बॉसची सावली

प्रकाश तांबे
बुधवार, 10 मे 2017

सेक्रेटरी म्हणजेच कचेरीतील अत्युच्च पदावरील अधिकाऱ्याचा निजी सचिव किंवा सहायक, जो सावलीसारखा अधिकाऱ्याच्या कायम बरोबर असतो. त्याच्या असण्यामुळे अधिकारी स्वतःच्या मुख्य व जास्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो.

सेक्रेटरी म्हणजेच कचेरीतील अत्युच्च पदावरील अधिकाऱ्याचा निजी सचिव किंवा सहायक, जो सावलीसारखा अधिकाऱ्याच्या कायम बरोबर असतो. त्याच्या असण्यामुळे अधिकारी स्वतःच्या मुख्य व जास्त महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो.

अठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखन कला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता. मीही त्यापैकीच एक. हा पर्याय निवडून कुटुंबाला आर्थिक साहाय्य करत वाणिज्य वा कला शाखेचा बहिस्थ विद्यार्थी म्हणून अभ्यास करत शैक्षणिक प्रगतीही कित्येक लघुलेखकांनी साध्य केली. एवढेच नव्हे, तर सरकारी व खासगी क्षेत्रात लघुलेखक अशी सुरवात करून उच्चपदापर्यंत गेलेल्या व्यक्तींची उदाहरणेही खूप दिली जातात.

लघुलेखक हुद्द्यावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामाची व्याप्ती ही केवळ लघुलेखनापुरती मर्यादित राहात नसून, यथावकाश कार्यालयीन कामात अधिकारी व कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांमधील तो महत्त्वाचा दुवा बनतो. कामाच्या स्वरूपामुळे त्याच्या वरिष्ठांचा तो सर्वांत जवळचा व विश्वासू माणूस ठरतो आणि वरिष्ठांशी असलेल्या याच जवळिकीमुळे इतर सहकाऱ्यांची अवघड पण रास्त कामेही तो लीलया करू जाणतो. सेक्रेटरी म्हणजेच कचेरीतील अत्युच्च पदावरील अधिकाऱ्याचा निजी सचिव किंवा सहायक, जो सावलीसारखा अधिकाऱ्याच्या कायम बरोबर असतो. त्याच्या असण्यामुळे अधिकारी स्वतःच्या मुख्य व जास्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो.

वरिष्ठांच्या कायम संपर्कात राहून त्यांची कार्यालयीन शिस्त, कार्यपद्धती वगैरे आत्मसात करण्याची संधी त्याला वारंवार मिळत जाते व त्याच्या गुणवत्तेनुसार वरिष्ठ लघुलेखक, खासगी चिटणीस, सचिव वा गोपनीय सचिव अशी त्याची पदोन्नती होऊ शकते व यथावकाश, संधी मिळताच त्याला एखाद्या स्वतंत्र विभागाचा कार्यभार सांभाळायची संधी मिळू शकते. सामान्य लघुलेखकापासून साहेबांचा मुख्य सचिव या प्रवासात रुजत गेलेली शिस्त, कार्यालयीन कामातील गोपनीयता हाताळण्याविषयी मिळालेली शिकवण, परस्परांतील नातेसंबंध विकसित करणे व जपण्याचे कौशल्य, सर्व कार्यालयीन सभांची चोख आखणी करण्याचा अनुभव, वरिष्ठांचे विचार त्यांच्या कनिष्ठांपर्यंत लिखित वा मौखिक स्वरूपात पोचवणे आणि मुख्य म्हणजे या सर्व कामांच्या दरम्यान शिकत शिकत इंग्रजी भाषेचे मिळत असलेले प्रगल्भ ज्ञान, समृद्ध होत असलेली इंग्रजीतील शब्दसंपदा, संभाषण व पत्रव्यवहाराचा अनुभव वगैरेची अमर्याद शिदोरी दीर्घ कार्यालयीन कारकिर्दीत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना कामी येते.

राष्ट्रीय पातळीवरील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांचे व पुढाऱ्यांचे सचिव होण्यासाठी लघुलेखन या माध्यमाची आवश्‍यकता नाही. तर, हे सचिव उच्चशिक्षित असून नेत्यांना तोडीसतोड मुत्सद्देगिरी असलेले सचिव असावे लागतात. या नेमणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक ठरते. अशा प्रसिद्ध सेक्रेटरींच्या उदाहरणात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जॉन एफ केनेडी आदींच्या सेक्रेटरींचा उल्लेख करावाच लागेल; ते होते अनुक्रमे महादेवभाई देसाई, एम. ओ. मथाई आणि एव्हेलीन लिंकन; परंतु अशा उच्च पदावरचा सेक्रेटरी होण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही.

मात्र, खासगी व इतर सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयांत साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे लघुलेखक, पीए किंवा सेक्रेटरी आपल्या कार्यालयाशी निगडित मोलाची जबाबदारी पार पाडत असतात. पुण्यातील शेकडो विद्यार्थ्यांना इंग्रजी लघुलेखन शिकवणाऱ्या माझ्या वडिलांकडून (जनार्दन गणेश तांबे) लघुलेखन शिकण्याचे भाग्य मलाही लाभले. कार्यालयीन कारकिर्दीच्या सुरवातीचा काही काळ मीही लघुलेखक ते सचिवपदावर होतो. ही पदे सांभाळताना होणारी ओढाताण, करावी लागणारी कसरत व त्या सर्व अनुभवांतून घडणारी वैयक्तिक प्रगती मी व माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवली असेल. कार्यालय सांभाळण्याचा, संतुलन साधण्याचा, योग्य माणसांना न्याय मिळवून देण्याचा, कामचुकारांना धडा शिकवण्याचा अनुभव सचिवांच्या गाठीशी असतो. बॉस बदली होऊन गेला तरी कार्यालयीन कामकाजातील सातत्य सचिवामुळेच राहते.

संगणकामुळे लघुलेखकांचे महत्त्व थोडे कमी झाले असले, तरी सेक्रेटरींचे महत्त्व किंवा गरज कमी झालेली नाही. लघुलेखकाची कामे उच्चपदस्थ अधिकारी संगणकाच्या साहाय्याने स्वतःच करताना दिसतात. त्याचा त्यांना उपयोगही होत असेल. तरीही त्यांच्या मुख्य कामाचा वेळ ही कामे करण्यात जातो आहे. हे टाळण्यासाठी लघुलेखन कलेचा लोप होऊ देऊ नये. लघुलेखन कलेला प्रोत्साहन देण्याच्या व त्याची उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टीने एमएमसीआयटीसारखा कार्यक्रम त्याला जोडता येईल. त्यामुळे उत्तमोत्तम सचिव नक्कीच घडतील, असे मला वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash tambe write article in muktapeeth