#MeToo नावाची त्सुनामी थांबेल काय ?

muktapeeth
muktapeeth

एका अभिनेत्रीने एका अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप काय केला आणि अचानक #MeToo रूपी त्सुनामीच्या लाटा आपल्याच नव्हे तर इतर देशात सुद्धा मोठ्या वेगाने पसरल्या. अन्याय झालेल्या महिला काही महिने आणि वर्षांनी एकापाठोपाठ जाग्या झाल्या आणि पुरुषांवरील आरोपांचे जणू पेवच फुटले.

एखाद्या स्त्रीच्या मनाविरुद्ध केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी या त्या स्त्रीच्या विनयभंगापासून ते अगदी बलात्कारापर्यंत गुन्हा म्हणून ग्राह्य धरण्यात येतात. तिच्या मनाविरुद्ध केलेली कृती व उच्चारलेले शब्द, खाणाखूणा या गोष्टीसुद्धा लैंगिक अत्याचारात मोडतात. कार्यालयीन स्थळी लैंगिक छळ झाल्यास कायद्यात अशी तक्रार नोंदविण्याची सुविधा नव्वद दिवसांत आणि फौजदारी कायद्यात तीन वर्षात आहे हे किती माता-भगिनींना माहिती आहे. जेव्हा असे प्रकरण उद्भवते तेव्हाच त्या विषयाच्या कायद्याची आपल्याला गरज भासते. कालावधी उलटून गेला असतानाही अनेक जुनी प्रकरणे आता बाहेर यायला लागलीत आणि संबंधित पुरुषांच्या जीवनापुढे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नव्हे त्यांचे आयुष्यच जणू कोलमडले आहे. त्यांच्या जीवनात, कुटुंबावर त्सुनामीची आपत्तीच ओढवलेली आहे.

पुरुषांकडून स्त्रियांच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक छळाचे प्रकार घडले गेले. वास्तविक जे घडले ते व्हायला नकोच होते. ते पूर्णतः चुकीचे. अनैतिक आणि संस्कृतीला काळीमा लावणारेच होते. याची संबधितांना शिक्षा मिळाली पाहिजे, याबाबत अजिबात दुमत नाही. पण दहा-बारा वर्षांनी हे प्रकरण उभे करुन त्याबाबत आरोप केले जातात ही गोष्ट थोडी खटकते. त्याचवेळी हे आरोप किंवा तक्रार का केली नाही? याबाबत सारासार विचार व्हायला हवा, असा एकंदरीत सर्व स्तरातून सूर आहे. या आरोपांमुळे पुरुषांच्या संसारात, जीवनात जो वणवा पेटला आहे त्याचे काय?

तरुणपणात काहीजण अनीतिने वागतात. शरीरसंबंध दोघांच्या संमतीने होतात. जो पर्यंत दोघांचे पटते तो पर्यंत अनेक महिने-वर्षे हा स्वैराचार चालू असतो. मग भविष्यात दोघांच्यात मतभेद झाले की कोणा एकाकडून या गोष्टीवर ब्लॅकमेलिंग केले जाते. ब्लॅकमेलिंगमध्ये पैशांची किंवा शरीरसुखाची मागणी केली जाते तर 'मी टू' मध्ये संबंधित व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आघात होतो आहे, ती धुळीला मिळत आहे.

याबाबतीत एक अभिनेत्री म्हणते, "फिल्म इंडस्ट्रीमध्ये बलात्कार वगैरे काही होत नाही. जे होते ते दोघांच्या संमतीने होते." किती खोल अर्थ यात दडलेला आहे. येथे करियर करायला मिळावे म्हणून अनेक हौशी, स्मार्ट मुली या क्षेत्रात येतात. सुरूवातीला बोल्ड दृश्ये देतात. नंतर प्रसिद्धी मिळाली की निर्मात्याचे ऐकत नाहीत. हीच स्थिती नोकरी मिळविण्यासाठी होते. पूर्वीचे सागर, जाँबाज, कुर्बाणी, सत्यम् शिवम् सुंदरम्, राम तेरी गंगा मैली, रंगीला इ. सिनेमात स्त्रीचे देहप्रदर्शन झालेले दिसते. त्यानंतर चुंबनदृश्य सुद्धा बिनधास्तपणे चित्रित व्हायला लागली. त्यावेळी जर 'मी टू' चे वादळ उठले असते तर या अभिनेत्रींना सिनेमात काम, पैसा व प्रसिद्धी मिळाली असती का ? निर्माता, अभिनेत्रींनी 'कथानकाची ही आवश्यकता आहे' असे म्हणून ती दृश्ये स्वीकृत केली आणि पब्लिकने हे सिनेमे डोक्यावर घेतले. म्हणजे दोघांच्या संमतीने झाले तर 'धमाल फूल टू' नाहीतर 'मी टू'.

भूतकाळात झालेल्या चुका अगदी मान्य. आता त्या व्यक्ती त्यांच्या संसार-प्रपंचात पूर्णपणे रमलेल्या आहेत. त्यांना सूना-नातवंडे आहेत. 'मी टू' च्या आरोपामुळे त्यांच्या कुटुंबात काय आदर राहिल? इतकी वर्षे कुटुंबात, समाजात मानाने जीवन जगणा-या व्यक्तीच्या प्रतिष्ठेची एका क्षणात होणार आहे. पुरुषाबाबतीत स्त्री तक्रार करु शकते तर पुरुषही करु शकतो. स्त्रीच्या शारीरिक गरजा जोडीदारा कडून पूर्ण होऊ शकत नसतील तर तिच्याकडूनही ही चूक होऊ शकते. कारण तिलाही नैसर्गिक भावना आहेतच की !

