अपघात 

आशा शिंदे 
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

आयुष्यात अनेक अपघात घडतात आणि त्या प्रत्येक वेळी आपण जिवंत राहतो. आयुष्याच्या उतरणीवर हे प्रत्येक क्षण आठवतात. 

आयुष्यातील अनेक अपघातांतून मला जीवदान मिळाले. देव तारी त्याला कोण मारी? रिक्षाने जाताना समोरून आलेल्या गाडीने जोरात धडकत दिली. पलट्या खाऊन रिक्षा प्रभात रस्त्यावर कोपऱ्यातील झाडावर आदळली. ड्रायव्हर जखमी. माझ्या कंबर-पाठीला मार. एकदा अलका टॉकीजजवळ पतीबरोबर स्कूटरवर होते. पोलिसाने हात दाखवल्यावर थांबलो. पण मागून वेगाने आलेल्या गाडीने धडक दिली.

मी बेशुद्ध, डोक्‍याला मार. कोलकात्याच्या वर्दळीच्या रस्त्यावर ट्राममधून उतरतानाच ट्राम चालू झाली. रस्त्यावर पडले. एकदा सकाळी भांडारकर रस्त्याने डेक्कन क्वीनसाठी जाताना अचानक रिक्षाचे एक चाक निखळले. रिक्षा उलथीपालथी होऊन फुटपाथला धडकली. कॅनडाला असताना रोलर कॉस्टरमधून उतरताना मोकळ्या जागेत पाय अडकून तोंडावर पडले. मुंबईत व्हीटीजवळ रस्ता ओलांडताना पाय घसरून पडले.

नेमका हिरवा दिवा लागून समोरून वाहने आली. पण एका टॅक्‍सीवाल्याने धावत येऊन मला उचलले. टिळक स्मारक मंदिरासमोर उभी होते. ट्रकला चुकवणाऱ्या दुचाकीने मला धडक दिली. खाली पडले. नशिबाने तो ट्रक काही सेंटिमीटरवरून भरधाव गेला. लक्ष्मी रस्त्यावर बसमध्ये मागील दाराने चढत असतानाच बस चालू झाली अन्‌ तोल जाऊन मी बसमध्येच पडले. तोल मागे गेला असता तर? 

पतीबरोबर मी जालंधरहून पुण्याला निघाले होते. तिकीट जालंधर सिटीपासून झेलम एक्‍स्प्रेसचे होते. शहरातील वातावरण तंग, कर्फ्यू होता. कसेबसे कॅंटोन्मेंट रेल्वे स्टेशनला पोचलो. प्लॅटफॉर्मवर एका चहाच्या स्टॉलजवळ थांबलो. पण चहावाला म्हणाला, ""रात का समय, यहॉं खतरा है। बहनजी भी साथ है। वो फ्लाइंग गड्डी आ रही है। उसमे बैठकर सहर जाईए।'' विनातिकीट कसे जायचे? पण चहावाला हात जोडून विनंती करीत होता. आम्ही त्या गाडीने गेलो.

पुढे झेलम पकडली. सकाळी दिल्लीला वर्तमानपत्रात एक छायाचित्र पाहिले अन्‌ हादरलोच! आम्ही निघाल्यानंतर चहाच्या स्टॉलवर गोळीबार झाला होता. सर्व उद्‌ध्वस्त झाले होते. नकळत चहावाल्यासाठी हात जोडले गेले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Muktapeeth