शुक्रवारची सवाष्ण 

क्षमा एरंडे 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

परंपरेने चालत आलेले व्रत काळानुसार बदलले पाहिजे, नव्याशी सांगड घातली पाहिजे. 

"मावशी, येत्या रविवारी श्रावणातील शुक्रवारची सवाष्ण जेवायला घालणार आहे, पण पुरणपोळीचाच नैवैद्य दाखविला पाहिजे असे काही नाही ना? कारण मला एकटीला एवढी सवय नाही, साधाच बेत करीन म्हणते.'' सुलेखाचे काही सांगताना चुकतेय की माझी ऐकण्यात चूक होतेय! मी विचारलेच,

"शुक्रवारची सवाष्ण रविवारी हा काय प्रकार आहे.'' ""अगं, सगळ्यांना त्यादिवशी सुटी असते ना. एरवी आठवडाभर आमचे कामाशी लग्न लागलेले असते. व्रतवैकल्य करावी अशी आम्हा नोकरदार महिलांची खूप इच्छा असते ग, पण तेवढ्यासाठी प्रत्येक वेळी रजा घेणे शक्‍य नसते. मग हक्काचा रविवार असतो ना आमचा. मुलांना पण आपले सण, व्रत यांची माहिती असायला हवी. '' 

हा बदल ऐकून छान वाटले. त्यातही ती वॉचमनच्या बायकोला सवाष्ण म्हणून आणि तिच्या मुलीला कुमारिका म्हणून बोलावणार आहे. आपल्या घराचे, सोसायटीचे रक्षण करणाऱ्या कुटुंबाची थोडीफार उतराई होणे सुलेखाला गरजेचे वाटले, हे खरेच कौतुकास्पदच म्हणावे लागेल. पूर्वी मंगळागौर पूजन मंगळवारी सकाळीच होत असे. आता यातही बदल होत चालला आहे. मंगळागौर पूजणाऱ्या बहुतांशी नोकरदार असतात, प्रत्येक मंगळवारी सुट्टी घेणे शक्‍य नसते. त्यामुळे हल्ली या पूजा संध्याकाळी केल्या जातात. काहीवेळा मंगळवारी पूजा व रविवारी मैत्रिणींना जमवून मंगळागौरीचे खेळ असेही होते. मुंबईच्या काही महिला रेल्वेत जाता येता अनेक सण समारंभ साजरे करीत असतात. 

माझ्या परिचयातील अनेक जणी पारंपरिक व्रत वैकल्ये एखाद्या अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात अन्नदान अथवा आर्थिक हातभार लावून साजरा करतात. माझी एक मैत्रीण तिच्या कामवालीच्या मुलीचा दरवर्षी संपूर्ण शिक्षण खर्च करते. आमच्या सुलेखासारख्या अनेक स्त्रिया व्रत वैकल्याच्या माध्यमातून हा सामाजिक बांधिलकीचा वसा उतणार नाही, मातणार नाही असे म्हणत पूर्णत्वाला नेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Muktapeeth