जगाच्‍या कल्‍याणा, जाळणे स्‍वतःला, ऐसी एक ज्‍वाला, सदा पेटो

unlock learning
unlock learning

सौंदर्यस्‍थळं आपल्‍या आसपास असतात. आपली दृष्‍टी तेवढी शोधक ठेवावी लागते. एखाद्या ठिकाणाचे वैभव न्‍याहाळताना आपल्‍याला पूर्वसुरीने स्‍मरणात असलेल्‍या स्‍थळांची आठवण होते. माणसाला नजीकच्‍या वैभवापेक्षा लांबच्‍या सौंदर्याची ओढ सर्वाधिक असते. आदिवासी विकास विभागात काम करताना दुर्गम भाग, डोंगरद-या, आदिमांची संस्‍कृती व बोली जवळून अनुभवता आली. पालकसंपर्काच्‍या निमित्‍ताने लांबच्‍या गावांतील संवेदना जाणून घेण्‍याचा योग नेहमी यायचा. पण, जवळचं गाव आपल्‍या हातून कायम सुटून जायचं. यावर्षी कोरोना प्रभावामुळे ‘अनलॉक लर्निंग’ उपक्रमांतर्गत मुलांच्‍या घरी प्रत्‍यक्ष संपर्क साधून अध्‍यापन, मार्गदर्शन करण्‍याचे काम संपूर्ण महाराष्‍ट्रभर सुरू झाले. मागील आठवड्यात शाळेपासून सात किमी अंतरावर असलेल्‍या जंगुगुडा, आनंदगुडा गावाला विद्यार्थी मार्गदर्शनाकरिता भेट दिली. या गावातील मुलं आश्रमशाळेत लवकर उपस्थित होणारी, त्‍यामुळे अनुपस्थितीबाबत गावाला भेटी देण्‍याचे प्रमाण कमीच होते.

आम्‍ही घरोघरी पुस्‍तके वाटप करण्‍याकरिता जंगुगुड्यात पोहचलो. अत्‍यंत स्‍वच्‍छ आणि सुंदर आदिवासी गाव. मुख्‍य महामार्गापासून एक किमी अंतरावर डोंगराच्‍या जवळ वसलेलं. तेथील सुनियोजित गृहरचना मला प्रचंड भावली. गावातील सर्व रस्‍ते मी मुद्दाम फिरून घेतले. आणि सर्वात शेवटी सरस्‍वती नावाच्‍या विद्यार्थिनीच्‍या घरी पोहोचलो. या गुड्यावरील आदिवासींच्‍या शेतजमिनी बऱ्यापैकी सुपीक असल्‍याने घरांचे बांधकाम पक्‍क्‍या विटांचे होते. दुपार सरत आली होती. डोंगरात सूर्य मावळतीच्‍या दिशेने चालला होता. पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतल्‍याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. गावातील बरेच पालक शेतीच्‍या कामात गुंतले होते. शाळा बंद असल्‍याने गावातील मुलं रस्‍त्‍यांवर मनसोक्‍त खेळताना दिसली. आमच्‍या शाळेची मुलं ‘सर, शाळा कधी सुरू होईल?’ असा गंभीर प्रश्‍न विचारून आम्‍हाला निरुत्‍तर करीत होती.

मुलांना आठवड्याचे गृहकार्य देऊन, आमची पावलं परतीच्‍या प्रवासाला लागली. अचानक माझं लक्ष काही ओस पडलेल्‍या घरांकडे गेलं. आठ-दहा मजबूत भिंतींची घरं. भिंती डौलात उभ्‍या मात्र घरावरचे कवेलू, फाटे गायब. भिंतींचा रंगही अजून फिका पडला नव्‍हता. मी अचंबित झालो. पांढ-या शुभ्र शर्टाला एखादा काळा डाग लागावा आणि त्‍याचे सौंदर्य मलूल व्‍हावे, तसे काही काळ गावावरून नजर फिरवल्‍यावर झाले होते. जगण्‍याच्‍या प्रसन्‍न वृक्षावर कुणीतरी कु-हाडीने घाव केला होता. मी न राहून सरस्‍वतीच्‍या आईला विचारले. तेव्‍हा ती म्‍हणाली, तरुण पोरं गावात मोठ्या माणसांचे ऐकत नाही. पोरापोरांचे झगडे झाले आणि गाव सोडून सर्व फाट्यावर जाऊन बसले. मला धक्‍काच बसला. किती कठीण असते, आपण आपली माणसं, माती सोडून क्षुल्‍लकशा वादातून स्‍वतःची परवड करून घेतो.

