फुटपाथवरचा मॉल

muktapeeth
muktapeeth

कुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. जे वस्त्रहीन आहेत, त्यांच्यासाठी वस्त्रदान करायला हवे.

शहर म्हटले की उंच उंच संकुले असतात आणि त्याच्या कुंपणाबाहेर झोपडपट्टीही लांबलचक पसरलेली दिसते. दोघेही एकमेकांवर अवलंबून असले तरी, प्रत्येक गोष्टीचे पैशांत रूपांतर केले, की दोघेही हे अवलंबणे विसरतात. पण, नुकतेच एका रविवारी वेगळे काहीतरी घडले. या दोन स्तरांमध्ये एक साकव तयार झाला. चारचाकीतून भरभरून सामान आले. त्यात लहान, किशोर वयातील मुलामुलींचे सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे होते.

जीन्स, पॅंन्टस्‌, बर्मुडा, सलवार कमीज, घागरा चोळी असे आकर्षक डिझाईनचे, रंगांचे कपडे होते. साधारण कोणत्याही मॉलमध्ये असेल अशी विविधता! पण त्यातले नव्वद टक्के कपडे वापरलेले होते. बांधकाम सुरू असलेल्या एका गृह संकुलाजवळ आम्ही पोचलो. आदल्या दिवशी तेथे जाऊन आम्ही कपडे वाटपासाठी येणार आहोत हे कळवले होतेच. पादचारी मार्गावर आम्ही आमचा "मॉल' थाटला. पाचेक मिनिटांतच गर्दी झाली. नवरा-बायको, त्यांच्या हाताला धरून किंवा कडेवरची मुले. आम्ही तोपर्यंत कपड्यांची वर्गवारी करून ठेवली होती. रांगेत या, आपल्याला बसणारेच कपडे फक्‍त घ्या, एकच संच घ्या, असे आम्ही वारंवार सांगत होतो; पण त्याकडे लक्ष कोणाचे होते? दिवाळी जवळ आलेली असताना नव्यासारखे, झुळझुळीत कपडे समोर आलेले, दिवाळीचा एक मोठा खर्च वाचणार होता. आत्ताच जे काही घेऊ शकतो ते घेऊन टाकूया. आम्ही ओरडत होतो, सांगत होतो. सबुरी धरा, आम्ही परत येऊ. पण परिणाम शून्य.

आम्ही निमूट पाहात राहिलो होतो आता. अति श्रीमंतांनादेखील अजून अजूनची हाव सुटू शकत नाही, तेथे या मजुरांना कसे रागावणार? आपण दिवाळीच्या खरेदीला गेलो तर कधी प्रत्येकी एकच कपडा घेऊन कधी येतो का? एका घरातून लहान मुलांची खेळणी आली होती. आगगाडी, मोटार, बाहुल्या. ती खेळणी पाच मिनिटात उचलली गेली. नंतर माझ्या आसपास दहा-पंधरा मिनिटे एक छुटकुली रडत फेऱ्या घालत होती. बाबांचे बोट धरून. मी हिला काय पाहिजे असे विचारले. त्याने तिला खेळणे हवे आहे. आणि तिला ते कोणी देत नाही म्हणून ती रडत आहे असे सांगितले. आता खेळणे तर नव्हतेच. मी त्या माणसाला खिशातून एक नोट काढून दिली आणि आजच्या दिवसात तिला खेळणे आणून दे असे सांगितले. माझ्या डोळ्यासमोर त्या वेळेस माझा दुबईत असलेला खेळण्यांच्या राशीतला एकुलता एक नातू तरळला.
 
सुमारे तास-दीड तास हे काम चालू होते. आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक. खाली वाकत होते, उभे रहात होतो. लहानग्यांसमोर ओणवे होत होतो, गुडघ्यावर बसत होतो, पण थकत नव्हतो. कारण वेळच नव्हता. शेवटी कपडे संपले. आम्ही एक दीर्घ श्‍वास सोडत पाण्याच्या बाटल्या उघडल्या. तात्पुरता बांधलेला साकव उचलला. या "आम्ही'मध्ये मी, डॉक्‍टर लोवलेकर, स्नेहल पवार होतो. आणि कपडे गोळा करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता डॉक्‍टर शिवणकर यांनी. जास्तीत जास्त कपडे "बावधन हास्य योग संघा'च्या सभासदांनी दिलेले होते. महत्त्वाचे योगदान बावधनचे गोरख दगडे यांचे होते. त्यांनी कपडे तर आणलेच होते; पण सोबत मदतनीसही आणले होते. त्यामुळे आमच्यावरचा ताण कमी झाला होता. आता ही बातमी दूरवर पोचली आहे. कोणाला तोपर्यंत मनात असूनही कपडे देता आले नाहीत, तर कोणाला आता कळले. त्यामुळे परत एकदा काम करायला आम्ही सज्ज आहोत. वस्त्रदानाची ही कल्पना माझ्या मनात साधारण दहाएक वर्षांपूर्वी आली. तेव्हापासून हा "दिवाळी मॉल' चालू आहे. कुणाकडे तरी भरपूर कपडे आहेत आणि त्यापासून वंचितही असंख्य कुणीतरी आहेत. मी बांधकाम मजुरांवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण बावधन परिसरात अजूनही बांधकामे सुरू आहेत. इतर कोणी दुसऱ्या कोणा वंचित गटासाठी हे करू शकतात. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एखादा दिवस "वस्त्रदान दिवस' म्हणून जाहीर केला तर तो हळूहळू आपल्या राज्यात रुजेल. नंतर त्याचे अनुकरण इतर राज्यांत होईल आणि मग एके दिवशी त्याची दखल जग घेईल. ही बांधकाम मजुरांची मुले उद्याचे नागरिक आहेत. ती शाळेत न जाताच मोठी होणार आहेत. आताच निरक्षरांची संख्या पंचवीस टक्‍क्‍याच्या आसपास आहे. त्यात भरच पडत जाणार का? आपण त्यांना साक्षरही करू शकत नाही का? आणि शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर काही चांगले संस्कार होण्याची संधी त्यांना नाकारायची का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com