व्हावे आपणची गुरू (मुक्तपीठ)

राजन बिचे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

घरातील लहानसहान कामासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून का राहावे? हाताशी थोडी साधने ठेवली, तर आपणच आपले काम पूर्ण करू शकतो.

घरातील लहानसहान गोष्टीसाठी आपण अवलंबून राहतो. उदाहरणार्थ, पाण्याचा नळ गळू लागला की तो बदलणे, त्याचा वायसर पाहणे. खरे तर नळ बसविणे, खोलणे, जोडणे यांसारखी किंवा इलेक्‍ट्रिकची लहानसहान कामे म्हटले, तर अवघड नसतात. जरा प्रयत्न केला, तर ते कामे सोपेच सोपे आहे. थोडासा प्रयत्न हवा आणि निरीक्षण शक्तीही हवी.

वेळ, श्रम, पैसा यांची बचत करण्यासाठी स्वतःच अशी कामे करणे केवळ आनंददायकच नसते, तर स्वतःवरील विश्‍वास वाढविणारे असते. काही वर्षांपूर्वी घरातील पाण्याचा नळ गळत होता. तो बदलण्यासाठी प्लंबरची वाट पाहत होतो. तो मुळात वेळेवर आला नाही. त्याने नळाला तपासले. अशा वेळी त्याची भूमिका डॉक्‍टराची असते. सगळे पाहून दोनशे रुपये मजुरी, तसेच नवीन नळ आणून द्या, असे म्हणाला. आलिया भोगासी म्हणत नवीन नळ आणून दिला व त्याच्या कामाचे निरीक्षण करू लागलो. त्याने गच्चीवरील टाकीचा नळ प्रथम बंद केला. मग त्याच्याकडील साहित्याने अवघ्या पाच मिनिटांत नवीन नळ बसवून पैसे घेऊन गेला. 

दिवाळीच्या वेळी बऱ्याचदा काही इलेक्‍ट्रिकची कामे करावी लागतात. मात्र, अशा वेळी इलेक्‍ट्रिशियन उपलब्ध होत नाही. मग काय करायचे? थोड्याशा निरीक्षणाने व काही सरावाने लहानसहान कामे करता येतात. प्लंबर, इलेक्‍ट्रिशियन, तसेच दुचाकीची किरकोळ दुरुस्ती करणे यांसारखी कामे करणे शक्‍य असते. यासाठी जरी मास्टर नसले, तरी आपण जुजबी ज्ञान ठेवल्यास आपली कामे होतात. 

एकदा वॉश बेसिनचा नळ गळू लागला. मग आठवले त्याप्रमाणे नवीन नळ मी स्वतःच लावला. या कामी लागणारे साहित्य मी घरात आणून ठेवले आहे. आता मला लहानसहान कामासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. श्रम, वेळ, पैसा यांची बचत करण्याची सवयच जणू काही जडली आहे. शेवटी स्वतःचा स्वतःच गुरू बनावे लागते. अशा वेळी आपण काय करता ?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Edition Muktapeeth Article