गॅडनेंचं हायस्कूल

प्रा. सतीशचंद्र तोडणकर
शुक्रवार, 7 जुलै 2017

कोकणासारख्या मागासलेल्या भागात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक स्कॉटिश तरुण आला. त्याने दापोलीच्या टेकडीवर हायस्कूल उभारले. विस्तारले. कोकणच्या मातीतच चिरशांती घेणाऱ्या गॅडने यांचे थडगे दुर्लक्षित आहे.

कोकणासारख्या मागासलेल्या भागात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक स्कॉटिश तरुण आला. त्याने दापोलीच्या टेकडीवर हायस्कूल उभारले. विस्तारले. कोकणच्या मातीतच चिरशांती घेणाऱ्या गॅडने यांचे थडगे दुर्लक्षित आहे.

शे-सव्वाशे वर्षं झाली. अगदी सांगायचे तर 1875-76 चा काळ. एका सायंकाळी एक उंच, भारदस्त व्यक्ती बोटीतून दाभोळ बंदरात उतरली. सगळीकडे किर्र रान... धो धो कोसळणारा पाऊस... आसपास विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणारे अर्धनग्न स्त्री-पुरुष. त्या अनोळखी व्यक्तीबरोबर त्याचा एक भारतीय सेवक होता. त्याच्या हातात कंदील. एक काठी मोडून त्याने ती आपल्या साहेबांच्या हातात दिली. जंगली श्‍वापदापासून आणि सर्पांपासून रक्षणासाठी. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या.

ते होते स्कॉटिश मिशनरी अल्फ्रेड गॅडने. भारताच्या एका टोकाच्या भागात शिक्षणप्रसाराचे काम करण्यासाठी हा तरुण मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर आलेला होता. त्याच्या खिशात कलेक्‍टरचे पत्र होते. ते त्याने दापोलीतील सैन्यतळाच्या प्रमुखाला दिले. दापोली हे थंड हवेचे ठिकाण होते. तसेच सागरी हालचालींसाठी मोक्‍याचे ठिकाण होते. त्यामुळे तेथे ब्रिटिशांचे ठाणे होते. सैन्याच्या प्रमुखाने गॅडनेंच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था केली.

गॅडनेसाहेबांनी एका उंच टेकडीची हायस्कूल उभारण्यासाठी निवड केली आणि भराभर हायस्कूलच्या उभारणीस सुरवात केली. त्यांनी स्थानिक संसाधने म्हणजे लाल जांभा दगड, माती व उत्तम सागवान वापरून ही इमारत साकारली. ती आजही वापरात आहे. बांधकाम गोथीक शैलीचे आहे, मोठ्या कमानी आहेत. दोन बाजूला प्रशस्त व उंच वर्गखोल्या आणि मध्ये रुंद मार्गिका असे स्वरूप आहे. 1880 मध्ये अल्फ्रेड गॅडने हायस्कूलची सुरवात झाली. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना, तसेच पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना 1885 मध्ये झाली. म्हणजे या दोहोंच्या पाच वर्षेआधी कोकणातील पहिल्या हायस्कूलची स्थापना दापोलीला झाली. त्याचवेळी त्यांनी एक मोठे हवेशीर वसतिगृहही उभारले. त्याच्या भोवती आंबा, पेरू यांची बाग लावली. साने गुरुजी येथेच राहत. "श्‍यामची आई' या त्यांच्या साहित्यकृतीत दापोलीचे आणि ए. जी. हायस्कूलचे सुंदर वर्णन आहे. भारतरत्न पा. वा. काणे, रॅंग्लर र. पु. परांजपे आणि साने गुरुजी हे याच हायस्कूलचे विद्यार्थी होते. डॉ. काणे आणि रॅंग्लर परांजपे दापोली शिक्षण संस्थेचे अध्यक्षही होते. आचार्य अत्रे यांच्या "श्‍यामची आई' चित्रपटात या हायस्कूलचे चित्रीकरण आहे.

गॅडनेंचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. ते सूट, बूट, कोट घालत. ते घोडागाडीतून किंवा घोड्यावरून फिरत. अनेक स्थानिकांशी त्यांची मैत्री होती. त्यांनी धर्मप्रसाराचे काम केले नाही, म्हणून मिशनने ही शाळा दापोली शिक्षण संस्थेला अठरा हजार रुपयांना विकली. त्यानंतरही अल्फ्रेड गॅडनेच प्राचार्य म्हणून निधनापर्यंत कार्यरत होते. 23 डिसेंबर 1928 रोजी दापोली येथेच त्यांचे निधन झाले. एकूण 48 वर्षे त्यांनी प्राचार्यपद सांभाळले. दापोलीतील कोकंबाआळीत त्यांचे थडगे दुर्लक्षित अवस्थेत आहे. ऐतिहासिक वारसा आणि कृतज्ञता म्हणून त्याचे जतन, संवर्धन व्हायला हवे. हे वर्ष त्यांच्या स्मृती-शताब्दीचे आहे.

साने गुरुजींनी आपल्या "श्‍याम' या पुस्तकात अल्फ्रेड गॅडने आणि दापोलीच्या इंग्रजी शाळेबद्दल सविस्तर लिहिले आहे. ते लिहितात- "दापोलीची इंग्रजी शाळा एका टेकडीवर बांधलेली होती. तीन-चार गावांच्या मध्यभागी ही शाळा सुरू होती. दापोली, जालगाव, गिम्हवणे वगैरे गावांची मुले या शाळेत येत असत. मिशन शाळेची इमारत सुंदर होती. चित्रकला मंदिर फारच भव्य होते. कवायती शिकविण्यासाठी एक मोठा हॉलच बांधलेला होता. शाळेच्या सर्व वर्गांतून भरपूर उजेड असे. शाळेच्या दरवाज्यातून आत जाताच उंच टांगलेले घड्याळ दृष्टीस पडे. दोन्ही बाजूस वर्ग भरण्याच्या खोल्या असत. शेवटी लांबच लांब चित्रकलेचे सभागृह होते. व्याख्याने, वादविवाद सारे या सभागृहात व्हायचे. चित्रकलागृहालाच लागून एक शिक्षकांची खोली व त्या खोलीच्या पलीकडे प्रिन्सिपॉल.'

साने गुरुजी आपल्या या शिक्षकांविषयी लिहितात, "गॅडने दापोलीत पन्नास-साठ वर्षे होते. ते मराठी चांगले बोलत. मराठी सण, मराठी तिथी, पावसाची नक्षत्रे सारे त्यांना माहीत होते. पाऊस पडताना ते विचारायचे, "हे म्हातारे नक्षत्र आहे का तरणे आहे?' कोकणात पावसाळ्यात विवक्षित नक्षत्रांना म्हातारे व तरणे असे संबोधण्याची पद्धत आहे. गॅडने अमक्‍या नक्षत्राचे वाहन काय, कोणावर बसले आहे? हीसुद्धा माहिती विचारायचे. गॅडने कोकणातलेच झाले होते.'

आज ए. जी. हायस्कूलचा विस्तार खूप झाला आहे. अनेक शाळा, भागशाळा निघाल्या आहेत. लाखो विद्यार्थी सुदूर पसरले आहेत. आपापल्या क्षेत्रात विदेशातही तळपत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof satishchandra todankar write article in muktapeeth