esakal | सौदीतले दिवस!
sakal

बोलून बातमी शोधा

Sauditil-Divas

देशाबाहेर पडल्यावर देशाची प्रांताची बंधने राहात नाही. आपला देश किती विसंगतीने भरलेला देश आहे, हे देशाबाहेर आल्यावर कळतं.

सौदीतले दिवस!

sakal_logo
By
प्रशांत कुलकर्णी, अबुधाबी

मराठी साहित्य जगतात अभिमान वाटावी अशी घटना काल बुधवार दिनांक 9/10/2019 रोजी आखाती वाळवंटात घडली. कोकणीतील नामवंत लेखिका रुपाली कीर्तनी यांनी लिहिलेल्या "सौदीतले दिवस" या मराठी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संयुक्त अरब अमिराती ची राजधानी अबुधाबी येथे पार पडला. एखाद्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन अबुधाबीसारख्या ठिकाणी प्रथमच होत होते. या प्रकाशन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात शीतल अंबुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून हा कार्यक्रम अबुधाबीत करण्यामागची कल्पना समजावून सांगितली. लेखिका रुपाली कीर्तनी यांनी मूळ कोकणी भाषेत "सौदीतील ते दिस" या पुस्तकाचा मराठी अनुवाद अदिती बर्वे यांना करण्या मागची प्रेरणा कशी मिळाली, त्यांची त्या मागची भूमिका ही विशद करून सांगितली.

यानंतर अबुधाबीतील साहित्य प्रेमी रसिक प्रशांत कुलकर्णी यांनी या पुस्तका बद्दल चे आपले विचार प्रकट करून पुस्तकातील काही भागाचे वाचन केले.आखाती देशात मराठी साहित्यात नव्याने घडत असलेल्या सांस्कृतिक घडामोडींबद्दल समाधान व्यक्त केले.

लेखिका रुपाली कीर्तनी यांनी आपले मनोगत हृद्य शब्दात व्यक्त केले. सौदीतील अनुभवावर आत्मकथनपर पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा, उद्देश त्यांनी सांगितला. मूलतः कवयित्री असलेल्या रुपाली यांचे कोकणी भाषेतील "मळब थाव" सारखे कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. "सौदीतले दिवस" हे मराठीतील त्यांचे  पहिलेच पुस्तक पद्मगंधा या प्रकाशन संस्थेच्या अरुण जाखडे यांनी प्रकाशित केले आहे.

प्रमुख अतिथी अरुणा ताई ढेरे यांनी केलेल्या भाषणात रुपाली कीर्तनी यांचे परदेशी भूमीवरील अनुभव शब्दबद्ध केल्याबद्दल अभिनंदन केले. झरा आता मोकळा झाला आहे तेव्हा तिच्याकडून आणखीन ही नव साहित्याच्या निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. पुस्तकातील अनेक उदाहरणे देत त्यांनी या पुस्तकावर भाष्य केले.

त्या म्हणाल्या की, "देशाबाहेर पडल्यावर देशाची प्रांताची बंधने राहात नाही. आपला देश किती विसंगतीने भरलेला देश आहे, हे देशाबाहेर आल्यावर कळतं. तिथे भाषेच्या,प्रांताच्या सीमा असतात त्यापेक्षा आपला सांस्कृतिक भूगोल वेगळा आहे हे देखील भारताबाहेर आल्यावर कळतं."

अरुणा ताईंनी रुपालीचे पुस्तकातील अनुभव वाचताना शांता शेळके यांची कविता,कलर पर्पल नावाच्या सिनेमाची उदाहरणे देत पुस्तकातील  काही प्रसंग उदधृत केले.

"आनंदाचा अर्थ कळणं ही खरोखरच आयुष्यात मोठी गोष्ट आहे. कुठलाही आनंद हा पैशांनी विकत मिळत नाही.कुठल्याही बाहेरच्या लौकिक गोष्टींनी येत नाही.तो आपल्याच हातात असतो.आपणच तो निर्माण करायचा असतो." या अरुणाताई यांच्या शब्दांनी उपस्थित भारावून गेले नसते तरच नवल.

अरुणा ताई ढेरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर हा सोहळा संपन्न झाला.मराठी साहित्यावर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे अबुधाबीतील अनेक रसिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.सौ.शीतल अंबुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आपल्या खुमासदार शैलीत पार पाडले.

मराठी साहित्याच्या इतिहासात आखाती वाळवंटात प्रथमच रंगलेला हा साहित्य प्रकाशन सोहळा अपेक्षेप्रमाणे खूपच रंगला.या सोहळ्याच्या आठवणी मनात साठवीतच साहित्य रसिक घरी परतले.

loading image
go to top