स्वावलंबनाचे प्रयोग

प्रा. मुक्ता गरसोळे-कुलकर्णी
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

मुलांना आई-वडिलांनी स्वावलंबनाचे धडे द्यायला हवेत. मुले या समाजात स्वतंत्रपणे वावरायला हवी असतील, तर त्यांना कोणत्याही कुबड्या लहानपणापासून देता कामा नयेत.

मुलांना आई-वडिलांनी स्वावलंबनाचे धडे द्यायला हवेत. मुले या समाजात स्वतंत्रपणे वावरायला हवी असतील, तर त्यांना कोणत्याही कुबड्या लहानपणापासून देता कामा नयेत.

एका पुस्तकात वाचले, की जिराफ आपल्या पिलाला जन्म देते, त्या वेळी ते नवजात बालक एक तर खूप उंचीवरून खाली पडते; पण तरीही जिराफ आई त्या नवजात पिलाला लाथ मारून आपल्या पायावर उभे रहायला भाग पाडते. त्याने जर तसा प्रयत्न केला नाही, तर परत त्याला एक लाथेचा तडाखा मारून उभे करते. शेवटी ते पिलू जन्मल्यापासून काही क्षणांतच धडपडत का होईना स्वतःच्या पायावर उभे राहते. जिराफच काय; पण इतरही सर्व प्राण्यांची नवजात पिले अशीच थोड्या अवधीत स्वतःच्या पायावर उभी राहतात. अपवाद फक्त मानवप्राण्याचा! जन्म दिल्यानंतर अनेक वर्षे पालक मुलांच्या अतिकाळजीपोटी त्यांना स्वतंत्र आणि स्वावलंबी बनायला उद्युक्तच करत नाहीत. पालकांची काळजी, अपेक्षा, लाडाच्या कुबड्या घेऊनच ही मुले स्वतःचे आयुष्य जगत असतात आणि जेव्हा जीवनात एखादा कसोटीचा क्षण येतो, तेव्हा लहानपणापासून स्वावलंबनाचे आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचे कोणतेच प्रशिक्षण नसल्याने ही मुले भांबावतात.

हे स्वावलंबन दोन प्रकारचे असते. एक शारीरिक स्वावलंबन, म्हणजे आपल्या सर्व शारीरिक क्रिया स्वतंत्रपणे करता यायला हव्याच; पण आपल्या वस्तूंची देखभाल, आपल्या खोलीची आवराआवर, दप्तर, कपडे जागच्या जागी ठेवणे. आपल्या सर्व गोष्टी आणि कृती कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या स्वतः करता येणे. त्याहूनही महत्त्वाचे आहे मानसिक स्वावलंबन! यामध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मुलांना स्वतंत्र विचार करण्यास योग्य बनवणे, त्यांची स्वतंत्र निर्णयक्षमता विकसित करणे, आपले निर्णय, आपली स्वप्ने त्यांच्यावर न थोपवता त्यांना त्यांचे निर्णय (ज्यामध्ये अभ्यासाचे नियोजन, करिअरची दिशा यासारखे मुद्दे येतात) घेण्यासाठी सक्षम बनवणे इत्यादी. माझ्या मते सध्याच्या काळात अशा स्वावलंबनाची जास्त गरज आहे.

या सर्वांचा विचार करता मी फार भाग्यवान आहे, असे मला सातत्याने जाणवते. माझे बाबा शिक्षणतज्ज्ञ आणि पाठ्यपुस्तकांचे संपादक, आई शिक्षिका. त्या काळात "सुजाण पालकत्व' वगैरे क्‍लासेस, कोर्सेस नव्हते; पण आमच्याही कळत-नकळत त्यांनी अनेक गोष्टींतून आम्हाला स्वतंत्रपणे विचार, आचार करायला सक्षम बनवले.
मी शाळेत असताना मला कुठेही एकटे पाठवायचे असेल, तर माझे बाबा मला माझ्या घरापासून त्या ठिकाणापर्यंतचा एक कच्चा नकाशा कागदावर काढून देत. तोंडी पत्ता समजावून सांगण्यापेक्षा या त्यांच्या प्रयोगामुळे नकाशा वाचनाची सवय लागली. आपोआप दिशांचे, अंतराचे भान यायला लागले. कुठे काही अडले, तर सरळ रस्त्यावरच्या पोलिसाला, दुकानदाराला विचारायचे, अशी सूचना असल्याने लोकांशी स्वतःहून जाऊन बोलणे भाग पडले. समाजात वावरताना आज कामी येणाऱ्या संवाद कौशल्याचे ते बाळकडू होते म्हणा ना!

कोणतेही सामान, वस्तू आणताना आई मला पैसे देत असे. त्या आणल्यानंतर त्या सर्वांचा बारीकसारीक तपशीलासह हिशेब देणे सक्तीचे होते. एकदा दोन रुपयांची गडबड झाली. ते नाणे माझ्याकडून हरवले. आईने विचारल्यावर, ते मी मैत्रिणीला दिल्याचे खोटे सांगितले; पण जेव्हा खरा प्रकार आईच्या लक्षात आला तेव्हा आईचा ओरडा खाल्ला. ओरडा खाल्ला तो पैसे हरवल्याबद्दल तर होताच; पण आईशी खोटे बोलल्याबद्दल जास्त होता.

एका सुटीत बाबांनी पुण्यातील काही मान्यवरांचे पत्ते मला दिले आणि एका डायरीत त्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून आणण्याचा उपक्रम दिला. रोज मी सायकलवरून त्या त्या नामवंतांच्या घरी जात असे. सहावी-सातवीमधली मी शाळकरी मुलगी. कोणी कौतुकाने स्वागत करत, तर कुणी हाकलूनही देत. कुणी तू हे का करत आहेस? असे उत्सुकतेने विचारत. कुणाच्या बंगल्यातल्या कुत्र्याला घाबरून मीच पळून येत असे. महिनाभरात माझ्याकडे पंधरा-वीस नामवंतांच्या स्वाक्षऱ्या जमल्या; पण या प्रकल्पाने मला खूप अनुभवसमृद्ध केले. माणसांचे निरनिराळे स्वभाव बघता आले, अनोळखी व्यक्तीला स्वतःची ओळख, कामाचे स्वरूप कसे सांगायचे, हे संवाद कौशल्य कळायला मदत झाली आणि इतरही बरेच काही.

माझ्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरही मी स्वतंत्रपणे माझे निर्णय घेऊ शकले, ते या मानसिक स्वावलंबनामुळे. पालकांचा सल्ला, मार्गदर्शन घ्यायचे; पण आपला निर्णय आपण घ्यायचा. मग त्याची नैतिक जबाबदारी, बरे-वाईट परिणाम भोगण्यासाठीही तयार राहण्याचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले. म्हणूनच भरपूर गुण असून, अभियांत्रिकीला सहज प्रवेश मिळत असूनही मी भाषा विषयाच्या आवडीपोटी जाणीवपूर्वक कला शाखा निवडली व त्यातच उच्चशिक्षण घेतले. या प्रत्येक वेळी, तू योग्य तेच वागशील, अशा विश्‍वास आहे, हे बाबांचे शब्द मला स्वातंत्र्य देऊन गेलेच; पण माझ्यावरच्या त्यांच्या विश्‍वासाची आणि त्यामुळे माझ्यावरील जबाबदारीचीही जाणीव करून गेले.

आता हेच स्वावलंबनाचे प्रयोग माझ्या पाल्यांवरही मला कसे करता येतील, या विचारात मी सध्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof mukta garsole write article in muktapeeth