शंभर रोपं, शतगुणित आनंद

पंकज कुलकर्णी
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

वेताळ टेकडीवर नियमित फिरायला जातो. तेथे एक रोप लावलं. मग मुलांबरोबर आणखी. शंभर झाडं लावून ती वाढवतो आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या शंभर झाडांकडे पाहताना आनंदही शतगुणित होतो.

वेताळ टेकडीवर नियमित फिरायला जातो. तेथे एक रोप लावलं. मग मुलांबरोबर आणखी. शंभर झाडं लावून ती वाढवतो आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या शंभर झाडांकडे पाहताना आनंदही शतगुणित होतो.

वेताळ टेकडीवर मी नियमितपणे फिरायला जातो. तेथे बरीच वर्षं झाडं जगवण्याचं काम करत आहे. फिरायला जाताना पाण्याचे कॅन बरोबर घ्यायचे आणि झाडांना पाणी घालायचं. गेली काही वर्षं अधिकच नियोजनबद्ध काम सुरू आहे. शंभरावर रोपं वाढत आहेत. मैत्रेयीची शाळा "गुरुकुल', तसेच कमिन्सतर्फे पर्यावरण मास इथेच साजरा केला. बाबांचा वाढदिवस शंभर रोपं लावून व ती जगवण्याचा निर्धार करून साजरा केला. ही जबाबदारी मोठी आहे, रोपं नुसती लावायची नाहीत, ती जगवायची, वाढवायची हा निर्धार आहे.

रोपांना जपावं लागतं ते चरणाऱ्या गुरांपासून. पाऊस संपल्यानंतरचे काही महिने पाण्यासाठी कसोटीचे. सुरवातीला सायकलनेच पाणी नेत होतो; पण रोपांची संख्या वाढली तसे गाडीतून पाणी नेऊ लागलो. उद्यान विभागानेही पाण्याच्या टाक्‍या भरून मदत केली. सुटीच्या दिवशी घरातील सगळेच टेकडीवर असतात. सुनील, मीनल यांचीही मदत झाली. रोपांना पाणी देणं छोट्यांच्याही आवडीचं.

बाबांचं व माझं वर्षभर काम सुरू असतं - आळी करणं, पाणी साठवण्यासाठी बांध, तळी, पाचोळ्याचं खत, पाण्याच्या टाक्‍या साफ करणं, प्लास्टिक- बाटल्या गोळा करणं, पुढे चक्कर मारून मोरांसाठी दाणे व पाण्याची सोय करणं, गुरांमुळे जखमी झालेल्या रोपांना पुन्हा छावणीत (घरी) घेऊन येणं.. असं सुरूच असतं. मध्ये एकदा चार-पाच दिवस हॉस्पिटलची गडबड निघाली. टेकडीवर जाणं जमलं नाही, तर चक्क उन्हाळ्यात पाऊस पडला आणि पर्जन्यराजाने काळजी घेतली.

एके दिवशी सकाळी पाणी देऊनही संध्याकाळी चक्कर मारावीशी वाटली; पण जमलं नाही. दुसऱ्या दिवशी दिसलं, वणव्यात बरीचशी रोपं होरपळली होती. जाणवलं, रोपांनी हाक मारली होती; पण आपल्याला ओ देता आली नाही. काळीजच करतळलं. काळजी घेताच सगळीच रोपं पुन्हा तरारली.

टेकडीवरील रोजची सकाळ- संध्याकाळ खूप प्रसन्न, वेगळा अनुभव देते. टेकडीवर नेहमीचीच पायवाट, लांबून जरा वेगळं वाटलं, म्हणून जवळ गेल्यावर शिंग हाललं अन्‌ लक्षात आलं, दोन म्हशी, संध्याकाळी बहुधा वाट चुकून रात्रभर तिथे थांबलेल्या असाव्यात. मी म्हणतो, मी जंगलात शूर आहे; पण त्यांच्याजवळ न जाता वाट बदलली, वाटेत - पोपटांचा थवा उडाला.

एकदा मैत्रेयीबरोबर टेकडीवर मोरांसाठी दाणे आणि पाणी घेऊन गेलो होतो, बरीच मोरपिसं मिळाली. एके ठिकाणी दगडावर ही पिसं पडली होती, लांबून ते दगडच मोरपंखी दिसत होते. नंतर मैत्रेयीच्या पाठीवरच फुललेला पिसारा दिसू लागला.
टेकडीवर एक आजोबा ध्यान करत असतात, मोर त्यांच्या भोवती फिरत असतो. पूर्वी मुनीवर जसं ध्यानाला बसायचे आणि पक्षी, हरणं त्यांच्या भोवती निर्भय फिरायची तसंच. काही वेळेस मोर माझ्या अगदी जवळही आला, दाणे टिपून, पाणी पिऊन परत झाडीत गेला. पायवाटेने जाताना जवळच्या झाडावर पिसारा सोडून बसलेला मोर असतो, सातभाईची पिलं दिसतात, घरट्यांसाठी काड्या, पानं जमवणारे पक्षी असतात, आकाशातील घार सशावर झडप घालते; पण ससा गवतात शिरलेला असतो. एकदा दुपारी म्हशी चरत होत्या व मोरही त्यांच्या मागे होता..

पहाटेची वेळ असेल तर, टेकडीवर टॉर्चची आवश्‍यकता नाही, अंधारातही वाट दिसते. सावकाश पायांचाही आवाज होऊ न देता चालायचं. नीरव शांतता अनुभवायला मिळेल. बाजूच्या झाडांवरही मोर असेल, कधी त्याच्या मिऑऊने थरकतो आपण.
गेली कित्येक वर्षं एक आजोबा सकाळी येतात. प्लास्टिक कचरा गोळा करतात आणि ठरल्या वेळेस परत जातात. आमडेकर आजी बाराही महिने येतात, बाजूच्या मोर लांडोरीनाही सवय आहे त्यांची. इथेच बाजूला मोरांसाठी पाणी, तांदूळ- मका ठेवायचा. आसपास असेल तर मोर लगेचच धावत येतीलही. ही चढाची वाट घेऊन पुढे जायचं. या झाडीत दिवसाही ऊन पोचत नाही, थोडं चालून रोपांजवळ पोचाल. माणूस सहसा या वाटेवर येत नाही. थोडी आडवाट असल्यानं येथे बरीच "वर्दळ' असते. भारद्वाजची जोडी समोरच असेल. कधी एखादा ससुल्या उड्या मारत जाईल, कधी मोराला वाट द्यावी लागेल, कधी गुरांची वहिवाट सांभाळावी लागेल, गुरांच्या पाठीवरून बगळ्याचा प्रवास सुरू असेल. चिमण्यांचा एखादा थवा मातीत खेळून आकाशात नाचत असेल. मला तर ही ध्यानासाठी मस्त जागा वाटते.

येथे मस्त रोपं वाढत आहेत. पाऊसही चांगला पडला होता. पण, सध्या उन्हाळा फारच वाढला आहे. त्यामुळे रोपांना पाणी द्यावंच लागतं. पाणी देताना, झाडं वेगळंच चैतन्य आपल्या ओंजळीत देतात. येथे वाढणारी शंभरावर रोपं बघून आनंद शतगुणित होतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaj kulkarni write article in muktapeeth