सियासमवेत सेल्फी

पूजा पराग सामंत
गुरुवार, 12 जुलै 2018

आमची सिया मकाऊत "सेलिब्रेटी' झाली. तिच्यासमवेत सेल्फी काढायची स्थानिकांची इच्छा असे. तर सिंगापूरला पहिल्या पावसात भिजलो.

आमची सिया मकाऊत "सेलिब्रेटी' झाली. तिच्यासमवेत सेल्फी काढायची स्थानिकांची इच्छा असे. तर सिंगापूरला पहिल्या पावसात भिजलो.

मकाऊमध्ये मजेशीर गोष्ट घडली. लिटील व्हिनिसमध्ये फिरताना स्थानिक स्त्रियांचा एक गट भेटला. त्या स्त्रिया आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. एका इसमाने आम्हाला त्या स्त्रियांचे म्हणणे सांगितले. त्या स्त्रीगटाला माझ्या मुलीबरोबर, सियाबरोबर, सेल्फी काढायचा होता. कारण त्यांच्या देशातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसारखी सिया दिसते, असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही काही विचार करेपर्यंत त्या उत्साही आणि आनंदी गटाने सियासमवेत एक-दोन सेल्फी काढले देखील. ...छायाचित्र काढत आहेत हे पाहून थोडी भीतीदेखील वाटली. शेवटी त्यांना नम्र नकार देऊन आम्ही तेथून काढता पाय घेतला. नंतरदेखील अनेकांनी भेटून तेच कारण सांगितले. पण आम्ही सर्वांना नकार देऊन पिटाळून लावले. "सिया, तू मकाऊमध्ये खूपच प्रसिद्ध झालीस,' असे आम्ही तिला गमतीने चिडवू लागलो.

सिझलिंग सिंगापूरची प्रगती पाहून आश्‍चर्यचकित व्हायला होते. दुसऱ्या देशाकडून पाणी उसने घेऊनसुद्धा सिंगापूरमधील हिरवाई, स्वच्छता पाहून भारावून जायला होते. या देशातील पर्यटकांना खुणावणाऱ्या गोष्टी आपण फक्त डोळ्यांनी अनुभवू शकतो, शब्दांत वर्णन करता येणार नाही असे नजारे आहेत. एकशे एक हेक्‍टरवरचे सुपर पार्क, गार्डन्स बाय दि बे आणि क्‍लाउड फॉरेस्टस हे विलोभनीय. माऊंट फायबर ते सेंटोसा आयलंडपर्यंतची केबलकारची रोमांचक सफर, मोनोरेल राइडची मजा ह्या सर्वांचा अनुभव केवळ अप्रतिम. "विंग्ज ऑफ टाइम' हा "नाईट शो' बघणे म्हणजे डोळ्यांसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल. खुल्या समुद्रात, पाणी व विविध रंगी प्रकाशझोतांत रंगणारी कथा म्हणजे जादूमय जगात विहरून येतो. युनिव्हर्सल स्टुडिओतील "ह्यूमन राइड'चा आगळाच अनुभव मी केवळ सियामुळे घेऊ शकले. "डर के आगे जीत है' हे तिचे म्हणणे मनोमन पटले.

सिंगापूर सहल अजून एका गोष्टीसाठी लक्षात राहील... या वर्षीच्या पहिल्या पावसात भिजण्याचा अनुभव आम्हाला सिंगापूरला घेता आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pooja samant write article in muktapeeth