दैव बलवत्तर (मुक्‍तपीठ)

पल्लवी पाठक
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

सोयीच्या रेल्वेगाडीचे तिकीट मिळाले नाही म्हणून थोडे वाईट वाटले होते, पण त्यामुळेच आपण वाचलो हे कळल्यावर...

माझा मुलगा पाच-सहा वर्षांचा असतानाची गोष्ट. नाशिकला राहात होतो. माझे पती त्यांच्या कंपनीतर्फे ‘प्लास्ट इंडिया’ प्रदर्शन पाहायला दिल्लीला जाणार होते. बरोबर एक सहकारी असणार होता. पण, पंजाब मेलचे रिझर्व्हेशन काही मिळाले नाही. विमानाचे तिकीटही मिळेना. त्यामुळे जाणे रद्द होणार, असेच दिसत होते. मला मुलाला घेऊन एकटीला राहावे लागणार होते, पण नवऱ्याला कंपनीने पाठवले म्हणून छान वाटत होते. शेवटच्या क्षणी ‘मंगला एक्‍स्प्रेस’चे रिझर्व्हेशन मिळाले. मला त्यानी दाखवले. ‘हीच रेल्वे कोकणातून जाते ना?’ मी विचारले. ‘हो, आपण एकदा या गाडीने कोकणात जाऊ,’ असे मंत्र्यासारखे आश्‍वासन देऊन नवऱ्याने मला खूषही केले होते. ठरल्याप्रमाणे ते व त्यांचे सहकारी दिल्लीला गेले. 

मुलगा दिवसभर कंटाळला होता. त्याला घेऊन बाहेर जाण्यासाठी मी तयारीच करत होते. तेवढ्यात नवऱ्याच्या ‘बॉस’चा फोन आला, ‘‘गिरीश पंजाब मेल से गया है ना?’’ 

मी उत्तरले, ‘‘नही, पंजाब मेल का रिझर्वेशन नही मिला. इसलिये मंगला एक्‍स्प्रेस से गये है।’’ 

‘‘पक्का मालूम है?’’ आवाज जरा वेगळाच वाटला त्यांचा. 

मी म्हटलं, ‘‘हाँ, मैने तिकट देखा है। क्‍या हुवा? आप ऐसा क्‍यो पूछ रहे हो?’’ 

’’ थॅंक गॉड, पंजाब मेल का हादसा न्यूज मे दिखा रहे है...’’ त्यांनी सांगितले ते भयानक होते. पंजाब मेलला आग लागली होती. ज्या डब्यांना आग लागली, त्याच डब्यात नाशिकहून जाणारे काही उद्योजक, वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे जाणारे लोक होते. आणि तो डबा जळून खाक झाला होता. बाप रे! ऐकून मी सुन्न झाले होते. डोक्‍यात ना ना विचार येऊ लागले, शेवटी मी मुलाला चक्कर मारायला बाहेर पडले. माहेरी बातम्या पाहून माझ्या आईचा रक्तदाब वाढला. तिने भावाला माझ्या घरी पाठवले, तर घराला कुलूप. तो मी येईपर्यंत थांबून राहिला. भेट झाल्यावर त्याला सगळे सांगितले. आधी आईला फोन करून, काळजी करू नकोस, असेही सांगितले. ती म्हणाली, ‘‘केवळ दैव बलवत्तर म्हणून...’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pallavi pathak article mukatpeeth

टॅग्स