दिशांचे प्रवर्तक

morning
morning

सकाळ झाली की, विहिरीवर बायांचा गलबला सुरू व्हायचा. आपण अंथरुणावर पडून असलो तरी, अंगण बोलायला लागायचं. उजेडाच्‍या प्रत्‍येक पावलांनी रस्‍त्‍याला जिवंतपण यायचं. घरातील कौलारू फटींतून अलगद सूर्य आत डोकवायचा. चुलींनी केव्हाच आपले आग ओकणे सुरू केलेले असायचे. शरीर यंत्रासारखे कामाशी भिडायचे आणि दिवसाच्या रोजमर्रा जिंदगीची सुरुवात व्हायची. कामाला जुंपलेले हात संध्याकाळी सैल व्हायचे. रात्रीच्या चांदणगोष्टीत चंद्र ढगांच्या आड लपायचा आणि पुन्हा बाहेर निघायचा. काळोख्या रात्रीची भयाणता कुत्र्यांच्या भुंकण्याने अधिक कुरुप व्हायची. घरात दडलेल्या उंदरांचा मांजर शोध घ्‍यायची. रात्री केव्हातरी पॅसेंजर यायची आणि चतकोर गाव जागं व्हायचं. शिवारातून वेचून आणलेल्या कापूस चांदण्यांनी अंगणाला तारांगणाचं रुप यायचं. गाव असंच चांदण्यात न्हाऊन सकाळच्या प्रतीक्षेत झोपी जायचं.
जागतिकीकरणाचा सर्वाधिक प्रभाव ग्रामीण भागावर झाला. केवळ आर्थिक क्षेत्रावर त्याचे दूरगामी परिणाम झाले असे नाही, तर समग्र जीवन मूल्यें प्रभावित झाली. भौतिकतेच्या महाजालाचा गुंता घट्ट होत गेला. जमिनीतील पाणी कंपनींच्या घशात गेले. ओलीतकारांनी भुईत खंजिर खुपसले. जमिनीतील पाणी आटले, जागतिक कैचीने माणसांच्‍या मनातील संवेदनेची तार तोडली. निसर्गाचा लहरीपणा ‍पिकांच्‍या मुळांवर पांढरी रेघ ओढून गेला. गाव ‍डिजिटल होत चाललं असताना, मातीचा सुगंध गावातून हद्दपार झाला. काहींची मन शहरात रमली. कायम शहराची झाली.
प्रगतीची चाकं कुणालाही थांबवता येत नाही. काळाच्या ओघात परिवर्तन स्वीकारावेच लागते. भजन, कीर्तनात दंग असणारं गाव अलीकडे डीजेच्‍या तालावर थिरकायला लागलं. राजकीय पक्षांचे फलक गावाच्‍या सीमेवर, माणसांच्‍या स्‍वागताला उभे राहू लागले. राजकीय पक्षांनी एकाच कुटुंबात दोन घरं केली. राष्‍ट्रसंतांचा ग्रामविचार, गाडगेबाबांची ग्रामस्‍वच्‍छता काळाच्‍या ओघात सरकारी कामाचा एक भाग झाली. गावाजवळून वाहणारी नदी अनंत काळापासून माणसांच्‍या जखमा वाहून कोरडी पडली. तरुणाईच्‍या हातात राजकीय झेंडे आले. धर्म, जातीची समीकरणं भुशासारखी मेंदूत कोंबल्या गेली. व्‍यवस्‍थेचे दुश्‍मन कोण आहेत? हे सांगताना, आपली पोळी कशी शेकता येईल याची ‍तजवीज करणारी, तरुणाईचे मेंदू खराब करणारी डावी-उजवी विचारधारा ग्रामीण समूह जीवनात पाय पसरू लागली.
स्पर्धा परीक्षेच्‍या तयारीला महानगरात गेलेल्‍या तरुणांनी गावाला नवी ओळख दिली. आदर्शवादाची बीजे पेरली. काही तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन गावाच्या मातीला परिवर्तनाचा नवा चेहरा दिला. अशा तरुणांना निश्‍चितच गावाच्‍या जाणिवा कळल्‍या होत्‍या. सध्‍या ग्राम परिवर्तनाचे विविध प्रयोग सर्वत्र सुरू आहे. गावाला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन जाणारा अविनाश पोईनकर गावाच्‍या मातीत घडलेला तरुण. जाणीवेचा कवी, स्पष्ट वक्‍ता, पत्रकार, उत्तम संघटक अशी विविध विशेषणं त्याच्‍या व्‍यक्‍तिमत्‍त्‍वात दडलेली आहेत. आजच्या तरुणाईचा तो आदर्शवादी चेहरा आहे. नव्‍या विचारांना आपलेसे करण्‍याचा अध्ययनशील स्‍वभाव, त्‍याला सतत भटकंती करायला भाग पाडतो. नव्‍या माणसांचे भारावलेपण त्‍याच्‍यात ऊर्जा निर्माण करीत असते. अविनाश पहिल्‍यांदा कधी भेटला आठवत नाही. पण, त्‍याचा हसरा चेहरा सभोवार दरवळणा-या कवितेसारखा वाटला. अविनाश वडिलांच्‍या प्रेमाला बालपणीच पोरका झाला. सिमेंटच्‍या गा-यात स्‍वप्‍नांच्‍या विटांना ‍चिणत आयुष्‍याची इमारत उभी केली. आईच्या कष्टाची जाणीव त्याला सदैव राहिली. तसा तो सिमेंट कंपनीच्या पट्टयातला. धुळमातीत मजबूत झालेला. विद्यालयीन जीवनात लेखक रत्‍नाकर चटप, कवी राम रोगेंसारखी ज्‍येष्‍ठ मंडळी त्‍याला लाभली. संस्काराचे बीज चांगल्या माणसांच्या सहवासात रोवल्या गेले. जिंदगी तावून सुलाखून निघाली की, प्रत्येक संकटांशी लढण्याचे बळ प्राप्त होत असते. कविता आणि पत्रकारिता अशा दोन्ही लीलया त्‍याने पेलल्‍या. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारांचा तो मानकरी ठरला. पुरस्कारांच्या पैशांतून त्याने ग्रंथसंपदा विकसित केली.
