेत.

सध्याची विलक्षण परिस्थिती लक्षात घेता सरकारने आषाढीची पायी वारी स्थगित केली आहे. त्याऐवजी संतांच्या पादूका काही निवडक वारकऱ्यांसमवेत विशेष गाड्यांनी आणि विमानाने पंढरपुरला नेण्याची व्यवस्था सरकारने केलीय. त्यामुळे सरसकट सर्व वारकऱ्यांना काही पंढरीला जाता येणार नाही.

वारकरी पडले मुळातच शांत व सोशिक ! त्यामुळे त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता सरकारी आदेशाला त्यांच्या माऊलीचाच आदेश मानून कुठलाही गोंधळ न घालता तो शांतपणे स्वीकारला. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यांनी विठुमाऊलीला यंदा न भेटण्याचे मनोमन मान्य केलेय. परंतु हा निर्णय घेताना त्यांना किती यातना झाल्या असतील हे केवळ तेच जाणतात. संपूर्ण वर्ष ज्याच्या भेटीची आस धरून ते आपले नित्यकर्म पार पाडत असतात ती माऊलीभेटच यंदा होणार नाही. माय-लेकराची भेट यावर्षी होणे शक्‍य नाही , हे त्यांच्यासाठी किती क्‍लेशकारक आहे याची आपण फक्त कल्पनाच केलेली बरी !

जी अवस्था भक्ताची तीच अवस्था देवाचीही नाही का ! पांडुरंगही त्याच्या भक्तांच्या भेटीसाठी किती आतुर झाला असणार ! तो तर " कर कटावरी " घेऊन वर्षभर भक्तांची वाट बघत " विटेवरी ऊभा " आहे त्याच्या पंढरीत ! त्याचाही किती हिरमोड होणार हो ! आषाढीची वारी म्हणजे विठूरायाचीही आनंदयात्राच नाही का ! सर्व भक्तांच्या भेटीचा आषाढी एकादशीचा दिवस त्याच्यासाठी किती महत्वाचा असेल , तुम्हीच विचार करा बरे ! आणि यंदा तर त्याला त्याच्या प्रिय भक्तांच्या भेटीशिवायच हा दिवस साजरा करावा लागणार. साजरा कसला हो , घालवावा लागणार !

म्हणून यावर्षी पांडुरंगानेही ठरविले आहे की आपले भक्त आपल्या भेटीला येऊ शकणार नाहीत तर काय झाले आपण स्वतःच त्यांचा भेटीला जायचे आणि खरेच निघाले की विठ्ठल-रखुमाई त्यांच्या गरूडवाहनाने भक्तांच्या भेटीला ! यंदाची ही आषाढी खरेच आगळीवेगळी असणार आहे ! मला विश्वास आहे , प्रत्येक वारकऱ्याला त्याच्या घरीच भेटणार आहे त्यांची विठुमाऊली ! त्यांचे माऊलीसाठी तृषार्त झालेले मन नक्कीच शांतवणार आहे , मला खात्री आहे ! कारण विठुमाऊलीलाच करमणार नाही ना तिच्या लेकरांना भेटल्याशिवाय , हो ना ! लेकरांना त्यांच्या माऊलीला भेटण्याची परवानगी नाहीये पण माऊलीला तिच्या लेकरांची भेट घेण्यापासून कोण रोखू शकते हो !

संत जनाबाईने तिच्या अभंगात म्हटलेच आहे ना , " विठू माझा लेकुरवाळा , संगे गोपाळांचा मेळा" तर असा लेकुरवाळा विठू त्याच्या रूख्माई सोबत नक्की जाणार त्याच्या भक्तांकडे. यंदाची आषाढी एकादशी भक्तांच्या सहवासातच साजरी होणार कारण माऊली आपल्या परम भक्तांशिवाय एकादशीचे हे पावन पर्व साजरे करूच शकत नाही , मला विश्वास आहे ! देव सदैव भक्तांच्या भावाचा भुकेला असतो आणि त्याची क्षुधाशांती ही त्यांना भेटूनच होणार , नाही का !

चला तर मग , कशाला पंढरीची वारी चुकली म्हणून खंत करायची ! यंदाचे हे आषाढीपर्व तर एकदम आगळे असणार आहे , नाही का ! चला , आपण सगळे विठुमाऊलीचे स्वागत करण्यास सज्ज होऊया ! ही आगळीवेगळी आषाढी आपल्या घरीच आपल्या विठुमाऊलीसमवेत आनंदाने साजरी करूया ! घरीच पंढरीचे सुख अनुभवूया !
" जय जय रामकृष्णहरि" चा जप करूया. ही आगळीवेगळी आषाढी कायम स्मरणात राहील भक्तांच्या आणि पांडुरंगाच्या सुध्दा , खरे की नाही !!

बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल ,जीवभाव

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com