धुक्‍यातील वाट

प्रमिला गरुड
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

समोर धुके दिसल्यावर मन बालपणात सहजतेने गेले. त्या आठवणींनी मनात नवी उमेद निर्माण झाली.

समोर धुके दिसल्यावर मन बालपणात सहजतेने गेले. त्या आठवणींनी मनात नवी उमेद निर्माण झाली.

नेहमीपेक्षा आज अगदी सकाळी सकाळी जाग आली. 5 वाजले होते. थंडीचे दिवस होते. खिडकीतून बाहेर पाहिले, जरा जास्तच अंधार वाटला. पुन्हा बिछान्यात पडले, पण आता उठावेच असे म्हणून उठले. चहा करायला स्वयंपाकघरात गेले. बाहेरचे दार उघडले, तर काय आश्‍चर्य? धुकेच धुके, खूप आनंद झाला अन्‌ बालपण आठवले! हा काळ होता 1945, 1949 चा. पूर्वी नोव्हेंबर, डिसेंबर महिना म्हणजे धुक्‍याचे अन्‌ तुफान थंडीचे दिवस. अशात दिवाळी, नाताळ म्हणजे मजाच मजा. शाळेत स्नेहसंमेलन असायचे. खेळांच्या स्पर्धा, पुन्हा इंटरस्कूल स्पर्धा. हे दोन महिने म्हणजे धमालच. सकाळी लवकर उठावेच लागे. भावाचे शर्ट-पॅंट, लांब लांब वेण्या त्या शर्टाच्या आत, पायात कॅनव्हासचे बूट असा असे आमचे अवतार असत. धावत-पळत शाळेतील ग्राउंडवर जात असू. कुडकुडत, थडथड उडत एक-एक मुलगी येऊ लागे. मग सारे ग्राउंड भरून जात असे. ओठ फुटलेले, हातपाय फुटलेले; पण आनंदाने चेहरे फुललेले असत. जिंकलो तर बक्षिसे मिळणार असतात नं? एकमेकींना मिठ्या मारीत असू, थंडी थंडी हो हो हो!! दवांचे तुषार पडत असत अन्‌ ते डोळ्यांच्या पापण्यांवर भिवईवर साचत असे. हातावर हात चोळून ते गरम करीत असू अन्‌ मग खेळायच्या स्पर्धा सुरू होत असत. धावणे, उंच उडी, लांब उडी, स्लो सायकलिंग, पोत्याची शर्यत, खो-खो, हुतूतू, लंगडी, सारी शाळा जमत असे बघायला. चिअरअप करायला, खेळायला मग अगदी हुरूप येत असे.

चहा घेऊन, मफलर बांधून मी फिरायला बाहेर पडले. मन मात्र बालपणातील आठवणींतच रमले होते. फिरून झाल्यावर बाकावर बसले. समोर गच्च धुके होते, फिरणारी माणसे उगीचच छोटी छोटी दिसत होती. समोरची रांगेत उभी असलेली झाडे अंधूक, धूसर दिसत होती. एखाद्या ऋषिमुनी सारखी, ध्यानाला बसलेली. कितीतरी वर्षांनी असे धुके पडले होते. पूर्वी पुण्यात झाडी असायची. त्यामुळे थंडी खूप वाजायची. दवबिंदूनी अंग ओलं व्हायचं अन्‌ समोरची वाट धुक्‍यात हरवून जायची. आता पाऊलवाटा नाहीत तशी झाडेपण नाहीत. गल्लीबोळ, छोटी छोटी टुमदार घरे पण नाहीत. मोठमोठ्या सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्यात, अंगावर येतात.
डांबरी रस्ते चकचकीत दिसतात. मातीचा सुगंध ते देत नाहीत. सकाळी-सकाळी रस्त्यांवरून स्कूटर, मोटारी धावू लागतात. पेपर, रतिबाचे दूधवाले यांची वर्दळ दिसायला लागली.

पूर्वी पेन्शनरांचे असलेले पुणे अद्ययावत फॅशनचे घर झाले आहे. साठाव्या वर्षी रिटायर होणारे लगेच म्हातारे दिसू लागतात. काठ्या, मफलर बांधून फिरू लागत. आपले सारे संपले आता रामनाम जपायचे हेच ध्येय. पण आता तसे नाही. साठावे वर्ष म्हणजे आनंदाने भरलेले, नोकरीतून सुटका. आता मनासारखा प्रवास, वाचन, जॉगिंग, जिम ही संकल्पना सुरू आहे. अनेक प्रवासी कंपन्या सुखकारक सेवा देत आहेत. पतीपत्नींचे नवीन आयुष्य सुरू होत आहे. जीवनाची ही पाऊलवाट अनेक वळणे घेऊन स्थिर झाली आहे, पण जुन्याकाळची आमची पाऊलवाट मात्र धुक्‍यात हरवून गेली आहे. लहानपण केव्हाच उडून गेलं आहे, तरीही ते कधी कधी असं काही झालं, की धावत येतं. आपल्याकडे बघतं अन्‌ खुदकन हसतं!

याच त्या रम्य आठवणी खूप सुखावणाऱ्या, आनंद देणाऱ्या! अन्‌ मग मनात येतंच, "ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गांवा... आपण आहोत तोपर्यंत ही पाऊलवाट राहणारच आहे, फक्त आपल्या मनांत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pramila garud write article in muktapeeth