सुशाणा

प्रभाकर चव्हाण
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

काही नाती अनामिक असतात. आयुष्यावर प्रेमाचे शिंपण करून जातात.

काही नाती अनामिक असतात. आयुष्यावर प्रेमाचे शिंपण करून जातात.

रात्रीच्या जागरणाने झोप डोळ्यांवर असतानाच कुणीतरी हाक दिली. ""अवो काका, पानी देताव काय कलशीभर.'' मी डोळे उघडले. समोर फाटकी विटकी चड्डी, मळकट चेहऱ्याचा सात-आठ वर्षांचा पोरगा हातात चेंबलेली कळशी घेऊन केविलवाणा उभा. नाक काहीसे शेंबडाने बरबटलेले. मी खेकसलो, ""घाणेरडा कुठला. जरा नीट स्वच्छ होऊन ये.'' पोराने पळच काढला. थोड्याच वेळात थोडे बऱ्यापैकी स्वच्छ अंगातले घालून काहीसा चेहरा साफ करून पुन्हा तो समोर. माझ्या चेहऱ्यावर स्मित उमलले. ""पानी देताव ना? बघा मी साफसूफ हून आलो.'' ज्यांच्या घरी प्यायलाही पाणी नसावे त्याने स्वच्छ, टापटीप होऊन येणे कसे शक्‍य आहे? ""घे भरून ती कळशी, नळावर घाण करू नको. स्वच्छ ठेव.'' तो कळशी भरून गेला. तो कर्नाटक सीमावर्ती भागातला. आई-वडील मोलमजुरी करीत. थोरला बारा-तेरा वर्षांचा मुलगा खाटकाच्या दुकानात. हा सुशाणा धाकट्या बहिणींना सांभाळायचा. त्यांनी वर्षभरात स्वतःची झोपडी बांधली. सुशाणा आता कालवण भाकर घेऊन रोज येऊ लागला. भावंडांचा सांभाळ करता करता मदतीची कामे करू लागला. कधी अंगण झाड, कधी सारवण कर. माझ्या मुलांचे जुने कपडे त्याला दिले. तो चांगला राहू लागला. मी मुलांचा योगाभ्यास घेत होतो. पोरे धडे गिरवू लागली. सुशाणा आता चांगले लिहू, वाचू लागला. "सर, तुम्हाला तीनच, पण मला तर मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिशपण येतेय ना?' असे तो विचारायचा. त्याचा डोळा दुखू लागला, तेव्हा त्याचे डोळे तपासून घेतले. चष्मा घेऊन दिला. मी सेवानिवृत्त झालो. मला सायटिकाचा त्रास झाला. आसनांबरोबर मसाजसेवेत सुशाणाचा सिंहाचा वाटा होता. सुशाणा आता पंधरा वर्षांचा झाला होता. गुंठाभर जागा घेऊन त्यांनी घर बांधले. एके सकाळी सायकलवरून भावंडांसाठी खाऊ घेऊन जात असताना डबराच्या गाडीखाली तो चिरडला गेला. सायकलसह मेंदूच्या चिंधड्या झाल्या. आला आणि जीव लावून गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prabhakar chavan write article in muktapeeth