रूक जाना नहीं... 

डॉ. कांचनगंगा गंधे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी महिला क्रिकेटचे कौतुक फारसे नव्हतेच. खेळाडू स्वतःच खर्च करून दौरे करायचे. आनंदासाठी. 

मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी दोन्ही वैशिष्ट्ये असणारी, 1972 ते 1981 च्या काळातली एकमेव (कदाचित अजूनही). भारती माझी सख्खी, पाठची बहीण! पश्‍चिम विभाग महिला क्रिकेट स्पर्धेत 1981 मध्ये नागपूरला महाराष्ट्राने चार वर्षांत प्रथमच मुंबईला हरवून विजेतेपद मिळवले, त्यात भारतीने 13 धावांत तीन बळी व नाबाद 21 धावा करून सिंहाचा वाटा उचलला होता.

लहानपणापासूनच भारतीला विशेषतः मुलांचेच खेळ आवडायचे. स. प. महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर ती क्रिकेटकडे वळली. तिची फलंदाजी, गोलंदाजी पाहून तिची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली. अवघ्या दोन वर्षांतच राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्यामुळे तिचे वेगवेगळ्या गावी जाऊन क्रिकेट खेळणे सुरू झाले. तिच्या वाटणीचे काम घरात करावे लागले की आम्हाला तिचा रागही यायचा, पण वर्तमानपत्रात तिचे नाव आले की सारे आलबेल! 

पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी पुण्याबाहेर महिला क्रिकेट टीम खेळायला जायची तेव्हा रेल्वेचे आरक्षण बहुधा नसायचेच. बऱ्याच जणींकडे स्वतःची बॅटही नसायची. स्वतःचा स्वतः खर्च करून जायचे. भारतीची 1974 मध्ये पश्‍चिम विभागीय संघात निवड झाली. पुढे आठ वर्षे ओळीने राणी झाशी करंडक या संघानेच जिंकला, त्यात भारतीने सलामीची फलंदाज-गोलंदाज म्हणून खूप नाव मिळवले! तेव्हा दूरचित्रवाणी, फोन काहीच नव्हते! त्यांच्या खेळाची बातमीसुद्धा अगदी छोटी, कोपऱ्यात वर्तमानपत्रात छापून यायची, तिची कामगिरी आम्हाला त्यातून कळायची.

आम्ही बहिणींनी तिला पोस्ट कार्ड पाठवले - "रूक जाना नहीं तू कभी हारके'. तिने ते सार्थ करून दाखवले. पुढे ती ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध भारताकडून खेळली. आज वयाच्या चौसष्टाव्या वर्षीही जावई आणि नातवाबरोबर तितक्‍याच तडफेने स्क्वेअर कट मारते आणि बॉल स्विंग करून विकेटही घेते. 

Web Title: Pune Edition Article in Muktapeeth