निरपेक्ष नवस (मुक्तपीठ)

डॉ. नीलिमा राडकर
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

जग निर्माण करणाऱ्या विधात्याला आपण काय देणार? आपण गरजूंना मदत होईल, असा "नवस' करायचा. 

शैलाच्या आईने कसेबसे आपल्या मुलाला सांगितले, ""मी महाराजांना चांदीच्या पादुका वाहीन, असे बोलले आहे.'' मुलांने प्रतीकात्मक पादुका आणूनही दिल्या. त्यानंतर थोड्या दिवसांनी त्या मनाशीच "महाराज मी चुकले का?' असे पुटपुटताना मुलाने ऐकले. त्यांने खोदून खोदून विचारल्यावर चाचरतच त्याला सांगितले, ""अरे मी महाराजांच्या पावलाएवढ्या भरीव पादुका अर्पण करीन, असे बोलले होते. पण, एवढा खर्च परवडणार नाही, म्हणून जास्त बोलले नाही.'' त्यानंतर आठ दिवसांनी मुलगा, सून, मुलगी, जावई त्यांना म्हणाले, ""आई, उद्या आपण तुझा नवस पूर्ण करणार आहोत.'' 

दुसऱ्या दिवशी गाडीतून सारे निघालो. गाडीतून उतरल्यावर मुलगा त्यांना म्हणाला, ""आई, हा एक वृद्धाश्रम आहे. तिथे आपण आर्थिक मदत करणार आहोत. महाराजांच्या चांदीच्या भरीव पादुकांची किंमत आम्ही विचारली. पण, ज्या पादुकांना महाराजांचा चरणस्पर्श झाला नाही, त्यांचे इतरांना काय महत्त्व आहे? म्हणून त्या किमतीएवढी आर्थिक मदत ज्या समाजसेवी संस्थेचे पारदर्शक काम चालू आहे, त्यांना करायची ठरवले. आम्हाला खात्री आहे, की महाराजांना नक्कीच आनंद होईल.'' मुलाचे बोलणे ऐकून शैलाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते. 

शैलाच्या आईचे बोलणे ऐकतानाही आमचे डोळे पाणावले होते. त्या पुढे म्हणाल्या, ""अगं, खरंच ज्या विधात्याने सारे जग निर्माण केले, त्यालाच आपण काय देणार? नवस करणे हे आपल्या मनाच्या समाधानासाठी असते. त्यातही दानाचे महत्त्व आहेच. पण, त्याला स्वार्थाची किनार असते. तेव्हापासून मी मात्र निरपेक्ष नवस बोलते, की परमेश्‍वरा माझ्या हातून नेहमी सत्कर्म घडेल. आणि त्या बदल्यात मला काही नको. सप्तात्री दान मी नेहमी करीत राहीन.'' शैलाच्या आइर्'ने मला नवसाचा वेगळाच अर्थ समजावला होता. या वयातही त्यांनी स्वतःत केलेल्या बदलामुळे मी सुखावून गेले आणि आईनेही संकल्प केला, "निरपेक्ष नवस बोलण्याचा.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Article on Nirpeksha Navas Muktpeeth