एखाद्या पुरुषाकडून एखाद्या स्त्री बाबतीत 'मी टू' ची तक्रार केली तर तिचीसुद्धा पुरुषाप्रमाणेच स्थिती होऊ शकते. बाजार, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक अश्लिल साहित्य, व्हीडीओज् उपलब्ध होत आहे. ते पाहून दोघांच्याही भावना जागृत न होतील तर नवलच ! म्हणून त्याचे कोठेही प्रदर्शन करायचे नाही. नैतिकता ही पाळली गेलीच पाहिजे.

काही स्त्री-पुरुषांकडून भूतकाळात अनेक गोष्टी कळत-नकळत घडलेल्या असतात. याचे कारण म्हणजे भिन्नलिंगी आकर्षण. प्रत्येकाची प्रेम प्रकरणे काही यशस्वी होत नाहीत. लग्ना अगोदर अनैतिक संबंधातून किंवा एखाद्याच्या वासनेची शिकार झाल्यामुळे जर गर्भ राहिला तर मुलीची तसेच कुटुंबाची बेअब्रू होऊ नये म्हणून काही पालक बाहेरगावी गुपचूप जाऊन मुलीचा गर्भपात करतात किंवा मुलीचे लग्न लाऊन देतात. लग्नाअगोदर गरोदर राहिलेल्या व लग्नानंतर जन्म दिलेल्या अपत्याला नव-याचे अपत्य म्हणून समाजमान्यता मिळविणा-या अनेकजणी सापडतील. कारण तिलाच फक्त बाळाचा खरा बाप कोण हे माहिती असते. मग अशा प्रत्येकाची ङी.एन.ए. किंवा नार्को टेस्ट करायची का? झाकली मूठ सव्वा लाखाची. कालांतराने दोघेही या कटू आठवणी विसरून आपापल्या नवीन जोडीदाराच्या संसारात रमून सुखाने संसार करतात. अशी हजारो उदाहरणे प्रत्येक देशात आहेत.

समाजात अशा अनेक स्त्रीया आहेत की त्यांना अनौरस संतती झालेली आहे. मग आपणच अशी एकमेकांची प्रकरणे उकरुन काढून आपली कुटुंबव्यवस्था मोडून काढायची का ? याचा विचार व्हावा. यात तिची चूक असो वा नसो समाज तिची अब्रू चव्हाट्वर आणत नाही. अशी कटू प्रकरणे सामोपचाराने मिटवून टाकतो व त्या स्त्रीला नव्याने जीवन जगण्याची संधी प्राप्त करुन देतो. असाच उदात्त दृष्टिकोन तूर्त पुरुषांच्या बाबतीत ठेवायला काय हरकत आहे ? याचा अर्थ पुरुषांना स्वैराचार करुन द्यावा किंवा ज्यांनी केला आहे त्यांना पाठीशी घाला असे मूळीच नाही.

आज अनेक स्त्री-पुरुष कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उच्च पदांवर एकत्रित काम करीत आहेत. अशा आरोपांमुळे त्या व्यक्तीच्या बरोबर त्या क्षेत्राची किती अपरिमित हानी होईल याचा कोणी अंदाज केला आहे का? ज्यांचा आज जी लोकं उदो उदो करीत आहेत त्यांना पायदळी तुडविल्याशिवाय राहतील का? हे अत्यंत भयानक वास्तव आहे आणि आपण ते नाकारु शकणार नाही. अशाने ज्या ठिकाणी महिला कार्यरत आहेत तिथे पुरुष काम करायला नकार देतील. स्त्रियांची वेगळी कार्यालये स्थापन करावी लागतील. समाजाचा सगळा समतोलच बिघडून जाईल.

शासनाने याचा गांभिर्याने विचार करुन 'मी टू' ही उसळलेली त्सुनामी त्वरित थांबवावी. कायदेशीर पक्की अशी एक नियमावली करावी. स्वतंत्र इ-मेल आयडी तयार करावा. एक तारीख निश्चित करावी. अशी आपत्ती ओढविल्यास त्याची तक्रार वरिष्ठांकडे व जवळच्या पोलिसचौकीत लेखी स्वरुपात, शक्य झाल्यास पुराव्यासह सादर करावी. मोबाईलवरुन त्वरित हे काम करावे. या प्रकरणाची सत्यासत्यता पडताळून पाहून मग तो पुरुष असो की स्त्री जो दोषी असेल त्याला अवश्य शिक्षा करावी.

सर्व प्रकारच्या कार्यालयातील महिलांचे रात्रीचे काम बंद करावे. कामाची गोपनीयता राखणेसाठी साहेबांची स्वतंत्र केबीन जरु असावी पण त्याच्या काचा पारदर्शक असाव्यात. साहेबांनी डिक्टेशन घेण्यासाठी महिलांना बोलवू नये. प्रत्येक शासकीय व खाजगी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती करावी तरच अशा प्रकारांना थोड्याफार प्रमाणात आळा बसेल.

आपल्याच माता-भगिनींवर ओढवलेले हे प्रसंग नक्कीच लांछनास्पद आणि संस्कृतीला काळीमा फासणारे आहेत. पण अनेकांचे संसार उध्वस्त होऊ नयेत तसेच समाज व्यवस्था ढासळू नये, यासाठी 'मी टू'ची ही त्सुनामी संबंधित महिलांकडून कृपया थांबविण्यात यावी हीच अपेक्षा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com