अन्‌ दिवाळी झाली ! 

शांताराम वाघ 
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

अंगणात दिवाळी होती, पण घरात अंधार होता. शेजारी पुढे सरसावले आणि घरही उजळले. 

मी साधारण चौदा-पंधरा वर्षांचा असेन. चोहीकडे दिवाळीचा आनंद साजरा होत असताना आम्ही भावंडे घरातूनच बाहेरचा आनंद पाहात होतो. आईने शेणाचे पांडव घरासमोरील अंगणात ओळीने मांडले होते. रांगोळी घातली होती. मात्र घरात शुकशुकाटच होता. आम्ही जेथून किराणा मालाचे सामान आणत होतो, त्या दुकानात आमची बरीच उधारी थकली होती. त्यामुळे त्याने आम्हाला किराणा सामान देण्याचे बंद केले होते. दिवाळीचा पहिला दिवस उजाडला तरीही घरात शांतताच होती. आम्हा भावंडांत सोशिकता व समजण्याची जाण होती. आम्ही सारेच या प्रसंगाला धीराने तोंड देत होतो. 

घरी खेळायला काही मित्र आले होते, त्यात पलीकडील गल्लीतील कुलकर्णी हॉटेल मालकांचा मुलगाही आला. त्याला घरातील शुकशुकाट पाहून आश्‍चर्य वाटले. त्याने माझ्याकडे चौकशी केली अन्‌ मीही त्याला खरेखुरे कारण सांगून टाकले. हे ऐकताच त्या मुलाने ही हकीगत घरी सांगितली. त्याबरोबर त्याचे वडील (डी. आर. कुलकर्णी) आमच्या घरी लगेच आले. मला घेऊन त्या दुकानदाराकडे गेले. जरुरीपुरते दिवाळीचे सामान मला दिले. ते घेऊन मी पळतच घरी आलो. त्यानंतर दळण व सारे सोपस्कार. तोवर इतर मित्रमैत्रिणींकडून त्यांच्या त्यांच्या घरी ही बातमी पोचली होती.

शेजारणी लगबगीने गोळा झाल्या. आईच्या कामाला साऱ्यांनी हातभार लावला. कोणी जात्यावर दळण दळत होते, तर कोणी कुटत होते. आपल्या घरातील दिवाळी साजरी करण्याऐवजी त्यांनी आमची दिवाळी साजरी करण्यासाठी क्षणाचीही उसंत घेतली नाही. दोन-अडीच तासांत पाच-सहा महिलांनी दिवाळीचे सारे पदार्थ बनवले अन्‌ आमच्या पत्र्याच्या डब्यात ते भरले. मगच सर्वजणी आपआपल्या घरी गेल्या. सुमारे पाच दशकांपूर्वीची ही दिवाळी, साऱ्यांना आपल्या आनंदात सामावून घेण्याची वृत्ती, शेजाऱ्याविषयी कमालीची आत्मीयता अजूनही डोळ्यांपुढे तेवढीच लखलखीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article in Muktapeeth