तरुणाई म्हणजे ऊर्जेचे माहेरघर. एखादा कार्यक्रम घडवून आणायचा म्हणजे अनेकांच्या सुगंधी हातांचा स्पर्श लाभावा लागतो. अविनाशला सामाजिक कार्याची प्रचंड आवड. समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणा-या माणसांच्या गोतावळ्यात मिसळून चंदनासारखा सुगंध देणे त्याच्या स्वभावाचा एक भाग. त्याच्या ‘बीबी’ गावात नैसर्गिक पद्धतीने लाखों अस्थी रुग्णांवर उपचार करणारे गिरिधरभाऊ काळे आहेत. त्यांचे कार्य सातासमुद्रापार पोहचवण्याचे समाजशील काम त्याच्या हातून घडले. ग्रामसभेने ठराव संमत करून गिरिधरभाऊ काळे यांना डॉक्टरेट पदवीने सन्‍मानित केले. ग्रामपंचायतीला संवैधानिक अधिकारांची ओळख अविनाशने करून दिली. डॉक्टरेट सन्मान बहाल करणारी बीबी ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ठरावाने चर्चेत आली.
आजचे तरुण दिशाहीन झाले आहे, पिढी भरकटत चालली आहे, असा कांगावा सर्वत्र होताना दिसतो. मात्र अविनाश सारख्या तरुणांनी अशा ‍विधानांना फाटा दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक’ म्हणून सामाजिक चळवळीतील सुशिक्षित युवकांसाठी ग्राम विकास फेलोशिप प्रदान करण्यात येते. त्या अंतर्गत महाराष्ट्रात एक हजार ‘ग्रामपरिवर्तक’ कार्यरत आहेत. अविनाशने शासन आणि जनता यातील दुवा म्हणून ग्रामपरिवर्तकाची जबाबदारी ग्राम घाटकूळ, जि. चंद्रपूर येथे पार पाडली. शासनाच्या ग्रामविकासाच्या योजनांची माहिती गावक-यांना द्यायची, प्रत्यक्ष अंमलात आणून सर्व स्तरांतून गावाचा विकास साधायचा, अशी दुहेरी भूमिका त्याने बजावली. घाटकूळ गावाला महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्राम तृतिय पुरस्कार प्राप्‍त आला. अविनाशच्या कल्पक विचारांचा वारसा गावाला लाभला. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत ISO झाली. सुसज्ज व्यायामशाळा, अभ्यासिका, भव्य वाचनालय निर्माण झाले. गाव हागणदारी, दारूमुक्त झाले. बचत गटाच्या माध्यमातून गावात रोजगार उभे राहिले. ग्रामपंचायतीच्या धर्तीवर चालणारी बालपंचायत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरली, ग्रामसंवादाच्या माध्यमातून गावाला मान्यवरांचे मार्गदर्शन घडले. प्रत्येकांना गॅस उपलब्ध झाल्याने, गाव धूर मुक्त झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध गोष्टी गावक-यांना शिकता आल्या. गाव विकासाची ३.५ कोटीची सर्व कामे गावात पूर्ण झाली. गावाला आदर्श ग्राम, स्मार्ट ग्राम, हरीत व स्वच्छ ग्राम पुरस्कार ‍मिळाले. हा सर्व सन्मान गावाला मिळाल्याची तृप्तता अविनाशच्या चेह-यावर ओसंडून वाहते. शासनाची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावताना त्याच्यातील पारदर्शी आणि सृजनशील माणूस सतत जागा होता.
आजच्या युवकांनी पानटप-यांवर स्वत:च्या क्रयशक्ती वाया घालवणे टाळले पाहिजे. बापाच्या मिळकतीवर मजा मारताना घामाचे मोल जाणले पाहिजे. हीच पिढी उद्याच्या मंगलमय भारताचे भाग्य लिहिणार आहे. आजच्या युवकांना कालच्यापेक्षा बरंच नवं कळायला लागलं आहे. तंत्रज्ञानाच्या वापरात प्रचंड पुढे गेली आहे. नव्या नव्या गोष्टी मोबाईलमध्ये डाऊनलोड करताना संवेदना तेवढ्या अपलोड होत नाही, याची जाणीव तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. आदर्शवाद कालही पुढे होता आणि आजही. नवं करण्यासाठी क्षितिजाने आपले मार्ग मोकळे करून ठेवले आहे. तुम्ही ज्या दिशेला जाल त्या दिशेचे प्रवर्तक असाल, हे मात्र त्रिकाल सत्य अविनाशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com