फाट्यावर एक नजर टाकली तर असे लक्षात आले की, अनेकांच्‍या घराचे काम अपूर्णच होते. त्‍यांच्‍या पूर्वजांनी भिंती बांधल्‍या होत्‍या, माती विटांनी चिनल्‍या होत्‍या, त्‍याच वास्‍तुंना नव्‍या पिढीने सुरुंग लावला होता. भकास आणि भणंग झालेली घरं; त्‍या गुड्याला कुरुपता आणत होती. रुसलेल्‍या माणसाला हसवता येईल, पण मनाने दूर गेलेल्‍या माणसाला जवळ आणणे कठीणच. दुर्गम भागातले आदिवासी एखाद्या ठिकाणी विपरीत काही घडले की, ती जागा सोडून दूर नव्‍या जागी आपला संसार उभा करायचे, हा त्‍यांच्‍या संस्‍कृतीचा एक भाग होता. आज केवळ मतभेदातून स्‍वतःची घरे उद्ध्‍वस्‍त करून, निघून जाण्‍याचा नवा प्रघात पहिल्‍यांदाच अनुभवायला मिळाला.

गावगाड्यात अजूनही हातभर धुऱ्यावरून वाद निर्माण होतात. कोर्टात असे वाद कित्‍येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. आमचे शेतकरी एकर दोन एकर वावर पाडून ठेवणार. पण, वीतभर जागेसाठी आयुष्‍यभराची मानसिकता खराब करून बसणार. या जगण्‍याच्‍या जंजाळातून निघून जाताना चार माणसे आणि पाच हात जागा यापलीकडे काहीच लागत नाही. वाद संयमाने आणि त्‍यागाने सुटतात. एका गावाचे दोन प्रवाह झाले. याचे दुःख गाव उभे करणाऱ्या माणसांच्‍या मनाला झाले. पण, नव्‍या पिढीला तसूभरही त्‍याचे वाईट वाटले नाही. संवेदनेची तार मायावी भावविश्‍वात विरत चालली आहे.

असे गावातच घडते असे नाही. विचारांची विविधता एकसंध होण्‍याऐवजी परस्‍पर विरोधी झाली म्‍हणजे, समान विचारधारेत दोन गट पडतात. आपण प्रचंड विश्‍वासाने एखाद्या विचारप्रवाहात झोकून देण्‍याचा प्रयत्‍न करतो. हळूहळू तेथील वास्‍तव कळायला लागलं म्‍हणजे, आपसूकच आपल्‍या मूळ मानवतावादी विचारांचा श्‍वास कोंडतो. आपली घुसमट होते. कालांतराने तेथे विचारांना मरण येऊन राजकारण, कंपुगीरी, दबावतंत्र सुरू होते. चळवळी मरतात. केवळ वळवळ कायम उरते. ज्‍या चळवळी व्‍यक्‍ती मोठी होण्यापेक्षा संस्‍था मोठी करण्‍यास्‍तव काम करतात; त्‍या काळाच्‍या कसोटीवर जिवंत राहतात.

मला आठवते आमच्‍या गावात गुरुपौर्णिमेला एकच गोपाळकाला व्‍हायचा. तेव्‍हा कुठल्‍यातरी महाराजांचा एकच सत्संग होता. कालांतराने पुन्‍हा एका नव्‍या सत्‍संगाची भर पडली. गावात दोन काले व्‍हायला लागले. माणसं विभागल्‍या गेली. माणसांची वाटणी करण्‍याचे षडयंत्र आजचे नाही. प्रत्‍येक धर्मात दोन पंथ तयार झालेत. जातींची उतरंड कायम आहे. एकाच जातीच अनेक पोटजाती. राजकीय पक्षांचेही तसेच. कामगारांचे पक्ष, शेतक-यांची संघटना प्रवाहासोबत वाहत गेली.

कामगार, शेतक-यांचे प्रश्‍न जैसे थे आहेत. मात्र पक्षांची धुरा सांभाळणारे मालामाल झाले. संस्‍था मोठी होण्‍यापेक्षा माणसं मोठी होण्‍याची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे विचारांना मरण येत असते. प्रत्‍येक जातीचे स्‍वतंत्र सभागृह. मग एखाद्या मोक्‍याचे जागेचे अतिक्रमण. हे सारे मानवी अस्तित्‍व अबाधित राखण्‍यापेक्षा स्‍वजात, स्‍वधर्म अस्तित्‍व टिकवण्‍यासाठी चाललेली लढाई आहे.

घोटभर पाणी, श्‍वास घेण्‍या हवा
हीच एक दवा, माणसाला .
तसे कुठे सोपे? चुलीशी भांडणे
दुकान मांडणे, वेगळाले.
जगाच्‍या कल्‍याणा, जाळणे स्‍वतःला
ऐसी एक ज्‍वाला, सदा पेटो.

अमेरीकासारखा भांडवलशाही देश जगात आपले वर्चस्‍व कायम र‍हावे म्‍हणून, दोन देशांच्‍या वादात आपले तोंड खुपसतो. चीन, पाकिस्‍तान आपल्‍या देशाच्‍या सीमाभागांत नेहमी कुरघोड्या करतात. सीमा, देश, जात, धर्म सुरक्षित राहिले पाहिजे; हे जरी खरे वाटत असले तरी; पृथ्‍वी, निसर्ग, माणूस सुरक्षिततेची जबाबदारी स्‍वअस्तित्‍वाशी निगडीत आहे. आणि काळाच्‍या ओघात आपण हेच विसरत चाललो आहोत. सत्‍ता, संपत्‍ती, प्रतिष्‍ठा, हुद्दा, यश, गरिबी, अपयश, अप्रतिष्‍ठा, कामाचा दर्जा हे सारे आम्‍ही ठरवलेले मानवी मूल्‍यमापनाचे निकष. या निकषांवर तयार झालेली गुणपत्रिका मानवाच्‍या गुणवत्‍तेचा आलेख ठरवत नसते.

पूर्वी मी जेव्‍हा माझ्या घरापासून लांबवर नजर टाकायचो, तेव्‍हा माझ्या दृष्‍टीपटलावर उंच टुमदार इमारत दिसायची. त्‍या लगतची झाडं खुजी दिसायची. आता झाडांनी इमारत झाकोळल्‍या गेली. इमारतीचे शक्‍य तितके मजले चढले अन निर्जीवतेच्‍या बाहुपाशात अडकली. झाडं मात्र सजिवांच्‍या कसोटीत पूर्णतः उतरून आभाळाच्‍या दिशेने उंच वाढत राहिली. पुढे आभाळ कवेत घेईलही. झाडांच्‍या उंच वाढण्‍यानं इमारतीचे अस्तित्‍व कमी झाले नाही. किंवा झाडांना वेगळे वलय प्राप्‍त झाले नाही.

ज्‍याच्‍या त्‍याच्‍या कर्तृत्‍वाला समाज व्‍यक्तिनिष्‍ठत्‍वाच्‍या कसोट्या लावून मोकळा होत असतो. अस्तित्‍वासाठी चाललेली लढाई महाकाव्‍यांपासून महाकाय आंतरजालापर्यंत कायम सुरू आहे. यात माणसाच्‍या विनाशाची बीज दडलेली आहेत. माणूसपणाची उंची केवळ स्‍वअस्तित्‍वाने ठरत नाही, तर समूहाच्‍या अस्तित्‍वखुणा अबाधित राखल्‍या पाहिजे. तेव्‍हाच मानवाचे कल्‍याण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com